नातवंड
म्हणजे आजी -आजोबांच्यासाठी दुधावरील साय असते. घरात आई-बाबापेक्षा कोणी जर जास्त लाड
करत असेल तर ते म्हणजे आपले आजी- आजोबा. आजकाल एकत्र कुटुंब पद्धत जरा कमी होत आहे
, त्यामुळे मुलांना आजी -आजोबांचे प्रेम, लाड आणि शिकवण मिळत नाही . त्यामुळे शहरातील मुले
एकटी पडतात त्यामुळे नवीन समस्या वाढू लागल्या आहेत. पण आमचे नशीब चांगले की होते
म्हणून मला दोन्ही कडील आजी-आजोबा यांच्यासोबत राहता आले. त्यांच्याकडून आमचे लाड पुरवून
घेतले.
आज मी इथे उल्लेख करणार आहे, तो माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीचे, म्हणजे माझ्या आईची
आई. आम्ही तिला बाई म्हणायचो गावात सगळे तिला मथुराबाई म्हणत. तिचं नाव मथुरा होत पण
तिच्या जावा-भावाजायांमध्ये ती सगळ्यात मोठी सून होती म्हणून सगळे दीर, नंदा आणि जावा पण
आदराने बाई म्हणत असे. ती सगळ्यात मोठी सून असल्याने माझी आई हिची पाहिलं अपत्य म्हणून
ती सगळ्या बहिण -भावात मोठी आणि माझ्या आईचं मी पाहिलं मुल म्हणून मला सगळ्या
नातवंडामध्ये मोठं असल्याचा मान मिळला. माझे लाड मला कळायच्या आधीपासून सुरु होते
, याची माहिती आईकडून कळाली. पूर्वी मुली झाल्यावर फार आनंद होत नसे कारण सगळ्यांना
वंशाचा दिवा हवा असतो, तसे पाहता आजही काही अपवाद सोडून आनंद होतो असं नाही , कारण
एकविसाव्या शतकातही मुलींची जन्म
घेण्याआधीच हत्या होत आहे. पण मी नशीबवान आहे माझ्या वाट्याला असे नाही आले नाही.
मुलगी असून माझे खूप लाड झाले. आजच्या मुलांसारखे लाड नाही जी वस्तू मागितली ती
पालक आणून देतात मग ती कितीही महाग का असे ना. असे माझ्या तरी बालपणी नव्हत, फक्त प्रेम
आणि त्याची किंमत पैश्यात कधीच करता येणार नाही असे लाड आमचे झाले.
मी
दोन-तीन वर्षाची असतानाच आई –बाबा पुण्यात कामासाठी आले. पुण्यात तुटपुंज्या
पगारात संसार कसा चालवायचा तसेच आई-बाबा कामाला गेल्यावर माझी काळजी कोण करणार
म्हणून मला गावाकडे बाबांच्या घरीच ठेवले होते. इकडे सगळ्या चुलत्या आणि आजी होती
पण त्यांचे काम आणि सुगीची शेतातील कामे यामुळे माझ्या लाडक्या आजीने मला तिच्या घरी
नेले. तिथे दोन मामा मावश्या यामुळे माझ्यावर लक्ष ठेवायला होते. तरीही माझी आजी
माझा फार लाड करायची. नेहमी तिच्यासोबत ठेवत असे. मी अचानक आजारी पडल्यावर मरणाच्या
दारातून मला परत आणले. तेव्हा मोठे दवाखाने नव्हते पण तिने माझी खूप काळजी घेतली. पुढच्या वर्षी मी आईसोबत पुण्याला आले.तेव्हा
मी आजीची सारखी आठवण काढत रडायचे. असे आई सांगते.
दरवर्षी
उन्हाळ्याची सुट्टी लागण्याची वाट पाहत असून कारण मामाच्या गावाला जायला आम्हांला
फार आवडायचे. आजी दरवर्षी शेतातील बोर गोळा करून ठेवायची, सुकलेली बोर खाण्याची
मज्जा काही वेगळी आहे. आम्ही गेल्यावर त्याच बोरकूट बनवायची. आमच्यासाठी हुरडा ,
धिरडे , थालपीठ आणि असे कितीतरी पदार्थ बनवत असे . मला तर आता काही पदार्थांची नाव
आठवत नाही असे सगळे आमच्यासाठी बनवायची. तिच्या हाताला फार चव होती म्हणून तिच्या
हातच्या फोडणीचे वरण अजून आमच्यापैकी
कोणलाही येत नाही. बाबा आजही म्हणतात फोडणीचे वरण करावे तर सासुबाईनी . आम्ही
सगळ्याजणी स्वयंपाक करायला लागलो पण तिच्यासारखे चविष्ट आम्हांला बनवता येत नाही.
तिच्या हातचे लोणचे तर त्याची चव अजून जिभेवर आहे,नाव काढले तरी पाणी येत तोंडाला
असे बनवत आहे. म्हणून तर आमच्या मामाच्या गावामध्ये कित्येक लोक तिच्या हातून
लोणचे बनवून घेत असे. सगळ समान त्याचं पण फक्त ते एकत्र करण्यासाठी आजीला बोलवत
असे. तिच्या हाताने बनवलेला लोणच काही खराब होत आहे, अशी श्रद्धाच होती लोकांची
तसेच ताक करायला पण तिलाच मागणी होती , म्हणून आजीच्या घरी कधी दही, ताकाची कमी
नसायची, घरी गाय किंवा म्हशी नव्हत्या पण आजी ताक बनवायला गेल्यामुळे लोक मोठ
भांडे भरून दही-ताक देत असे.दिवाळी किंवा उन्हाळ्यात सगळ्या मावश्यांची मुले पण
मामाच्या गावाला येत असे. तेव्हा धमाल सुरु असायची आमची, लहान असल्यामुळे सकाळी
आजीच्या हाताच्या चुलीवरील गरमागरम भाकरी आणि पिठलं त्यासोबत मिरची चटणी हा मेनूच
अत्यानंद देत असे. मग तो माळवदावर (टेरेस) बसून खात निसर्गाच्या सानिध्यात त्याची
चव घेत असो. सोबतीला झाडावरील पक्षी आणि वानर पण असत . लांबवर हिरवीगार शेत दिसतं.
नंतर आजीसोबत शेतात जाऊन नुसता धिंगाणा घालायचो कारण आई तिकडे नसायची, शेतातील
आंबे , कैरी , बोर , सीताफळ असे अजून काही याची मौज लुटायचो.कधी कधी वाटत पुन्हा
ते दिवस यावे.
दिवाळीच्या
सणाला आम्हाला एक एक रुपयाची सुगंधी साबण मिळायची , तेव्हा ती फार
मोठी गोष्ट असायची कारण सगळ्यांना आपली आपली साबण म्हणून आनंदी असायचो आम्ही. दिवाळीतील आजीने बनवलेले पदार्थ यांना जी चव असायची ती आजच्या मोठ्या मिठाई दुकानातल्या
पदार्थांनाही नसते. तुम्हांला खोट वाटेल पण हेच सत्य आहे.
सगळी
नातवंड आली तरी आजीचं माझ्यावर जास्त प्रेम असायचं का ते माहित नाही, पण वेळोवेळी
ते जाणवायचं, माझ्या आवडीचे पदार्थ जास्त बनवले जात असे, आजीने बनवलेली भजी आणि
त्याची काळ्या वाटणाची भाजी मस्त मज्जा असायची. कोणी रागवले तरी ती माझी बाजू घ्यायची.
अनेक वेळा असं व्हायचं. पुण्यात आमच्या घरी आल्यावर आई कधी रागवली तरी ती माझी
बाजू घ्यायची. किती अभ्यास करावा लागतो म्हणून चिंता करायची. तर कधी किती लांब शाळेत
जावं लागत याची काळजी करायची. माझे केस मोठे व्हावे म्हणून किती देवाला नवस बोलली
असेल माहित नाही . पुण्याला आली किंवा आम्ही गावाला गेलो की मला नेहमी एका देवाचा
अंगारा लावत असे.
अश्या
अनेक आठवणी आहेत, पण त्यांना सगळ्यांना मांडता येईल असे नाही . त्या सगळ्याना शब्दरूप देता येईल अस पण नाही. कधी कधी असे वाटते की आपले लाड करणारे कोणी तेव्हा मात्र
आजीच्या आठवणीने डोळे भरून येतात आणि तू परत ये असं म्हणावं वाटत. येणे शक्य नाही तरीही.
१०
-१२ वर्ष झाले असतील आजी जाऊन पण तिच्या आठवणी माझ्या मनातून कधीच गेल्या नाहीत.एके
दिवशी अचानक आजी गेल्याचा फोन आला तेव्हा आई- बाबा गावाला गेले, कॉलेज असल्यामुळे
जाता आले तसेच आई- बाबा गावाला जाणार म्हणून माझ्यावर घराची जबाबदारी होती . त्या
वेळी विश्वास बसत नव्हता की आपल्यावर जीवापाड प्रेम एकुलती एक आजी या जगात नाही
.अंत्यविधी समोर पहिली नाही म्हणून ती याच जगात आहे असे वाटायचे, पण जेव्हा आई
गावाकडून आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागली तेव्हा मात्र माझा बांध फुटला
मीही खूप रडले पण पुढ्या क्षणाला सावध होऊन आईला रडू नको म्हणून बोलले. कारण आईची
अवस्था रडून फार वाईट झाली होती. माझे अश्रू माझ्याचं डोळ्यात राहिले. पुढे अनेक
दिवस हे असे चालले मी मात्र माझे दुख दाखवू शकले नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या
व्यक्ती साठी रडू पण शकले नाही. आज मात्र तिच्या आठवणींनी पुन्हा डोळ्यात पाणी
आले. म्हणून आज म्हणावं वाटत तू परत येशील का ? तुझ्या सारख प्रेम आणि लाड करणारी कोणी नाही ग ........
.
No comments:
Post a Comment