साधारण एका महिन्यापूर्वी एका येलो सनबर्डने (शिंजीर) जोडप्याने आमच्या आंगणात आपले घरटे बांधायला सुरुवात केली. दरवर्षी घराच्या आजूबाजूला शिंज घरटे घालतो. शत्रूपासून घरट्याचे रक्षण करण्यासाठी हा पक्षी माणसाच्या जवळ घरट बनवतो असे लक्षात आले. पिवळसर मादी व अत्यंत देखणा नेव्ही ब्लू रंगाचा नर अशी थोडीसे विजोड वाटावे असे हे जोडपे. नर आणि मादीचा घराजवळ त्यांचा वावर वाढला की समजाव घरट्यासाठी जागेची शोधाशोध सुरु आहे. यावर्षी मात्र अगदी घराला लागुनच असलेल्या शतावरीच्या वेलीवर घरट बांधायला सुरुवात झाली. अगदी दोन- तीन दिवसांत काडी काडी जमवून सगळं घर तयार झालं. आपल्या हाताच्या तळव्यावर बसेल इतकं ते लहान होते. योगायोगाने रविवार होता म्हणून त्यांच्या घर बांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर फोटो टिपत गेलो. एका आठवड्यात त्या मादीने इवल्याशा घरट्यात चार अंडी दिली.
आम्हांला भीती होती की पिल्ल झाल्यावर हे घरट लहान होईल, त्या चार पिल्ल कशी राहतील? या दरम्यान ती रोज अंडी उबवण्यासाठी बसत असे. नर मात्र आज्ञाधारक नवऱ्यासारखा तिला किडे, आळ्या आणून देत होता. लांब बसून तिच्यावर लक्ष ठेवत असे. एकजण घरट सोडून गेले तरी दुसरे घरट्याचे संरक्षणासाठी आजूबाजूला बसलेले असायचे. एके दिवशी खूप पाऊस झाल, आम्हांला वाटल आता काही घरट राहत नाही. पावसाने जड झाल्यावर पडेल पण निर्सगाची कृपा असे काही झाले नाही. काही दिवसांत त्या अंडीमधून एकएक करत चार पिल्ल बाहेर आली. आपल्या हाताच्या अंगठ्या एवढी लहान होती, रोज सकाळी पिल्लांची खबरबात आम्ही घेत असू . किती मोठी झाली या उत्सुकतेने एकदा तरी घरट्यात डोकावत असू. तीन - चार दिवसांनी पुन्हा दुपारी अचानक पाऊस आला, यावेळी चारीही पिल्ल घरट्यात होती. काय झालं असेल अशी उगाच चिंता लागली. पण दुसऱ्या दिवशी आम्ही डोकावले तर तेच आम्हांला डोळे वटारून पाहत होते. पण पावसाने घरटे होते जीर्ण झाल्यासारखे दिसत होते. तसेच पिल्ल मोठी होत होती, त्यामुळे घरटेही ताणले जात आहे, असे वाटत होते.
रोज एकतरी फोटो घेणे जणू आमचा दिनक्रम झाला होता, त्यामुळे ती पिल्ल आता आम्हांला घाबरत नव्हती तर डोळे बिचकत बघत होती. इवलाश्या घरट्यात एकमेकांवर दाटीवाटीने बसलेली पिल्ल पाहताना फार मज्जा वाटायची .त्यांचा नाजूकसा चिवचिवाट फारच आनंदायी होता. दिवसेदिवस घरटे पारदर्शी झाल्याने लांबूनच त्यांच्या हालचाली दिसत होत्या. एक दिवस सकाळी सकाळी एक पिल्लू घरट्याबाहेरच्या फांदीवर दिसले, घरट्यात डोकावले तर फक्त दोन शिल्लक होती. एक पिल्लू कुठे गेले असेल विचार करत असताना शेजारच्या फांदी दिसले. ऑफिसला झालेला उशीर यांचे घरट्याबाहेर पहिल्यांदा झालेले दर्शन यात काही सुचत नव्हते, दोघे बहिण-भांवडे त्यांचे फोटो काढत होतो. आई म्हणाली कामाला जायचे नाही का ? पण आम्ही मात्र तो क्षण गमावू इच्छित नव्हतो.ते पिल्ल इतके माणसाळलेले होते की गोविंदनी हात लावायचा प्रयत्न केला तर एक पिल्लू त्याच्या हातावर येऊन बसले. दोन-तीन मिनिट तसाच हात ठेऊन उभा होता. पिल्लू परत फांद्यावर जायचे नाव घेत नव्हते, मग अचानक उडून फांदीवर बसले आणि एकएक करत सगळे घरट्याच्या बाहेर आले.
मला ऑफिसला उशीर झाला म्हणून निघून गेले तसे इकडेही सगळे आपआपल्या प्रवासाला लागले . घरी आल्यावर कळले की दुपारपर्यंत होती आजूबाजूला आता मात्र दिसत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला पण फक्त लांबून आवाज येत होता ती पिल्ल मात्र दिसेनाशी झाली ....
त्यांचे आम्हीही संरक्षण करत होतो ,घराजवळ कावळा , बाहीर ससाणा दिसला उडून जावा अनेकदा प्रयत्न केले. त्यांना रोज हात लावायची इच्छा होत असे पण निसर्गात हस्तक्षेप नको म्हणून लांबूनच पाहून समाधान मानत असू , एक मात्र आनंद झाला की उडून जाताना त्या पिल्लांनी आमची इच्छा पूर्ण केली. एकवेळ तर त्यांना एखाद्या पिंजऱ्यात टाकून कायम आपल्याच जवळ ठेवण्याचा मोहही झाला होता मात्र त्यांचे खरे विश्व काय आहे याची कल्पना असल्यामुळे तसं काही केलं नाही . ते सगळे आपल्या पंखावर हा आसमंत काबीज करायला कायमची उडून गेली . आता मात्र त्यांची काळजी नाही कारण ते आपल्या स्वबळावर स्वता:चे रक्षण करायला सक्षम झाले आहेत . ...
या प्रसंगी एक ओळ आठवते ..... आकाशी उंच झेप घे रे पाखरा .......
No comments:
Post a Comment