आपल्या सगळ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे आहे. शिक्षक असे मार्गदर्शक आहेत की, जे आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची कला शिकवतात. लहानपणी आई-बाबा पेक्षा शिक्षक अधिक वेळ आपल्यासोबत असतात. दिवसभर आई-बाबा कामाला तर घरी आल्यावर आपलं खेळणं-क्लास यामुळे पालकांसोबत तसा कमी वेळ मिळतो. जास्त वेळ असल्यामुळे शिक्षक आपल्यावर अधिक चांगले संस्कार करतात. तसे मलाही शाळेत चांगले संस्कार करणारे शिक्षक भेटले. कॉलेजमध्ये शिकत असताना शिक्षकांशी नातं जुळत नाही असं ऐकले होते. पण माझी कॉलेजच्या शिक्षकांशी चांगली गट्टी जमली. म्हणून तर आजही अनेक संपर्कात आहेत. यामुळेच मी इतरवेळी नाही निदान गुरुपोर्णिमेला तरी मेसेज करायला विसरत नाही. अश्याच एका ध्येयवेड्या शिक्षिका वृषाली रणधीर मॅडमशी माझी मैत्री झाली. मैत्री या अर्थाने त्या शिक्षक या नात्यापेक्षा मैत्रिण म्हणून आमच्याशी वागत असत. आम्ही सगळ्या चांगलं –वाईट गोष्टी शेअर करायचो तसं आजही करतो. फक्त प्रमाण कमी झालं. पूर्वी मित्र-मैत्रिणीचे भांडण सांगायचो आता आयुष्याशी सुरु असलेले भांडण सांगतो. मी अकरावीपासून कॉलेजच्या साहित्य परिषद ग्रुप मध्ये काम करत असायचे. त्या सिनिअर कॉलेजला शिकवत होत्या. माझी कविता का लेख नक्की आठवत नाही यावरून विषय निघाला आणि माझी त्यांची ओळख झाली. पुढे कॉलेजच्या अनेक कार्यक्रमात आमची भेट होत राहिली.
एके दिवशी त्या एका उपक्रमावर काम करत असल्याचे कळले. शिका आणि कमवा या योजने अंतर्गत काम करण्यासाठी कोणीतरी शोधात होत्या. मला याबाबत चौकशी केली असता मी होणार दिला. कॉलेज करून तिथंच दोन तास काम करायचे आणि त्याचे पैसे पण मिळणार यामुळे कॉलेजच्या खर्चाचा भार जरा कमी होईल म्हणून मी खुश होते. आई-बाबांना याची कल्पना दिली आणि त्यांची परवानगी मिळाली. काही दिवसात काम सुरु झाले. पहिल्यांदा आपण जिथे शिकतो तिथ काम कसे करणार याची लाज वाटत होती. पण हेच काम माझी ओळख होईल याची कल्पना नव्हती. उपक्रम असा होता की सहकारी तत्वावर दुकान सुरु करायचं आणि तो बिझनेस म्हणून मोठा स्वरुपात व प्रत्यक्षात उतरायचा . ज्यामुळे कॉलेजमधील मुलांना सहकारी संस्थेचा प्रत्यक्षात अभ्यास करता येईल आणि कामाचा अनुभव घेता येईल. एकूणच काही दिवसात आमचं काम जोरदारपणे सुरु झालं. कॉलेजच्या मुलांकडून न्यूनतम रक्कम घेऊन भांडवल उभ केलं. आणि मुलांना प्रक्टिकल बुक बाहेरून घेण्याऐवजी आमच्याकडून विकत घ्या असे सांगितले. अश्या पद्धतीने मॅडमचे विचार प्रत्यक्षात रूप घेऊ लागले. या सगळ्यात मी अगदीच नवीन आयुष्यातील पहिला जॉब होता. त्यामुळे बिझनेस कसा सुरु करायचा याचे प्रशिक्षण मिळाले. शेअर आणि dividant, शेअर होल्डर, सहकारी संस्थाचे काम कसे चालते याचे ज्ञान मिळाले. हे विषय अभ्यासक्रमात होते पण हे सगळे विषय या कामामुळे आधीच अभ्यासून झाले व प्रत्यक्ष उपयोगही केला. हळूहळू कामाची व्याप्ती वाढत गेली. माझ्यात पहिल्यापेक्षा बरेच बदल घडत गेले. जी मुलगी कॉलेजच्या पहिल्यादिवशी घाबरत आत येत होती, (टीव्हीत पाहिलं होत पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांची रागिंग होते) ती आज सगळ्या कॉलेजमध्ये मनमोकळेपणे वावरत होती .अनोळखी मुलांना बोलणे पाप असते असे समजणारी सगळ्यांशी गप्पा मारत होती.
लहानपणी टी.व्ही वरील मालिकेत शेअर वर चर्चा व्हायची तेव्हा काय भानगड आहे असे वाटायचे, मोठं झाल्यावर आपण शेअर घेऊ म्हणजे श्रीमंत होता येईल असे वाटत होते. या कामामुळे त्या शेअरचा उलगडा त्याची व्याख्या पुस्तकात शिकण्याआधी झाला होता आणि सगळं खरं-खोट उघड झालं. आता कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी ओळख झाली होती. सहकरी संस्थेत आलेल्या सर्वांशी गप्पा व्हायच्या. यामुळे संवादकौशल्य वाढ आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकास होत होता. या बदलास कारण की रणधीर मॅडम. त्यांनी मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळले. सगळ्या गोष्टी शिकवल्या. कधी कोणाशी कसे बोलायचे शिकवले. एक घटना आठवते, कॉलेजमधील कर्मचारी व आमच्यामध्ये काहीतरी कामावरून वाद झाला मी मॅडमला बोलले आपले बरोबर आहे, जाऊन चांगले सुनवू का ? पण त्यांनी सांगितले ते पदस्थ अधिकारी आहेत, तू विद्यार्थी जर आता बोलली तर तुझे नुकसान होईल. काम जाईल त्याचा पुढच्या शिक्षणावर परिणाम होईल. अश्यांना त्यांच्याच भाषेत पण वेळ पाहून उत्तर द्यायचे अशी मोलाची शिकवण दिली.
संस्थेचे सगळे व्यवहार बँकेच्या माध्यमातून होत असत. बँकिंग या विषयाचे मुलभूत ज्ञान पण प्रत्यक्षात अनुभवयास मिळाले. आज लहान मुलांचे खाते असा प्रकार सुरु आहे, त्यावेळी असं नव्हतं म्हणून माझ्यासाठी बँक व्यवहार करणे सुरुवातीला अवघड गेलं पण नंतर शिकले. हे याचं श्रेय ही मॅडमला जात. फक्त व्यवहारिक ज्ञान दिले असे नाही सामाजिक विचारसरणी वाढवण्यात मदत केली. आमच्या सामाजिक विषयावर छान चर्चा रंगायच्या. या चर्चातून विचारांची देवाणघेवाण करायचो. हुंड्यापासून ते आजची तरुणाई असे अनेक विषय असायचे. खेड्यातील मुलींना शिक्षणासाठी आजही घ्यावे लागणारे कष्ट असो किंवा शिक्षणाची संधी असताना तिचा गैरफायदा घेणाऱ्या मुलं-मुली, समाजातील असमानता या सगळ्या विषयवर सखोल चर्चा होत असे. त्या स्वत :सावित्री फुले यांच्या जीवनकथा यावर एकपात्री छान करायच्या. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून शेवटी रडवत असत. असा अभिनय करत असत. त्यामुळे मुलींसाठी त्या फक्त आदर्श शिक्षक नाही तर आदर्श व्यक्ती आहेत.त्यांनी पीएचडीसाठी बचत गट हा विषय घेतला होता, तेव्हा त्या महिलांचे अनुभव आम्हांला सांगत. त्यांना या विषयावर जास्त अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी काही बचत गट सुरु केले होते. प्रत्यक्ष माहितीच्या आधारे आम्हांलाही हा उपक्रम समजून घेता आला. म्हणून आमचा कॉलेजमधील मुलींचा बचत गटही तयार केला होता. तो पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीचा पहिला बचत गट होता. मुलींनी नेहमी प्रगती करावी त्यासाठी कष्ट घ्यावे लागले तरीही चालेल. पण तुम्ही जगाचा अनुभव घ्या असं नेहमी सांगत जर गरज लागली तर मला सांगा मदत करेल, मी नेहमी तयार आहे. असे बोलत असत. यानुसार टाटा जागृती यात्रेचा फार्म भरण्यासाठी त्यांची मदत मागितली , त्यांनी लगेच होकार दिला पण संध्याकाळी वेळ आहे माझ्या घरी येणार का? असं विचारलं, येताना सगळं मराठीत लिहून आण. त्याचं पीएचडी काम अंतिम टप्प्यावर आले होते, याची कल्पना होती. तरीही मदत करायला तयार झाल्या. त्याचदिवशी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान फार्म भरला. त्या धानोरीला राहत होत्या. मी हडपसरवरून म्हणजे २०-२५ किलोमीटर प्रवास करून रात्रीच्या वेळी एकटीच गेले होते. घरी येताना एका फार्मसाठी एवढे कष्ट कोणी सांगितले असे वाटले होते पण माझी यात्रेसाठी म्हणजे १८ दिवस संपूर्ण देश फिरण्यासाठी निवड झाली तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता.
एन.एस.एस. कॅम्पमध्ये तर आम्ही फार धमाल करायचो. सगळ्यासोबत गाणी गात असत, मनमोकळ्या गप्पा करताना मॅडम सहभागी व्हायच्या. त्या कॉलेजनी दत्तक घेतलेल्या गावात दरवर्षी १५ ऑगस्टला मुलांना घेऊन जात. त्यांनी तिथे छोटीशी शाळाही सुरु केली होती. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून तर तरुणांना प्रशिक्षणमधून रोजगारचे पर्याय उपलब्ध करून दिले. अश्या नेहमी दुसऱ्यासाठी धडपडणाऱ्या मॅडम यांनी घरातील नातेवाईक यांच्यासाठीही खूप केलं. आमचा कॉलेजचा सगळा ग्रुप हा एक कुटुंब होता तर मॅडम या कुटुंबप्रमुख होत्या. आजही त्या तश्याच आहेत. कठीण काळात कोणाला मदत लागली तर जमेल तशी मदत करणाऱ्या आणि मानसिक आधार देणाऱ्या, वडिलकीच्या नात्याने रागवणाऱ्या पण नाजूक प्रश्नांना तितक्याच प्रेमळ भाषेत सोडवणाऱ्या. सगळ्यांची प्रगती कशी होईल असा विचार करणाऱ्या आमच्या लाडक्या मैडम रणधीर मैडम......
....
....
उद्याचा ब्लॉग अशा एका स्त्रीविषयी जी संपूर्ण अशिक्षित असूनही लोकांना सहकार्य कसे करते...... मग नक्की भेट द्या ब्लॉगला.
No comments:
Post a Comment