Travel-ताडोबात भेटलेला पहिला पाऊस......

जून महिन्याची चाहूल लागताच पाऊसच्या स्वागतासाठी सारी सृष्टी सज्ज असते. उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाचं रूप काही औरच. कवी मन नसलेले लोक कवी होऊन जातात सूर नसलेले गायक असा हा पाऊस. शहरापेक्षा गावात किंवा शेतात अनुभवण हे अनोखेच. पहिल्या पावसाची एकतरी आठवण प्रत्येकाच्या मनात असतेच. असाच पहिला पाऊस मी ताडोबाच्या जंगलात दहा वर्षापूर्वी अनुभवलेला. माझा पहिल्या पावसाचा हा अनुभव केवळ अविस्मरणीय.

‘निर्माण’ शिबिराला जाण्यासाठी आम्ही सारेजण नागपूरला आदल्या रात्री पोहोचलो. ताडोबात वाघ पहायची फार उत्सुकता लागली होती. कसं असेल ताडोबा ? आपल्याला वाघ दिसेल का ? प्रत्यक्ष जंगल कसं असत ? अशा प्रश्नांनी रात्रभर मनात गर्दी केली होती. सकाळी खासगी जीप करून आम्ही ताडोबाच्या वाटेने निघालो. शहर सोडवल्यानंतर दुतर्फा झाडी दिसू लागली. प्रवेशद्वारावर आम्हांला आडवले,कारण जंगलात जाण्याची वेळ झाली नव्हती. मग काय बाहेरच दोन तास वाट पाहत बसलो. तिथे काही स्थानिक मुले कमळाचे फुले विकत होती. आम्ही फुलांसोबत आणि तिथल्या निसर्गरम्य परिसारत फोटो काढत बसलो. तेव्हा मात्र सेल्फीचा जमाना नव्हता.

दोन तासांनी ताडोबात प्रवेश मिळाला. निसर्गाचं अदभूत सौंदर्य पाहून भान हरपून गेले. मी तर वेड्यासारखं आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर डोळ्यात सामावून घेऊ लागले. अन नेमकं अर्ध्या वाटेत असतानाच रिमझिम करणारा पाऊस सुरु झाला. सगळ्यांनाच या पहिल्या पावसाचा अनुभव गाडीतून खाली उतरून घ्यावा असे मनोमन वाटू लागले, तेवढ्यात पाऊसाने रूप बदलले. विजांचा कडकडाट सुरु झाला. पाऊस बेधुंदपणे कोसळू लागला. युथ हॉस्टेल लांब होते म्हणून गाडीतून खाली उतरण्याचा बेत रद्द झाला. गाडी युथ हॉस्टेल जवळ पोहचली. थंडगार वातावरण आणि प्रवासानी थकलेलें आम्ही तिथल्या कटिंग चहावर मस्त ताव मारत बसलो. तोपर्यंत पाऊस जरासा ओसरला होता. चहा घेतल्यावर आम्ही हॉस्टेलच्या खोलीकडे निघालो तेव्हा करंज्यासारख्या हळुवार पाऊस सुरु होता. जंगलाचे निरीक्षण करत चालताना प्रवास एका तलावापाशी येऊन थांबला. रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठे तलाव होते. त्यावर आकाशात काळ्या –पांढऱ्या ढगाचा खेळ सुरु होता. काळे ढग आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी पांढऱ्या ढगावर आक्रमण करत होते. शहरात राहत असल्यामुळे प्रथमच असा ढगाचा खेळ पाहता आला. नाहीतर शहरात आभाळ दिसते कुठे? तलावालगत उभे राहून ढगाचे निरीक्षण चालू असताना आमच्या जवळ पाण्यात काहीतरी हालचाल झालेली जाणवली अनं पाहतोय तर भली मोठी मगर किनाऱ्याकडे येत होती. मग काय ? आम्ही थेट हॉस्टेलकडे धूम ठोकली. आमच्या किंचाळ्याने मगरीने पण पळ काढला होता बर का ?

हॉस्टेलकडे जाताना पुन्हा पावसाने आम्हांला गाठले आता मात्र त्याचे टपोरे थेंब अंगावर आदळत होते. त्यातच वाटेत खड्डा दिसला की पळत जायचे इतरांना त्या पाण्याने भिजवायचे असा खेळ सुरु झाला. एकमेकांना भिजवायची स्पर्धाच सुरु झाली होती म्हणा की.. असा खेळ खेळताना आम्ही हॉस्टेलवर पोहचलो. या सगळ्यात रात्र झाली होती जेवण करून सगळेजण गप्पागोष्टी करण्यात दंग झाले. ताडोबाच्या युथ होस्टेलमध्ये फक्त आमचाच ग्रुप मुक्कामाला होता. जंगलातील काळीकुट्ट रात्र शहरापेक्षा वेगळी दिसत होती. बाहेर जोरदार आणि सतत पाऊस पडत होतो. आमच्या हॉस्टेलमध्ये आणि अंगणात तेवढीच काय ती लाईट बाकी सगळा अंधार. जंगली, हिंस प्राण्यांनी भरलेल्या जंगलात आपण मुक्कामाला आहोत ही कल्पनाच फार भारी वाटत होती. तेवढ्यात आणि गाण्याचा भेंड्या असे पारंपारिक खेळ खेळून कंटाळा आला होता म्हणून आम्ही वेगळा गेम खेळायला सुरुवात केली.ज्याच्यावर डाव आहे त्याने बाकीचे सांगतील तसे करायचे, काहीचे गाणे- डान्स झाल्यानंतर माझ्यावर काहीतरी करायची वेळ आली, मला वेगळं द्या असे बोलले म्हणून सगळ्यांनी सांगितले की, बाहेर जाऊन एक किडा पकडून आणायचा. थोडी हिंमत करून बाहेर गेले ,खरतरं बाहेर जायला भीती वाटत होती. रात्रीची वेळ त्यात जंगल. तरीही जरा धीर करून हॉस्टेलच्या अंगणात गेले. बाहेर फक्त जोरात पडणाऱ्या पाउसाचा आणि रात किड्यांचा आवाज, त्यात एक काळासा किडा दिसला तो उचलू का नको हा विचार करताना एकदा हिमंत करून उचला आणि आत नेला . सगळयांनी कौतुक केल. त्यानंतर आमची गप्पाचा सुर भूत कथा यावर येऊन थांबला. जंगलात भूताची कथा भारीच आणि भीतीदायक अनुभव होता . त्यात वातावरणनिमित्तीसाठी जंगलातून रात्रीच्या वेळी येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज आणि रातकिड्याचा किर्र करणारा आवाज... त्यात भर म्हणून मुसळधार पाऊस. जो की थांबायचा नाव घेत नव्हता. या कथा संपल्यावर झोपताना खिडकीच्या फटीतून बाहेर सहज डोकावले तर हॉस्टेलच्या आडोशाला हरिणीचा कळप बसला होता. पावसापासून बचावासाठी कदाचित .
सकाळी उठून पहिले तर कळप गायब होता. कालच्या पावसाने सगळे जंगल कसे स्वच्छ धुतल्यासारखे दिसत होते. हॉस्टेलच्या जवळच काही कुटुंब राहत होती. त्यांच्याशी बोलताना कळले की. त्यांना प्राण्याची काहीच भीती वाटत नव्हती. हरण आणि बाकी छोटे प्राणी रोज येतात त्याच्या अंगात. आम्हांला प्रचंड मुसळदार वाटणारा पाऊस दरवर्षी असा असतो, त्यांनी सहजपणे सांगितले. नाश्ता करून आम्ही जंगलात फेरफटका करायला गेलो, रात्रीच्या पावसाने जंगलातील छोटे-छोटे नाले तुडूंब वाहत होते. खळखळणारे स्वच्छ पाणी पाहून मस्त वाटत होते. झाडांना नवी उभारी मिळाली तसे पानफुलं खुलले होते. गाडीत बसून आम्ही या सगळ्याचा अनुभव घेत होतो. मोर, रानकोंबडा, आणि जंगली पक्षांचे दर्शन झाले. मात्र वाघ दिसेल या आशेने नजर जाईल तिकडे बारीक लक्ष ठेऊन होतो, पण त्यांच्याऐवजी रानगवा, रानडुक्कर, निलगाई, हरणाचे काही कळप आम्हांला दिसले. पक्षाचे वेगवेगळे आवाज आणि काही जंगली प्राण्यांचे आवाज ऐकून जीपवाला गाडी थांबायचा नुसत्या आवाजावर सामाधान मानून थोड्या वेळाने पुन्हा गाडी चालू करायचा. असा अतिशय स्वप्नवत प्रवास सुरु असताना पुन्हा पाऊस आला. काही वेळ गाडीतून त्यांचा आनंद घेत आम्ही एका मसानाजवळ आलो. त्यावर चढण्याचा निर्णय घेतला आणि मग जे काही पाहिलं आजवर जसाच्या तसं मनावर कोरले. विशिष्ट उंची वरून जंगलच वेगळेच रूप पाहायला मिळाले. प्रचंड विस्तारलेले जंगल, त्यात असंख्य वेली, झाडे. निसर्गरम्य हा शब्द कमी पाडवा असे ते दृश्य . हळूहळू पाऊसाने वेग वाढवला होता. जंगल त्याच्या आश्रयाला येऊ लागले. मचाणावर असल्यामुळे उंचीवरून पाऊस पडताना पाहायला मिळात होता.. टपोरे टपोरे थेंब जवळून अनुभवतायेत होते .ते थेंब थेट झाडावर पडत होते त्यामुळे सारे जंगल पावसापुढे नतमस्तक झाले होते. उंच उंच झाडेसुद्धा मान खाली घालून पावसाचा मारा सहन करत होती. विजांचा कडकडाट आणि मुसळदार, बेधुंद असा पाऊस तोही जूनचा पहिला पाऊस. हे सारे पाहताना आयुष्याच सार्थक झाल्यासारखे वाटत होते.


हा पाऊस थांबूच नये असे वाटू लागले होते. बऱ्याच वेळाने पाऊस जरा शांत झाला तेव्हा आम्ही हॉस्टेलकडे निघालो. सगळे रस्ते पाण्याने नाहीसे झाले होते. पाकिंग करून ताडोबातून निघालो पण काहीतरी मागे राहिलं आहे, तसं पाउल जड झाले होते . काही केल्या पुढे जात नव्हते. गाडीच्या छोट्याश्या खिडकीतून प्रचंड मोठं ताडोबा जंगल डोळ्यात सामावून घेत होते. पावसाच्या अनेक सुखद आठवणी घेऊन आम्ही निघालो पण त्याच पावसामुळे वाघोबाच दर्शन झालं नाही याची खंत आजही पहिल्या पावसात आठवते. .....


(ताडोबातील पहिल्या पावसाचा अनुभव दै.पुढारीत असताना लिहिला होता . त्याला आता पाच वर्ष झाले.)

No comments:

Post a Comment