चित्रपटात अनेक वेळा पाहिलं
की हिरोची आई शिलाईमशीनवर कपडे शिवते आणि हिरोला शिकवते आणि त्यांचे पालनपोषण करते.
तिने एका मशीनवर काम सुरु केलेले असते आणि चित्रपटाच्या अखेरीस ती एका मोठ्या
दुकानाची मालकीण झालेली असते. हिरो आता गरीब, दुबळा राहिलेला नसून शिकून श्रीमंत
झालेला असतो. पूर्वी असे दृश्य अनेक भारतीय चित्रपटात दिसत असे. पण असे वास्तवात
कुठे असे घडते असे आपल्याला वाटते. पण एका माऊलीने शिलाईमशिनच्या सहाय्याने आपले घर –संसार
सांभाळून दोन्ही पाल्यांना आपल्या पायावर उभे केले. आज दोघांची आपआपल्या क्षेत्रात
यशस्वी वाटचाल सुरु आहे.
ही माऊली म्हणजे सुनंदा
दत्तात्रय राक्षे. बालपणापासून काहीतरी नवीन शिकायची हौस. त्यांचे बालपण हे बारामतीत
होळकर सादोबाची वाडीत गेले. घरी वडिलोपार्जित कपडे शिवायचा व्यवसाय होता त्यामुळे
त्या घरात आईला हातावर शिवताना पाहत असत. शेजारी एक बंगाली बाई होती, ती मशीनवर
कपडे शिवत असे, आपल्यालाही असे कपडे शिवता यावे म्हणून त्या बंगाली बाईकडे जाऊन
मशीनकाम शिकत असत. हळूहळू शिक्षण पूर्ण करताना शिलाई मशीनवर कपडे शिवण्याची कला
जोपासली. दहावीला असताना लग्न ठरले शिक्षण पूर्ण करायची जिद्द असल्यामुळे
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पेपर दिला. कोणतेही काम घेतले की पूर्ण करायचे ही सवय
अगदी लहानपणापासून जपली आहे. हेच त्याच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच आज यशस्वी
व्यावसायिक आहेत.
लग्नानंतर घोरपडी राहायला
आल्यावर काही तरी करावं सारख वाटत असे, शांत बसायची सवय नव्हती म्हणून त्यांनी
शिवणकाम शिकायला सुरुवात केली. दोन महिने क्लास केला. पहिला दसरा म्हणून सासूबाईने
कानातले घ्यायचे ठरवले होते, तेव्हा राक्षे ताई म्हणाल्या की मला त्यापेक्षा कपडे
शिवायची मशीन घ्या. सप्टेंबर १९८३ घरात पहिली मशीन आली. घरचे कपडे शिवायला सुरु
केले मग मैत्रिणी आणि शेजारील स्त्रियाच्या ब्लाउज शिवून दिले. कामाच्या बाबतीत
गुणवत्ता आणि दर्जा चांगला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक कपडे शिवायला येऊ
लागले. कधी जाहिरात किंवा बॉनर लावायची गरज पडली नाही. त्यामुळे शाळेच्या गणवेश ऑडर
मिळायला लागल्या. लग्नसराई,दिवाळी, ईद, नाताळ अशा मोठ्या सणावाराला भरपूर काम मिळू
लागले. अगदी मायतीचा ब्लाउजचे काम आले तरी नाकारले नाही. कारण काम काम असते म्हणून
सगळ्या प्रकारचे काम स्वीकारले.
कामाचा वाढता व्याप पाहून
राक्षे ताईच्या पतीने सांगितले की तू दुकान सुरु कर, आम्ही सहकार्य करू कामात असे
सांगितले. सासूबाईनी पदर खोसून तयार झाल्या. राक्षेताई दिवसभर दुकानात काम करत
असल्यामुळे घरातील सगळे कामे सासूबाई स्वत करत. कधी स्वयंपाक करावा म्हणून अपेक्षाही
केली नाही. १९८९ ला घरालागत असलेल्या खोलीत दुकान सुरु केले. एका मशिनच्या माध्यमातून
सुरु झालेले काम हळूहळू वाढत गेले तशा मशीनही वाढत गेल्या. पन्नास हजार रुपये भांडवलाची
गुंतवणूक करून मोठ्या थाटाने दुकान सुरु केले. त्यामुळे कामाचा व्याप वाढला तशी
कमाईही सुरु झाली. कामामध्ये राक्षेताईचे पती त्यांना मदत करत असत. दिवसभर एका
खासगी कंपनीत काम करून आल्यावर संध्याकाळी ते पत्नीच्या कामात सहकार्य करत. अगदी
कपड्यांना काचा करण्यापासून ते सर्व काम करत. काही समस्या असेल तर भक्कम पाठिंबा
देत असत.
सगळे छान सुरु असताना एक दिवस
त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला,त्यांच्या पतीने निधन झाले. त्यांचा आधार गेला
पण सासूबाईनी धीर दिला. त्यामुळे काही दिवसांतच त्या पुन्हा कामाला लागल्या.
त्यावेळी त्यांची चिमुकली मीनल त्यांच्या कामात मदत करू लागली. सासूबाईनी संसाराचा
सगळा कारभार हातात घेतला आणि फक्त कामावर लक्ष दे म्हणाल्या. त्यांच्या या
पाठिंब्यामुळे घरातील उत्पन्न सुरु राहिले. त्या नेहमी म्हणायच्या की “कमाईतील दोन
पैसे नेहमी अडीअडचणीला बाजूला ठेवावे” त्यांच्या या सल्ल्यामुळे मला बचतीची सवय
लागली आणि त्यामुळे या अडचणीच्या काळात आणि
व्यवसाय वाढीला खूप मदत झाली. म्हणून कधीही पैश्याच्या अडचणीमुळे कामात खंड
पडला नाही. उलट यामुळे बचतीची सवय लागली. असे राक्षेताई सांगतात.
आजपर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार
आले पण त्यांनी कधी मागे पाहिले नाही. त्यांनी स्वत:चा संसार सांभाळताना अनेक
महिलांना रोजगार दिला. त्यांना शिलाईमशीन शिकवली , काहींनी यांच्याकडे राहून
आपल्या संसाराला हातभार लावला तर काहींनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला.
त्यांच्या शिष्यापैकी अनेकजणी यशस्वी व्यवसायिक आहेत. काहीतर स्वता:चे दुकान टाकले
आहे. आतापर्यंत १०५६ मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
काळानुसार शिलाईकाम हे फक्त
कपडे शिवणे राहिले नसून एक फॅशन इंडस्ट्री तयार झाली आहे. त्या अनेकजणींचे फॅशनबेल ड्रेस शिवतात आणि लोकांना नव्या फॅशनबाबत सांगतात पण त्या स्वतः मात्र फार साध्या पद्धतीने राहणे पसंत करतात.
आता रेडीमेड कपड्याचा काळ आहे. या बदलत्या काळानुसार त्यांनी स्वता:च्या कामात बदल करून घेतले त्यामुळे दुकान कधी तोट्यात गेले नाही. साधा लहान मुलींचा फ्रॉक ते शांतीचा ड्रेस असो वा मैने प्यार किया मधला माधुरीचा ड्रेस त्यांनी टीव्हीवर पाहून शिवून दिला. आता नेटवर शोधून नवीन फॅशनचा ड्रेस शिवतात. रेडीमेड कपड्याचा त्यांच्या व्यवसायावर कधीही परिणाम झाला नाही त्यांनी काळानुसार बदल केले म्हणून आज रेडीमेड ड्रेसचे फिटिंगचे काम त्यांच्याकडे येतात. कुंची ते अनारकली सगळ्या प्रकारचे कपडे शिवतात. ग्राहकांशी कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकावे म्हणूनच त्यांच्याकडे तीन पिढीतील लोक येतात. आजी ते नाती पर्यंत असे अनेक ग्राहक त्यांच्याकडे येतात. धावपटू नंदा जगताप ते सिंधुताई सपकाळ अशी मोठी यादी आहे. दुकान आर्मी एरियात असल्यामुळे देशाच्या कोपऱ्यातील स्त्रिया यांच्याकडे येतात त्यांच्या आवडी आणि संस्कृतीनुसार त्यांचे कपडे या शिवून देतात. त्यांनी मला येत नाही म्हणून कधी ग्राहकाला परत पाठवले नाही. नवनवीन गोष्टी शिकून त्या स्वत: ला यशवीरित्या सिद्ध केले आहे. म्हणूनच दिल्लीला बदली होऊन गेलेल्या लोकांना तर कुरियरने कपडे दिल्लीला पाठवतात.
आता रेडीमेड कपड्याचा काळ आहे. या बदलत्या काळानुसार त्यांनी स्वता:च्या कामात बदल करून घेतले त्यामुळे दुकान कधी तोट्यात गेले नाही. साधा लहान मुलींचा फ्रॉक ते शांतीचा ड्रेस असो वा मैने प्यार किया मधला माधुरीचा ड्रेस त्यांनी टीव्हीवर पाहून शिवून दिला. आता नेटवर शोधून नवीन फॅशनचा ड्रेस शिवतात. रेडीमेड कपड्याचा त्यांच्या व्यवसायावर कधीही परिणाम झाला नाही त्यांनी काळानुसार बदल केले म्हणून आज रेडीमेड ड्रेसचे फिटिंगचे काम त्यांच्याकडे येतात. कुंची ते अनारकली सगळ्या प्रकारचे कपडे शिवतात. ग्राहकांशी कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकावे म्हणूनच त्यांच्याकडे तीन पिढीतील लोक येतात. आजी ते नाती पर्यंत असे अनेक ग्राहक त्यांच्याकडे येतात. धावपटू नंदा जगताप ते सिंधुताई सपकाळ अशी मोठी यादी आहे. दुकान आर्मी एरियात असल्यामुळे देशाच्या कोपऱ्यातील स्त्रिया यांच्याकडे येतात त्यांच्या आवडी आणि संस्कृतीनुसार त्यांचे कपडे या शिवून देतात. त्यांनी मला येत नाही म्हणून कधी ग्राहकाला परत पाठवले नाही. नवनवीन गोष्टी शिकून त्या स्वत: ला यशवीरित्या सिद्ध केले आहे. म्हणूनच दिल्लीला बदली होऊन गेलेल्या लोकांना तर कुरियरने कपडे दिल्लीला पाठवतात.
लोणारी समाजातील
गरजू मुलींना शिक्षणासाठी त्यांनी सासूच्या नावे शिष्यवृत्ती
सुरू केली आहे. तसेच समाजातील अनेक गुणवंतांचा सत्कार केला
जातो. अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो. त्यांनी
आयुष्यात अनेक संकटावर मात करून स्वतः ला सिद्ध केले आहे. असे सगळ्यांनी
करावे म्हणून त्या इतरांना समुपदेशन करतात. कुटुंबातील असो वा
समाजातील आणि ओळखीचे त्यांना समुपदेशन करतात. त्यांना संकटाशी कसे लढायचे हे
शिकवतात. त्यामुळे समुपदेशक म्हणूनही आजकाल ओळखल्या जात आहेत. यामुळेच
कुटुंबातील सगळ्या बहीण-भाऊ त्यांना आदर्श मानतात.
या कामामुळे त्यांना सकाळ आणि
मिटकॉन द्वारे देण्यात येणाऱ्या उद्योजिनी पुरस्कारसाठी तीन वेळा नामांकन मिळाले
आहे. तसेच त्यांच्या समाजाच्या वतीने यशस्वी महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
खरतर सुनंदा ताईचे पुरस्कारापेक्षा काम खूप मोठे आहे.
त्यांच्याशी बोलताना जाणवले
की सुनंदाताई म्हणजे जबाबदारीची जाणीव, प्रमाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर व तंतोतंत
पालन करणाऱ्या आहेत. याचमुळे त्यांच्याकडे आलेले ग्राहक कधीही नाराज होत नाही.
त्या शेवटी म्हणतात की माझ्या
आवडीने मला म्हणजे शिलाईकामाने मला जगण्याची हिंमत, संसार सांभाळण्याची ताकत आणि
समाजात पैसा, सन्मान दिला.
सुनंदा ताई खऱ्या अर्थाने मॅनेजमेन्ट
गुरु आहेत. टाईम मॅनेजमेन्ट, फायनान्स मॅनेजमेन्ट हे त्यांच्याकडून शिकायला मिळते
तर ग्राहकसंबध कसे जपावे हे कुठल्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये शिकायला मिळणार नाही
त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे मिळते. कमिटमेंटच यापेक्षा चांगल उदाहरण शोधून
सापडणार नाही.
No comments:
Post a Comment