आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्यांच्या कार्यास व त्यांना विन्रम अभिवादन. ज्यांच्या त्यागामुळे आणि कष्टामुळे भारतीय स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली, त्या सावित्रीबाईविषयी या देशातील हजारो मुलींना माहितीही नाही. शाळेत इतिहासात शिकवतात म्हणून परीक्षेपुरते सावित्रीबाईचे नाव लक्षात ठेवतात. बस्स. काही सामाजिक संस्था, काही समाजातील लोक त्यांना आपले मानतात म्हणून त्यांची जयंती आणि पुण्यतिथी तरी साजरी केली जाते. बाकी इतर विशेष करून तरुण वर्ग त्यांना विसरूनच गेला आहे.
आज मात्र गुगल ने त्यांना स्मरणार्थ डूडल बनवून या ‘सो कॉल्ड’ या मुलींना सावित्रीबाईच्या कामाची आठवण करून दिली आहे.
आज मात्र गुगल ने त्यांना स्मरणार्थ डूडल बनवून या ‘सो कॉल्ड’ या मुलींना सावित्रीबाईच्या कामाची आठवण करून दिली आहे.
पाच वर्षापूर्वी लंडन गेल्यावर तिथले लोक आपला इतिहास किती जपून ठेवतात, हे पाहायला मिळाले. एखाद्या तुटलेल्या चर्चचे दगड असो किंवा पुरातन वास्तू अगदी काळजीपूर्वक जतन करतात. पण आपल्याकडे मात्र ऐतिहासिक वास्तूचे हाल जगजाहीर आहे. आपला इतिहास आणि संस्कृती खूप संपन्न आहे पण फक्त त्याची काळजी घेत नाही ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी राहिली की नाही अशी शंका वाटते. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सावित्रीबाई फुले ज्या शाळेत शिकवत होत्या, ती शाळासुद्धा अनेकजणांना माहिती नाही. अशी ऐतिहासिक वास्तू लोकांना पाहायला मिळावी म्हणून प्रशासनाकडून काही विशेष प्रयत्न पण केले जात नाही. तिच परिस्थिती किल्ले आणि गड यांची आहे, या परिस्थितीत वर्षानुवर्षे मात्र सुधारणा होत नाही. याचे मात्र वाईट वाटत राहते.
कॉलेजमध्ये असताना डॉ. वृषाली रणधीर यांच्या सावित्रीबाई फुले या एकपात्री प्रयोगामुळे सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती मिळाली. यामुळे सावित्रीबाईविषयी आणखीन आदर वाढला. धन्यवाद रणधीर मॅडम तुमच्यामुळे निदान त्यांच्या कष्टाची छोटीशी झलक पाहायला मिळाली, कॅलर्स वाहिनीवर महात्मा फुले यांच्या जीवनपटावर एक १० भागांची मालिका दाखवली गेली, त्यांचा संघर्ष १० भागात सांगणे शक्य नाही पण नाही पेक्षा काहीतरी दाखवले यात त्यांचे आभार. ती मालिका पाहताना माझे बाबा म्हणाले यांनी लोकांसाठी किती सहन केले पण यांचे कार्य आजच्या लोकांना फार माहिती नाही. हे चुकीचे आहे. माझ्या न शिकलेल्या बाबा हे कळते पण शिकलेल्या आणि स्वतःला सरकार म्हणवणाऱ्या कोणत्याही पक्षाला कळत नाही. फक्त त्याचं नाव वापरता येते. सावित्रीबाईच्या कष्टाची कहाणी मोठ्या पडद्यावर अजून कोणाला दाखवावी का वाटली नसेल (कोणाला माहिती असेल सांगा) त्यांचे संघर्षमय आयुष्यावर नक्की एखाद्या चित्रपट बनू शकतो. पण आपल्याकडे चित्रपट बनवणाऱ्याना अशी संघर्ष करणारी लोक दिसत नाही. सावित्रीबाई फुले यांची महती असो इतिहासातील थोर व्यक्तीचे महत्त्व समजायला आमचा समाज अजून प्रगल्भ झाला नाही असे वाटत राहते.
याविषयी अजून खूप लिहिण्यासारखे आहे पण पुढे कधी तरी
No comments:
Post a Comment