शेतकऱ्यांच्या कणखर स्त्रियांची गोष्ट
माणसाचा पोशिंदा जगला पाहिजे. असे किती वाटत असले तरी देशातील परिस्थिती वाईट झाली आहे. हजारो शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र राज्यात यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. निसर्गराजा शेतकऱ्यावर नाराज होऊन रुसून पळून गेला की काय असे वाटत राहते. तीन- चार वर्ष सतत दुष्काळ, विहिरी,तलाव,तळी कोरडी पडायला लागली. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जायचं कुठ ? डोक्यावर कर्जाचा बोजा आणि डोळ्यासमोर पाण्याविना व्याकूळ झालेली जनावर. सगळं वातावरण कसं निराशामय झालाय . यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण त्याची कारभारीण मात्र खंबीरपणे आणि कणखरपणे या परिस्थितीत तग धरून आहे. कदाचित शेतकऱ्यापेक्षा जास्त दुख सोसत ती आज परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. उलट संकटाशी सामना न करता शेतकरी आत्महत्या करणे स्वीकारत आहे. त्याचवेळी ती या समाजातील वाईट नजरापासून ते रोजच्या पोटापाण्याचा समस्या एकटीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा महिलांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यांचा आढावा मांडणारा हा लेख.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या आधारे शेतकरी आत्महत्येसाठी मुख्य कारणे म्हणजे दिवाळखोरी, कर्जाचा डोंगर, शेतीशी संबंधित विषय नापिकी, नैसर्गिक आपत्तीने संकट, गरिबी, कौटुंबिक समस्या, आजारपण आदी आहेत. ही कारण सरकार नोंदी आहेत. या आत्महत्या करणाऱ्यांची संख्या पहिली तर २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे १३७५४ व ११७७२ जणांनी आत्महत्या केल्या. तर २०१४ मध्ये ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. २०१५ मध्ये ही संख्या अजून वाढलेली आहे. जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या सगळ्या पुरुष शेतकऱ्यांनी केली. यात महिलांची संख्या अगदीच नगण्य आहे. पण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही उलट वाढतोय. पण आत्महत्या केल्यावर सरकार पैसे देतेय म्हणून काहीजण आत्महत्या करत आहेत असे मराठवाड्यात महिलांसाठी काम करण्याऱ्या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्तीने सांगितले. तिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण अजून माहिती घेतल्यावर कळलं की आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होत आणि उलट पैसेही मिळतात म्हणून आपल्या घरच्याला मिळतील पैसे या उद्देशाने हा आत्महत्या वाढत आहे. यासंदर्भात एका शेतकऱ्याच्या पत्नीशी संपर्क केला. तिचा नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलल्यावर अनेक गोष्टीचा उलगडा झाला आणि सत्य परिस्थिती बाहेर आली. खरचं काहीजण असे करतात. पण शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाही तर वाढतात याची माहिती मिळाली.
आत्महत्या केली त्याची बातमी दिसते पण त्यानंतर काय? लेखाची माहिती गोळा करताना मात्र भयानक चित्र समोर आले. शहरातील लोकांना वाटते शेतकऱ्यांना काय पैसे मिळतात पण त्यांना किती पैसे मिळतात? ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. ते पैसे मिळवण्याचा प्रवास किती कठीण आहे याची जाणीव झाली. या सगळ्या परिस्थितीला शेतकऱ्याची बायको सामोरे जातेय. बऱ्याच वेळा एकटी असते ती, कशी सामोरे जाते हे तिच तिलाच माहिती. बारा विश्व दारिद्र्य आणि भविष्याची चिंता खायला तीन –चार तोंड या सगळ्यातून जगायची प्रेरणा कुठून आणते हा प्रश्न आहे. पण आई ती आई असते. काही झालं तरीही पोराबाळांना खाऊ पिऊ घालून संसारचा गाडा खंबीरपणे ओढते आहे. यासाठी तिला सलामच करायला हवा.
मराठवाडातील एकल महिला संघटना ही संस्था अनेक वर्षपासून महिलांच्यासाठी काम करते. विशेषतः विधवा, परीतक्ता, घटस्पोटीत, प्रौढ कुमारिका अशा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, तसेच त्यांना न्याय आणि समता मिळावी म्हणून कार्य सुरु आहे. संस्थेत काम करणारी लक्ष्मी वाघमारे हिच्या मते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांचे प्रश्न दिवसेदिवस वाढू लागले आहेत. एक तर या महिला आयुष्यभर ‘चुल मुल’ यामधून बाहेर पडलेल्या नसतात आणि घरचे पुरुष पडूही देत नाहीत पण अचानक नवऱ्याने आत्महत्या केली की सगळी लढाई तिला एकटीने लढावी लागते. घरच्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी तिलाच पाहाव्या लागतात. यामुळे आयुष्याचा जोडीदार सोडून गेला याचं दुख करायला वेळ मिळत नाही. तरीही ती परिस्थितीला वैतागून आत्महत्या करत नाही किंवा धीर सोडत नाही लढत राहते. समाजाच्या वाईट नजराशी, दुष्काळच्या भयाण वास्तवाशी, नातेवाईकांच्या टोमणाशी आणि कधीतरी स्वत:शी स्वत:ची असलेली लढाई लढत असते.
अगदी कोवळ्या वयात बोहल्यावर चढलेली ती पोरगी, चांगलं –वाईट कळेपर्यंत दोन पोरांची आई झालेली असते. पुर्वी आजारपण किंवा अन्य कारणांनी विधवा झालेल्या नशिबाला दोष देत पण आता या शेतकऱ्यांच्या विधवांनी कोणाला दोष द्यावा? असा प्रश्न पडतो. आपला नवरा आपल्याला संकटात एकटा सोडून गेला याचा राग येतो त्यांना, मी त्याचा संसार का सांभळू असा प्रश्नही पडत असला तरी त्याचे आई- वडील, बहिण- भाऊ, आजी –आजोबा आणि स्वतःची मुले यांची सगळ्यांची जबाबदारी विलया पेलत असते. सरकारकडून मिळणारी मदत मिळवण्यासाठी तिला घराबाहेर जावं लागत. घराबाहेर न पाडलेल्या स्त्रीला एकटीला कोणी उभं करत नाही. या कामासाठी कोणाची मदत घ्यायची तर त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागतो. जर दिला नाही तर अर्धा पण हिस्सा मिळत नाही. म्हणून मन मारून अर्धा हिस्सा त्याला देऊन मिळणाऱ्या पैसेची वाट पाहते. येणाऱ्या पैश्यात घरातलेच हिस्सेदार होतात तेव्हा मात्र मन घट्ट करून परिस्थितीला लढा देण्याशिवाय उपाय नसतो. एकदा का पैसे मिळण्याची आशा दिसली की पहिले घरातील नातेवाईक हिस्सेदार म्हणून उभे राहतात त्याच्यावर आमचीही जबाबदारी होती म्हणून हिस्सा मागतात. अशा काही प्रकारामुळे येणारे पैसे रखडतात. हिस्सेकारी वाढले की येणारी रक्कम स्वत:च्या कुटुंबाला उशिरा आणि कमी मिळते तसेच सावकाराच भूत मानगुटीवर बसलेले असते. कधी कधी सावकाराच्या वागण्यावरून हा माणूसच आहे का असा प्रश्न पडतो. पण तिला सावकाराचे कर्जही फेडल्याशिवाय उपाय नसतो. कर्ज फेडण्यासाठी मात्र कोणी हिस्सेकारी नसतो . कोणी नातेवाईक मदत करत नाही. उलट पैसे मागायला येऊ नये म्हणून अंतर ठेऊन वागतात.
स्त्री ही जास्त सहनशील असते. असे आपण नेहमी म्हणतो पण संकटाकाळात ती ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळते. यावरून तिच्या सहनशीलता आणि कणखर वृत्तीचे दर्शन होते. असेच काहीसे दृश्य मराठवाड्यात पाहायला मिळते. नवऱ्याने आत्महत्या केल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.तरीही मुलांचा विचार करून परिस्थितीशी लढत असते. संस्था सरकारी योजनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते पण अनेक कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे तिला फायदा मिळत नाही. तसेच जमीन ,घर पतीच्या नावावर असल्यामुळे तिला ही मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी ती पहिल्यांदा सरकारी लालफितीत अडकते . तिथून बाहेर काढणारे त्याचा चांगला दाम पण घेतात. अशा अनेक पाळतीवर संकटांशी सामना करत ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी न थकता, निराश न होता चालत राहते.
अशाच एका आईची व्यथा बीड मधील आंबेवाड गावातील २५–२६वर्षीय मनीषा तिकडे हिच्या नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलताना जाणवले की तिला नवऱ्याचा राग येत होता, फक्त एक –दीड लाखासाठी त्याने आत्महत्या करावी असा प्रश्नही सारखा सतावत होता. तसेच वाईट पण वाटत होते. कर्ज काही फार जास्त नव्हते पण आता माझ्या पोराबाळांना होणार त्रास त्या कर्जापेक्षा लाखो पट्टीने जास्त आहे, हे जाणवते होते. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवच रान करावं लागतंय, पण पाऊस-पाणी म्हणून काम नाही, काम नाही म्हणून पैसा नाही म्हणून सगळं कसं दुष्टचक्र बनलाय, अशी एकूण परिस्थिती. ती पुढे बोलताना म्हणाली “तो मला आणि माझ्या पोरांना सोडून गेला पण आमचा विचार केला नाही. आता मी पण तसचं केल तर ? पण पोराकडे बघून जगते. ताई माणस (पुरुष )पुढचामागचा विचार करीत नाहीत. त्यांच्यानंतर हा उघड्यावर पडलेला संसार कसा सांभाळायचा ?असा प्रश्न जगू देत नाही आणि मरू पण देत नाही.” आपल्या जीवनाची चित्रकथा मांडताना तिने सांगितले की शेतात काम करताना नवऱ्याच्या डोळ्यांना काहीतरी लागले होते, त्याची शस्त्रक्रिया करायला ३०-४० हजार खर्च झाले. शेतीसाठी सावकारकडून १ लाख घेतले होते. दुष्काळामुळे पीक नाही आले आणि कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे नवरा लय काळजी करायचा. तेव्हा मी त्याला सांगायचे की “कर्ज काय राहत असत व्हाय, आज ना उद्या फिटेल की कशाला काळजी करता” पण त्यांनी एक दिवस न सांगताच आत्महत्या केली मागे फक्त एक पाच वर्षाचा व दुसरा आठ वर्षाचा मुलगा आणि कर्जात अखंड बुडालेला संसार राहिला. दोन दिवस रडायला लोक आली, आज कोणी विचारत पण नाही , सरकारने मदत दिली पण ७५ % रक्कम पाच वर्षासाठी पोस्टात टाकली. हातात उरले तीस हजार नाम संस्थेने १० – १२ हजार दिले पण एवढेसे पैसे कुठवर पुरणार? आता रोज सकाळी आज काय खायचं यांची चिंता पडते. मजुरीला जाते पण कधी आहे तर कधी नाही असा सगळा प्रकार. चार दिवस लोक आले वाईट वाटत म्हणून पोराकडे पाहून निघून गेले. आज पोरगा दिवसभर रडत बसला तरी कोणी पाहत नाही. पोरांना सगळ कळतंय आपला बाप असत तर ही हाल झाली नसती. त्यांना कोण समजवणार तुमचा बाप संकटाशी न लढता निघून गेला. त्याने धीर सोडला. पण मी नाही सोडला आणि सोडणार पण नाही. पोरांना शिकून मोठ्ठ करणार. आज पाऊस नाही म्हणून काय झालं अर्ध्या भाकरीवर जीवन काढू, पुढच्या वक्ताला येईल की पाऊस मग करीन पोराची हौस-मौज.
संस्था अशाच काही महिलांना रोजगार मिळावा म्हणून कार्य करते. यातून काहीजणी मशीन शिकून आणि बचत गटाच्या माध्यमातून जीवन सुधाण्यासाठी पुढे सरसावल्या आहे. आता गरज आहे शेतकऱ्यांनी समजण्याची की संकटाना सामोरे जाण्याची आणि कारभारीण कणखर आणि खंबीर आहे म्हणून तिला एकट सोडून न जाण्याची. सरकारने या विधवा आत्महत्या केल्यावर पैसे देण्यापेक्षा आत्महत्या करू नये म्हणून काम करावे.
एक विनंती : पाऊसपाणी नाही म्हणून दुष्काळ पडतोय हे मान्य आहे सावकारच, सरकारच कर्ज , पोरीचं लग्न आणि अजून बऱ्याच अडचणी आहे पण याच दु:ख तर घरातील स्त्री- पुरुषांना, नवरा- बायको असो आई –मुलगा या सगळ्यांना सारखं आहे मग आत्महत्या करताना पुरुष का आघाडीवर आहेत ? स्त्री म्हणून तिलाही या सगळ्या गोष्टीचं समान दु:ख आहे. ती परिस्थितीशी लढा देत आहे. ती सहनशील म्हणून तिच्यावर तुमच्या संसारच ओझं टाकून तिला असं अर्धवट वाटेत सोडून जाऊ नका.
(स्त्रीसक्षमीकरण पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेला लेख -एप्रिल २०१६)