Saturday, 27 February 2016

मायमराठी तुला कोटी कोटी धन्यवाद ......



पोटापाण्यासाठी करायचं काय असा प्रश्न नकळत्या वयात  पडला होता. म्हणजे लहानपण सुटत असतानाच.  कारण  आमच्या घरी काही फिल्मी वातावरण नव्हतं, म्हणजे बाळ  जन्माला आलं की पुढे कोण होणार हे ठरवणारा असा कोणी खलनायक नव्हता . तसा वेळ ही नव्हता कोणाकडे; शेतकरी कुटुंबात असा फाजील वेळ नसतोच कोणाकडे . बारा महिने २४ तास ऑन डूटी असलेला हा माणूस, म्हणून काम करणारा हा कधी बोलणार " मेरा बेटा या मेरी बेटी डॉक्टर किंवा इंजिनिअर बनेगी" असे  काहीच रामायण- महाभारत घडले नाही म्हणून आम्ही आमच्या आवडीनुसार  आमचे कार्य क्षेत्र निवडले. शाळेतच कविता, धडे आवडू लागले. कसे लिहित असतील म्हणून प्रश्न पडत राहायचा ,आपल्याला पण असे सुचेल का असे वाटत असताना निबंध स्वत: स्वतःचा लिहायला सुरुवात केली. शाळेतल्या शिक्षकांनी कौतुक ही केल , म्हणून दहावीला विशेष निबंधाच पुस्तक घ्यावं लागलं नाही. हळूहळू कविता लिहायला सुरुवात केली. पहिल्यांदा महिनाभर विचार करून चार ओळी लिहिल्या. हळूहळू तिच्यात अजून चार ओळी जोडल्या पहिली कविता तयार झाली. पण कोणाला दाखवावी असा प्रश्न पडला . चूक बरोबर सांगणार कोणी नव्हते , शाळेत विचारावं तर  शिक्षकांची भीती असायची. तशी लाडकी होते पण तरीही अभ्यासाव्यतिरिक्त  काही तरी केलं म्हणून दाखवायची हिंमत नाही झाली.

समाजाच्या प्रवाहानुसार  कॉलेजमध्ये  जाताना कॉमर्सला  प्रवेश घेतला खरतर आर्टसला प्रवेश मिळाला होता पण पोटापाण्यासाठी आर्ट पेक्षा कॉमर्स चांगलं असते म्हणून आमची गाडीने वेगळे वळण घेतले. पण आत लपलेल्या लेखकी वृत्तीने   कॉलेजच्या मराठी वाड:मय मंडळात काम करण्याची प्रेरणा दिली. कविता, लेख आणि कथाकथन अशा प्रकारे मायमराठीची सेवा करायची संधी मिळाली. तीच मराठी आता पोटापाण्याच साधन आहे पाहून आनंद आहे. बारावीच्या वायवाला  तू कोण होणार याच  उत्तर देताना लेखिका होणार सहज सुचाल म्हणून सांगितलं ,त्यावर चार ओळी इंग्रजीत बोलल्या , पण जेव्हा शिक्षकांनी लिखाण  इंग्लिशमध्ये करणार  का  ? असे विचारले . नाही मराठीत मध्ये असे उत्तर ऐकल्यावर त्यांनी उलट प्रश्न विचारला की मग कॉमर्समध्ये काय करत आहेस ? तेव्हा मात्र निरुत्तर झाले  होते , सोपी वाटणारी वायवा अवघड होऊन बसली. पण आज त्याचं उत्तर मिळालाय. कॉमर्स मध्ये  व्यवसायाचे धडे आणि व्यावसायिक मराठी शिकवतात . व्यवहार करताना भाषा कशी असावी हे शिकवतात .तेच ज्ञान आणि व्यवहारिक मराठी पोटभर खायला द्यायला सक्षम आहे याची जाणीव झाली. मी  अजून व्यवहारिक आणि व्यावसायिक मराठी लिहायला शिकत आहे. पण जेवढी जमते त्यावरून आपली गाडी हळूहळू रुळावर येत आहे.


मी नक्की कॉमर्स पदवीवरून पोटापाण्यासाठी काम मिळवले असते  पण आताचे काम करताना  यापेक्षा आपल्या भाषेत लिहिताना जे समाधान मिळते ना याचा वेगळा आनंद आहे. आई जशी बाळाला जन्म देते आणि त्याला वाढवते त्यात तिला जो आनंद मिळतो तसा  आपल्या भावनाना शब्दरूप घेताना होता  त्या शब्दांचा लेख बनतो  आणि त्यावर भाषेच्या नियमावलीचे  संस्कार होतात तेव्हा मात्र आपलं बाळ रांगत खेळायला लागले असे वाटते . तोच लेख प्रसिद्ध  झाला की आपलं कर्तव्य पूर्ण केलं असे वाटते. त्याला मिळणारा प्रतिसाद म्हणजे आपल्या पाल्याने  कमवलेले बक्षीस असते. 


एक एक शब्द आकार घेत जेव्हा  कागदावर किंवा संगणकावर उतरत असतो तेव्हा आपण आपले भान विसरून लिहित असतो. असा भान विसरून काम करायला मिळणे यापेक्षा दुसरा आनंद नाही. 
म्हणून मराठी दिनानिमित्त त्या भाषेचे कोटी कोटी धन्यवाद .... 











No comments:

Post a Comment