Monday, 8 August 2016

सिर्फ नाम ही काफी है- डॉ. कलाम सदैव प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व


 'सिर्फ नामही काफी है' असं म्हणतात. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबाबतीत असंच आहे. डॉ. कलामराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीची उत्सुकता वाढू लागली. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बुक लव्हर ग्रुपचा एक प्रोग्राम होता, त्यावेळी मी त्यांच्या एका पुस्तकाविषयीचे मत मांडले होते. त्यामुळे डॉ. कलाम यांची फक्त राष्ट्रपती अशी  ओळख आहे यापेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे शास्त्रज्ञ आणि लहान मुलांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व अशी झाली. सकाळ वृत्तपत्रानं शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात माझा भाऊ गोविंदची निवड झाली होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम आले होते. लहान मुलांशी मनसोक्त संवाद साधून कोणाच्या डोक्यावर हात, तर कोणाशी हस्तांदोलन करुन आपलंसं केलं. त्यात गोविंदही होता. त्यानं ही आठवण सांगितल्यावर तर मला त्यांना भेटण्याची इच्छा अधिकच बळकट झाली. त्यानंतर वानवडीतील अपंग शाळेच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं समजलं आणि आम्ही  त्यांना पाहायला जायचं ठरलं. पण कसं भेटणार, असा प्रश्न मनात होताच. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी जाताना घराजवळील मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला होता. चौकशीअंती राष्ट्रपती या रस्त्यानं वानवडीला जाणार असल्याचं समजलं मी आणि माझा भाऊ राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट पाहू लागलो.
काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रपतींचा ताफा समोरून जाऊ लागला त्यात  दोन तीन मोठ्या काळ्या गाड्या आल्या , त्याचवेळी आमच्या सोबत प्रतीक्षा करत असलेल्या शाळेतील मुलांनी हात वर करून टाटा करत असल्याचा इशारा केला. नकळत आम्हीही त्यांना साथ दिली. आश्चर्य म्हणजे चक्क एका गाडीतून एका व्यक्तीनं प्रतिसाद दिला. काळ्या काचेतून धूसरशी दिसणारी ती व्यक्ती डॉ. कलाम होती. कलामसाहेबांनी आम्हांला टाटा केल्याचा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर पुन्हा वानवडीला त्यांना भेटायला जायचं ठरलं. त्या कार्यक्रमाचे पास नव्हते तरीही जायचं ठरले. निदान बाहेर उभा राहून भाषण ऐकता येईल म्हणून मी, भाऊ, मावसबहीण असे सगळे सायकलीवर निघालो. वानवडी चार ते पाच किलोमीटर अंतर लांब होती , म्हणून भरभर सायकल चालवत आम्ही वानवडीत पोहचलो पाहतो तर काय सगळीकडे कडक बंदोबस्त होता. काहीतरी कारण सांगून अपंग शाळेजवळ पोहचलो. तरीही 200 मीटर अंतरावर थांबवलं. त्यामुळं आम्ही तिथं पोहचताच 10 मिनिटांनी राष्ट्रपतींचा कार्यक्रम संपला. गाडीत बसण्यासाठी म्हणून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून किंचितस दर्शन झालं. आम्ही धन्य पावलो. मला दिसले मला दिसले  म्हणत पुन्हा घराकडे गेलो. त्यांना भेटायची अजून इच्छा निर्माण झाली.

पुढे पत्रकारिता शिक्षण घेण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्य वृतीच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं कळलं. माझा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांना समोरासमोर पाहायला मिळणार म्हणून आणि घरचे खूप आनंदी होतो. कार्यक्रमाच्या दिवशी आई आणि मी हॉटेल ब्लू डायमंडला पोहचलो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं हॉटेल पाहून डोळे दिपले. ज्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती तो क्षण आला. महामहीम कलामसाहेब याचं आगमन झालं,त्यांना डोळे भरून पाहिलं. शिष्यवृत्ती मिळालेल्या अनेक मुली होत्या. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते शिष्य्वृतीचं वितरण सुरु होतं. मनात एक भीती होती, माझी भेट होईल ना. तेवढ्यात माझं नाव पुकारलं मी पुढे जाऊन उभी होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर उभी राहण्याची संधी मिळाली होती. शिष्यवृत्ती स्वीकारताना त्यांनी माझी चौकशी केली. पदवीला कोणता विषय होता असे विचारले ?बँकिंग विषय असल्याचं बोलले तेव्हा, 'वेरी गुड, कीप इटअप! या विषयात काम करण्याची गरज आहे, 'असं बोलले.
  त्यांच्या या दोन वाक्यांनी आणि सोबत काढलेल्या फोटोनं माझ्यात एक नवा उत्साह संचारला. त्यांनी दिलेला संदेश कायम लक्षात ठेऊन कामाला लागले, 'देशभक्त होण्यासाठी देशाच्या सीमेवर लढायला जायची गरज नाही; फक्त आपलं काम प्रामाणिक आणि व्यवस्थित करा व आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिक्षित करा. नाही जमले तर आपल्या आई वडिलांना शिकवा. आणि नेहमी विद्यार्थी म्हणून राहा खूप मोठे व्हाल. 'त्यांच्या या संदेशानं माझ्या जडणघडणीत अनेक सकारात्मक बदल झाले. असा हा अवलिया कायमच माझ्या स्मरणात राहील.
माझ्या आयुष्यात मला जे काम करायचे होते ते करायला मिळाले नाही तेव्हा फार नाराज होते पण  कलामसाहेब यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन मी पुढे वाटचाल सुरु ठेवते. 

स्वप्न खरी होतात याचा प्रत्यय तुम्हाला भेटल्यावर आला. कोटय़ावधी ह्रदयांचे प्रेरणास्थान, राष्ट्राचा खरा रिअल हिरो, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत, राष्ट्राची खरी शान असणारा, राष्ट्रासाठी जगणारा आणि या राष्ट्राला 2020 व्हिजन देणारा महामानव यापेक्षा  खऱ्या अर्थाने दुरदृष्टी असलेला नेता. अशा नेत्याला आयुष्यात एकदा भेटायचं असं स्वप्न मी ही पाहिलेलं, एक दिवस प्रत्यक्षात उतरलं .विश्वास बसत नव्हता पण त्यांच्या हस्ते माझ्या दुसर्या स्वप्नाची मुुर्हूतमेढ होत होती. राष्ट्रपती या सर्वाच्च पदावर अत्यंत साधी राहणी, कुठलाही मेकअप नसताना चेहऱ्यावरील तेज, प्रेरणादायी बोलणे तुमच्याविषयी लिहीताना शब्द अपुरे पडत आहेत.

तुमची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागणार आहेत.आंबेडकर, टिळक, सावरकर, आगरकर आणि महात्मा गांधी किंवा भगतसिंग यांच्यासारखे अनेक देशासाठी लढणारे आम्ही पाहिले नाही पण देशाला योग्य दिशा देणारे कलामसाहेब पाहिले, यामुळे आमची पिढी खूप भाग्यवान आहे. आजच्या वातावरणावरून पुढच्या काळात तुमच्यासारखे खरे आदर्श व्यक्ती पाहायला मिळतील याबाबत मला शंका वाटते.
तुम्ही आयुष्यभर प्रेरणादायी राहाल यात काही शंका नाही. 

1 comment: