Monday, 12 October 2015

आई जन्माची शिदोरी .... सरतही नाही उरतही नाही





 काल सांगितले होते तसे आज नवरात्राचा पहिला दिवस जिच्यामुळे हे जग पाहायला मिळाले, तेव्हा या लेखमालिकेची सुरुवात जन्मदाती आईपासून करते, सगळ्यांना आपली आई फार प्रिय असते, गरिबापासून श्रीमंतापर्यंत म्हणून तर आईविना भिकारी तिन्ही जगाचा स्वामी अशी म्हणतात. ईश्वराचे पृथ्वीवरील रूप म्हणजे आई अशी आईची ख्याती सांगणारी अनेक वर्णन आपल्याला पुस्तक –कादंबरीत वाचायला मिळतात पण तशी आई मिळायला पण भाग्य लागत, खोटी स्तुती नाही करत ती आहेच तशी.

लहानपणी शाळेत असताना घराचे आर्थिक गणित सांभाळताना आई- बाबांची होणारी तारांबळ पाहून आपण लवकर मोठे व्हावे आणि त्यांना कामाला लागून घरी मदत करावी असे सारखे वाटायचे. त्यामुळे आपण फार हट्ट करू नये असा समजूतदारपणा यायला वेळ लागला नाही. माझे बाबा गाव सोडून पुण्याला कामासाठी आले, त्यामुळे गावाकडून येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुण्यात आश्रयासाठी आमचे घर नेहमी उघडे असायचे. बाबांनी  सगळ्या लोकांना आमंत्रण दिलेले होते समजा त्यांचे म्हणणे असायचे की आपण पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा कोणीतरी आपल्याला मदत केली होती, आता आपली वेळ आहे . या तत्वानुसार महिन्यातून सात – आठ लोक गावाकडून आमच्या घरी यायचे , कधी वारकरी तर कधी पुण्यात मोठ्या दवाखान्यात इलाज करण्यासाठी तर कधी उपजीविकेसाठी आलेले लोक, कधी भजनी मंडळी अश्या सगळ्या लोकांनी आमचे घर भरलेले असायचे, त्यांचा स्वयंपाकापासून धुणी- भांडी सगळ काम माझी आई करायची, लहान असल्यामुळे आमची फार मदत व्हायची नाही . तेव्हा आईला आमचे आणि पाहुण्यांचे काम करून कामाला जावं लागायचे, तेव्हा आई गवंडी काम करायची , रोज डोक्यावर विटा आणि रेती वाहायची , दिवसभर काम करून आल्यावर पुन्हा घरचे काम करायची, कधी तक्रार न करता आई सगळ काम करायची, बालपण संपून आम्ही कॉलेजला जाईपर्यंत अश्या प्रकारची अनेक लोक आमच्या घरी पाहुणे आले काही पुण्यात स्थायिक झाले १०० पेक्षा अधिक लोकांचा पुण्यातील पहिला मुक्काम आमच्या घरी होता. त्यातील अनेकजण उपकार विसरले ती वेगळी गोष्ट आहे. पण या सगळ्यांचा पाहुणचार आईने केला. आईला बालपणी पासून काम करायची सवय यामुळे तिला या सगळ्या कामाचा त्रास जाणवला नाही. पण आज उतरत्या वयात सांधेदुखी आणि आजारांनी तोंड काढले त्याला पुराश्रमीचे काम आहे.

तिने फक्त बाहेरच्याच नाही तर घरातील सगळ्यांसाठी खूप केले. बाबांच्या अपघाताच्या वेळी आमच्या घराला ज्याप्रकारे सांभाळले त्यामुळे आईच्याविषयीचा आदर आणखीन वाढला. तिने फक्त आम्हाला घरातले काम शिकवले तसे शिक्षणासाठीही प्रोत्साहन दिले. ती शाळेत गेली नाही पण आम्हाला मात्र उच्च शिक्षणासाठी पाठिंबा दिला ,आमच्या घरातून म्हणजे सगळ्या नातेवाईकामधून मी पहिल्यांदा दहावी पास झाले, तेव्हा नातेवाईकानी लग्नासाठी पुढे शिक्षण नको असे सांगितले,पण आई आणि बाबांनी मला पुढच्या शिक्षणासाठी परवानगी दिली. ही बाब आज कमी महत्वाची वाटत असली तरी तेव्हा ती परवानगी माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी होती. पुढे अश्या अनेक निर्णयात आईने माझी बाजू समर्थपणे सांभाळली आहे. कॉलेजची ट्रीप असो वा मला कुठे जायचे असेल तर आईने टिपिकल आईसारखे न वागता आम्हाला परवानगी दिली त्यामुळे आम्ही आजही आई-वडिलांचा विश्वास तोडला नाही. लोक किंवा नातेवाईक बाहेर सोडल्यावर बोलयचे की मुलगी वाया जाईल पण त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला म्हणून तर जेव्हा मला लंडन जायची वेळ आली तेव्हा एक मिनिटाचा विलंब न करता परवानगी मिळाली. आपला देश सोडून जाताना पुन्हा नातेवाईकांनी टोमणे मारले तेव्हा आईने त्यांना चांगले झापले. अशी संधी मध्यमवर्गीय कुटुंबात सहजासहजी मिळत नाही तेव्हा नाही म्हणणे आपली घोडचूक असेल हेही समजावले. अश्या प्रकारे मला आणि माझ्या कुटुंबाला आईने मोठ्या हिंमतीने आधार दिला,
      कधी कधी आयुष्यात वाईट प्रसंग आले तरी आई- बाबा सोबत राहिले. पत्रकारिता कोर्सला प्रवेश घेतानाही सुरुवातीला विरोध होता पण मला राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आईला कार्यक्रमाला घेऊन गेले होते तो सोहळा आईने बाबांना सांगितले पोरगी काहीतरी वेगळ करत आहे एक संधी देऊन पाहू. पत्रकारिता कोर्स पूर्ण झाल्यावर ५०० उमेदवारांतून सकाळच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली होती पण शेवटी अपेक्षित निकाल न आल्याने मी निराश झाले होते, एक मोठे स्वप्न तुटलं होत, त्यावेळी बाबांनी दुसरी नोकरी मिळेल असे सांगितले तर आईने मला आत्मविश्वास दिला तू एक दिवस खूप मोठी होशील. मी पुन्हा कामाला लागले. वाढत्या वयानुसार आपले प्रश्न स्वत सोडवू लागले पण एक दिवस नक्की चांगले होईल असा तिचा विश्वास मला नेहमी प्रेरणा देत राहला.

आयुष्य असचं सुरळीत सुरु असताना माझ्या भावाला मोठ्या आजाराने ग्रासले आहे , याची जाणीव झाली. त्याची किडनी खराब झाली होती म्हणून त्याच्यावर उपचार सुरु केले, पण परिस्थितीची गंभीरता पाहता शस्त्रक्रिया केल्याशिवाय उपाय नाही असे लक्षात आले. म्हणून कोणाची द्यायची याची चाचपणी सुरु असताना आईने होणार दिला, दवाखान्यातील सगळे सोपस्कार उरकले आणि कामाला लागलो , आर्थिक मदतीसाठी माझी धावपळ सुरु होती. तेव्हा आई स्वत: मोठा त्याग करून किडनी द्यायला तयार होती पण माझी धावपळ पाहून ती माझी जास्त काळजी घेत असे. अनेक वाईट- चांगल्या गोष्टी घडत होत्या तेव्हा आई स्वत: दाता असून मानसिक आधार मला द्यायची.  जेव्हा शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर आईला भेटायला गेलो तेव्हा तिच्या तोंडातून पहिला शब्द गोविंद कसा आहे.? ती स्वतः अतिदक्षता विभागात होती परंतु तिला भावाची काळजी वाटत होती .अश्या प्रकारे तिने माझ्या भावाला पुनर्जन्म दिला. तरीही माझी व बाबांची धावपळ होते म्हणून त्यांची काळजी करत असे.

दवाखान्यातून घरी आल्यावरही मला एकटीला सगळ काम काराव लागत म्हणून तर कधी बाबांची फार धावपळ होते अशी चिंता करायची पण त्याचवेळी तिला शस्त्रक्रियेमुळे त्रास होत असताना दुसऱ्यांची काळजी घेत असे. एवढचं काय तर मावशी मदतीला येते, तिची धावपळ पाहून तर कधी कधी  रडतही असे. अशी माझी आई जी सगळ्याची काळजी घेते. वेळप्रसंगी कठोर होऊन समज देते. आणि निराश असल्यावर प्रेरणा देते. एखाद पाऊल पुढे टाकताना आशीर्वाद देते आणि खंबीरपणे पाठिंबाही देते. गरज असेल तेव्हा स्वता:चा विचार न करता मुलांना सुखी ठेवण्यासाठी धड्पते .


म्हणून तर आईसारखे दैवत दुसरे जगात नाही. आई या विषयावर हा लेख पुरेसा नाही
 संपूर्ण कादंबरी लिहावी लागेल. तरीही तिची महानता मांडता येणार नाही. 

No comments:

Post a Comment