मैत्री म्हणजे आपल्या
जीवनातील सुंदर गोष्टी असते. त्यात रुसवे-फुगवे, भांडण-प्रेम आणि अजून बरेचं काही असते. माझ्या नशिबाने मला सगळे मित्र-मैत्रिणी
चांगले मिळाले. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटता येतो. नेहमी सुख –दु:खात या सगळ्यांनी
साथ दिली. त्यातही विशेष करून माझ्या सगळ्या मैत्रिणीनी. अगदी शाळेपासून आज पर्यंत
अनेक मैत्रिणी माझ्या आयुष्यात आल्या. त्यांच्यासोबत मी घडले, कधी पडले तर कधी रडले ही.....
आज अश्याच काही
मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. लहानपणापासून घराच्या
आजूबाजूला फार शेजारी नसल्यामुळे शाळेतील मैत्रिणी याच माझ्या जिवाभावाच्या
मैत्रिणी होत्या. आजही आमची मैत्री टिकून आहे. फक्त सगळ्याजणी आपआपल्या आयुष्यात
व्यस्त आहेत . त्यामुळे पूर्वीसारखे बोलणे किंवा भेट होत नाही. पण अजून सणासुदीला
मेसेजवरून संवादाची देवाणघेवाण सुरु असते. अधूनमधून लग्नकार्यात भेट होत राहते. पण
कधी कधी जुने दिवस आठवून मित्र-मैत्रिणीची आठवण येते. असो तर आज या मैत्रिणींच्या समवेत
घालवलेले काही क्षण त्या दिवसांचा आनंद पुनश्च घेणार आहे.
सुरुवात घरापासून माझी बहिण पदमा ही माझी पहिली मैत्रीण. आम्हांला
शेजारी हा प्रकार फार रुचला नाही म्हणून लहानपणी माझे बहिण- भाऊ हे माझे विश्व
होते. माझ्या सगळ्या कामात मदत करायला बहिण असायची म्हणून आमचं बहिणी बहिणी नातं
तर होतच पण त्यात मैत्रिणी म्हणूनही आमचं छान जमायचं. शाळेतल्या गप्पा- गोष्टी करायचो. लहानपणीचे
खेळ आम्ही एकत्र खेळायचो. वेगवेगळी खेळणी हवे यासाठी कधी भांडण केलं नाही. काही
चूक केली तर आई-बाबाचा मार खाऊ नये म्हणून एकमेकींची बाजू व्यवस्थित सांभाळून घेत असू. शाळेत – कॉलेजात गेल्यावर आम्हांला तिथल्या मैत्रिणी मिळाल्या तरीही आमची
मैत्री टिकून राहली. माझे काम तिचं कॉलेज, अभ्यास या सगळ्यामुळे आमच्या मैत्रीत
थोडं अंतर आलं. पण तरीही घरी आल्यावर आमच्या गप्पा सुरु असायच्या. मला आठवते
आमच्यात कधी कधी भांडण, रुसवे, फुगवे व्हायचे तेव्हा मी मात्र एक गाणं आठवत असे
‘फुलों का तारों का कहना है, लाख हजारो में मेरी बहना हैं.’सारी उमर हमे संग रहना
हैं. आजही आमचे भांडण झाले की हेच वाटते. आम्ही अनेक आनंदाचे क्षण आणि दुःखाचे
प्रसंग एकत्र अनुभवले आहेत. तेव्हा माझी पहिली मैत्रीण अशीच आयुष्यभर टिकून राहावी
असे मला वाटते.
आता
शाळेतील मैत्रिणीनी विषयी काही गोष्टी. घोरपडीच्या शाळेत आमचा वर्ग सर्वात हुशार होता. आम्ही अ तुकडीचे विद्यार्थी होतो. म्हणून
कधी वर्गात जास्त दंगा –मस्ती व्हायची नाही. पण तरीही आम्ही शिक्षक नसताना खूप
दंगा करायचो . तेव्हाच एका बाकावर बसणाऱ्या गौरी आणि अमृता यांच्याशी छान माझी मैत्री झाली.
आम्ही एकत्र खूप मस्ती करायचो. आमची मैत्री शाळा, कॉलेज असा प्रवास करत आजही सुरु
आहे. आम्ही एकच क्लास लावला होता म्हणून जवळपास दिवसभर एकत्र असायचो.. क्लास
मध्ये गप्पा, क्लास सुटल्यावर गप्पा आणि घरी जातानाही गप्पा अश्या न संपणाऱ्या
गप्पा चालायच्या. एकदा आमचा हा प्रकार पाहून क्लासचे सर म्हणाले होते तुम्ही कशाला
घरी जाता इथेच एक घर बांधून देतो मग बसा एकत्र गप्पा मारत. त्यावर आम्ही हसलो आणि
सर जाण्याची वाट पहिली, पुन्हा आमचं सुरु अशी आमची मैत्री. आम्ही एकत्र अभ्यास
करायचो तेव्हा प्रिया आणि गौरी मला आकाउंट शिकवत असत. दिवसभर ग्रंथालयात बसून आम्ही अभ्यास करायचो आणि
मग एकमेकींबरोबर जास्त वेळ मिळावा म्हणून ५ किलोमीटर वाडिया ते घर असे अंतर चालत
जायचो. ते अंतर आता किलोमीटर मध्ये सांगताना फार मोठे वाटते पण तेव्हा गप्पा मारत
असताना घर कधी यायचं कळतही नसे. मधल्या काळात सगळ्यांचे करियर यामुळे आमच्या
मैत्रीत थोडा दुरावा आला पण जेव्हा अमृताच लग्न झालं तेव्हा मात्र आपली मैत्रीण
आता दुसऱ्या कोणाची तरी झाली याची थोडीशी जाणीव झाली. पण आजही आमची मैत्री अशीच
अखंडपणे व्हाटस ऑपच्या माध्यमातून सुरु आहे.
या काळात मला आणखीन एक
मैत्रीण भेटली सोनाली माने. कॉलेज संपल्यावर खरतर आमची मैत्री छान खुलली. एका घटनेमुळे
आमची मैत्री आणखीन पक्की झाली. तिच्या सारखी कष्टाळू आणि मेहनती मुलगी मी पहिली
नाही. कॉलेजमध्ये असताना खूप कष्ट करायची आजही आपला संसार आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी
तिची धडपड सुरूच असते. तिने मला नेहमी सुख -दु:खात मला साथ दिली आणि कायम सोबत राहिली. तिच्यामुळे मला मन मोकळे करायला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. अडचणीच्या वेळी मला न विसरता तिची आठवण येते. मग तीही धावत येऊन मला मदत करते. आयुष्याशी सुरु असलेला संघर्ष हाच आमच्या मैत्रीचा नाजूक धागा आता
मजबूत झाला आहे आणि त्याने आमची मैत्री घट्ट टिकवून ठेवली आहे.
एमसीजे करताना पूजा आणि रश्मी, कीर्ती, माधवी,
नायना, अनुया अश्या मैत्रिणी मिळाल्या. अनेक कार्यक्रम आणि अभ्यास करत असताना आमची
मैत्री आकार घेत गेली.पण कॉलेज लाईफ संपताना सगळ्या आपआपल्या कामासाठी त्या दिशेने निघून गेले. त्यामुळे आमच्या मैत्रीत अंतर पडत राहिले पण तरीही आम्ही अनेक आनंदाचे क्षण एकत्र जगलो.
मी आणि पूजा फक्त पुण्यात शिल्लक राहिलो, बाकी सगळ्या पुण्याच्या बाहेर गेल्या. तेव्हा
माझी आणि पूजाची मैत्री फुलली. एकमेकींच्या सगळ्या सुख- दुखाच्या क्षणाचे आम्ही दोघी
साक्षीदार आहोत. करियर असो वा घरगुती सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही एकत्र सोडवली आहेत. आणि आजही सोडवतो. समाजातील कोणत्या गोष्टीवर गप्पा करायच्या असो वा पुण्यात कुठे खरेदी
करायची असो आमची जोडी दिसणारच. तुळशी बाग तर अगदी आवडीचे, काही खरेदी करण्यासाठी असो
वा मनसोक्त फिरण्यासाठी महिन्यातून दोन –तीन वेळा तुळशी बागेत आमची चक्कर होत असे.
आता ते कामामुळे शक्य नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण अजूनही अधून-मधून आम्ही भेटतो,
शक्यतो ती भेट तुळशी बागेत असते.
जागृती यात्रेत अजून अशीच
एक जिवाभावाची आणि अत्यंत प्रेमळ मैत्रीण भेटली. ती म्हणजे अनिता कुलकर्णी. आमच्या
ग्रुपमध्ये आम्ही तिला कसब्यातील सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठे व्यक्तिमत्त्व म्हणतो.
पण ती खरचं ती मनाने मोठी आहे. सगळ्या ग्रुपची ताई आहे. अजून एक मोठी ताई आहे ती
म्हणजे सुवर्णाताई. या सगळ्या मैत्रिणीमुळे जागृती यात्रेत आमचा चांगला ग्रुप तयार
झाला आहे. त्यामुळे आम्ही गुंज सारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले. सगळ्याच्या अडीअडचणीला सहकार्य करायचे असे
धोरण न करताही आमचा ठराव झाला आहे. अनिता अशी व्यक्ती तिने मला शस्त्रक्रियेच्या
वेळी मला आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी अनेकांकडे माझी बाजू मांडली. त्यामुळे
कित्येक लोकांनी अनिताच्या बोलण्यामुळे मला मदत केली. खरच सगळ्यांना मैत्रीण अशी मिळावी
म्हणजे आपलं आयुष्य सुकर व्हायला वेळ लागत नाही.
त्याचबरोबर
डॉ श्रद्धा हीसुद्धा अशीच सगळ्यांना सहकार्य करणारी माझी मैत्रीण. तिची माझी तशी
मैत्री नवीन पण आमचं नातं छान जुळले आहे . ती पण लीला पूनावाला फाऊनडेशनची आहे ,
अशी ओळख झाल्यावर अजून एक आणखीन नात जोडल गेले . काहीही वैद्यकीय अडचण असेल
केव्हाही फोन करा किंवा मेसेज करा ती समाधानकारक उत्तर देणार आणि आपली समस्या
सोडवणार. वेगवेगळ्या क्षेत्रातील मैत्रिणी असल्यामुळे असा फायदा होतो. याची जाणीव
मला अत्यंत गरज होती तेव्हा झाली. श्रद्धा माझ्या अडचणीला धावून आली आणि त्याचा मोबदला
म्हणून तिने फक्त धन्यवाद घेतले . अशी मैत्रीण शोधून पण सापडणार नाही.
या
सगळ्याबरोबर आणखीन काहीजणी माझ्या मैत्रिणी आहेत. पण त्यांच्याशी मला मिळालेला वेळ
यांच्यापेक्षा तुलनेने कमी होता. पण जो वेळ मिळाला त्यामुळे आयुष्यात कधी मैत्रीची
कमतरता भासली नाही. त्यामध्ये रेखा ही मैत्रीण आहे पण मानलेल्या भावाची बायको
असल्यामुळे तिच्याशी लाडकी वाहिनी म्हणून अस जास्त नातं आहे. ती नेहमी मोठ्या हक्काने
माझ्या चांगल्यासाठी काही गोष्टी सांगत असते. तर स्वाती, रमापाली या शाळेपासून वाडिया
कॉलेजपर्यंत वर्गमैत्रिणी होत्या. मी जेव्हा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आयोजित
करायचे तेव्हा या दोघी आणि इतर काहीजणी माझ्या हक्काच्या प्रेक्षक म्हणून उपस्थित असायच्या.यामुळे
निदान माझा कार्यक्रम पडायचा नाही.
मनीषा,
इंदूप्रिया, तन्वी, अनघा ,मोहिनी, आश्लेषा, अंजली या सगळ्या मैत्रिणी आणि लीला
पूनावाला फाऊनडेशन मधील विद्या, हर्षदा, स्नेहल, ज्योती, रुपाली तसेच माझ्या सोबत
लंडनला आलेल्या सगळ्याजणी, काही निर्माणी मैत्रिणी अशी अजून खूप मोठी यादी आहे. या
सगळ्यांकडून मी बरेच काही शिकवले आहे.
अश्या
सगळ्या जिवाभावाच्या मैत्रीमुळे आपले आयुष्य सर्वगुण संपन्न होते...... हे मात्र
खर आहे.!
No comments:
Post a Comment