सणासुदीत तिला लांब
ठेवले जाते. देवघर असो की स्वयंपाकघर दोन्हीपासून चार हात लांब राहायचे
तिने. मासिक पाळीच्या त्या चार दिवसात अपवित्र ठरवून बाहेर बसविलेल्या कुठल्याही स्त्रीची
मानसिक घालमेल संपता संपत नाही.
पण जी हा कचरा वाहून नेते
तीच काय ? तिला कोणत्या नजरेला सामोरे जावे लागत असेल
रोज ? कोणती वागणूक मिळत असेल.
पाचवीला दारिद्र्य पुजलेले अशा घरात जन्माला आली संगीता चितारे. अगदी लहान वयात
लग्न झालं आणि मग दोन मुलं. असा संसार सुरू झाला .नवरा मोलमजुरी करून संसार चालवत
होता. संगीता मात्र अभ्यासात हुशार असल्याने पुढचं शिक्षणही चालू ठेवून बारावीची
परीक्षा दिली. लहानपणापासून शिक्षक होण्याची आवड असल्यामुळे बी. एड.पदवी
घेतली. त्याकाळी कॉलेजमध्ये हुशार मुलींमध्ये संगीताचा पहिला - दुसरा
नंबर असायचा .कॉलेज संपून बरेच दिवस झाले पण काही नोकरी मिळत नव्हती .
नवऱ्याच्या एकट्या जीवावर संसार काय उभारी घेत नव्हता. नोकरीसाठी रोज नेते मंडळी
आणि मंत्र्याच्या कार्यालयाच्या पायर्या चढत होती. पण नोकरी काही लागेल . खचली
नाही आज ना उद्या मिळेल एकेक दिवस पुढे ढकलत होती. नवरा दोन पैसे कमवत होता.
म्हणून घरीच मुलांचे संगोपन करत संसारात रमु लागली. एक दिवस तिला दौंड येथील
शाळेतून फोन आला . कामाला सुरुवात झाली, पण काम कंत्राटी
पद्धतीने असल्यामुळे निम्माच पगार मिळू लागला . तरीही सुरुवात आहे म्हणून सहा वर्ष
काढली .त्यानंतर कायम स्वरुपी कायमस्वरूपी जागा निघाल्यावर त्यासाठी शाळे
कडून पैसे मागण्यात आले. सहा ते सात लाख रुपये कुठून भरायचे त्यामुळे काम सोडून
दिले दुसरीकडे नोकरी लागेल या विचाराने आणखीन सहा-सात महिने निघून गेले .
एक दिवस नियतीने घाला घातला. संगीताताईच्या पतीचे अल्पशा आजारपणाने निधन
झाले. सगळा संसार उघड्यावर पडला. हसती खेळती दोन मुले आणि उघड्यावर पडलेला
संसार सांभाळत संगीताताई पुन्हा उभ्या राहिल्या.
आता मात्र रोज नवीन संघर्ष सुरू झाला घरात खायला कण नाही
आणि हाताला कुणी काम देईना अशा अवस्थेत माहेरून थोडीफार मदत झाली आणि सहा-सात
महिने कधी निघून गेले कळले नाही. दरम्यान मनपाच्या शाळेत शिक्षक भरती सुरू होती.
यासंदर्भात स्थानिक नेत्यांना कामा संदर्भात वारंवार विनंत्या करून झाल्या . पण
पैसे भरल्याशिवाय नोकरी नाही त्यांना सांगण्यात आले. हातात पदवी असून नोकरी मिळत
नव्हती . तसेच मूलही मोठी होऊ लागली होती. कामाशिवाय पर्याय नव्हता धुण- भांडी
करणे मनाला पटत नव्हते. शिक्षणाचा उपयोग करून कुठल्यातरी कार्यालयात काम करावे
प्रयत्न सुरू होते. एक दिवस संस्थेचे काही लोक कामासाठी महिला शोधत होते. कामासाठी
सगळ्याजणी हो म्हणत होत्या पण कामाचा स्वरूप पाहून कुणीही पुढे सरसावत नव्हतं.
कारण ते काम होतं सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणे. संपूर्ण वस्तीमधून फक्त
संगीताताईंनी कामाला होकार दिला न देऊन करतील तरी काय घरात पोरांच्या पोटात पडलेली
आग विजवण्यासाठी शिकल्या-सवरल्या आईने आज एक पाऊल पुढे उचललं होतं. पदवी घेऊनही जर
काम मिळत नसेल आणि पोरांची पोट भरता येत नसेल ही पदवी तरी काय कामाचे हा विचार
करून त्यांनी कामाला होकार दिला.
नोव्हेंबर 2014 मध्ये कामाला
सुरुवात झाली. अगदीच अत्यल्प मानधनात काम सुरू केले. घरोघरी जाऊन सॅनेटरी नॅपकिन
जमा करणे आणि जमा केलेले नॅपकिन डिस्पोजल मशीन मध्ये टाकून त्याची विल्हेवाट
लावणे. अशा स्वरूपाचं काम संगीता ताई गेली चार वर्ष करत आहेत.
महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन रोज सॅनेटरी नॅपकिन
गोळा करून आणतात. प्रोजेक्ट मध्ये जाऊन त्याचे वर्गीकरण करून त्यानुसार त्याची विल्हेवाट
लावतात. कचरा उचलतात त्यापेक्षाही हीनदर्जाचे समजले जाणारे हे काम त्या
गेल्या अनेक वर्षांपासून करतात. नॅपकिनची विल्हेवाट लावताना अतिशय घाणेरडा वास
येतो त्यामुळे संगीता ताई सकाळी नाष्टा करून येतात ते रात्री घरी गेल्यावर जेवतात.
कामाच्या ठिकाणी पाणी प्यायची इच्छा होत नाही असे सगळे वातावरण आजूबाजूला असते.
कचरा प्रकल्पात एका कोपऱ्यात सॅनेटरी नॅपकिन डिस्पोजल साठी एक छोटीशी रूम बांधून
दिलेली आहे त्यामध्येच एक मशीन आहे त्यावरही सगळे काम सुरू असते. ती मशीन हाताळणे
हे कौशल्याचं काम आहे त्या मशीनमध्ये योग्य प्रमाणात घेतले जातात आणि योग्य
तापमानावर त्यांची विल्हेवाट लावली जाते हे अतिशय किळसवाणे काम अत्यंत
कौशल्यपूर्ण करत असतात. मशीन मध्ये फक्त कागद आणि सॅनेटरी नॅपकिन त्याची विल्हेवाट
लावली जाते. चुकून जरी प्लास्टिक आत मशीनमध्ये गेले तर काम बंद पडते .त्यामुळे
अतिशय लक्षपूर्वक आलेल्या कचऱ्यातून वर्गीकरण करून सॅनेटरी नॅपकिन काढून आणि मशीन
मध्ये टाकावे लागतात.आता मात्र त्यांचा मुलगा त्यांच्या मदतीला येत आहे. त्यामुळे
त्या अधिक क्षमतेने काम करू शकतात.
संगीताताई यांनी सांगितले की ,हे काम अतिशय हीन दर्जाचे समजले जाते परंतु समाजाच्या आणि
पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे काम आहे. आम्ही कचरा गोळा करायला गेलो की
अनेक महिला आणि पुरुष आमच्या पासून चार हात लांबून चालतात. यामुळे जुन्या काळात
जशी दलितांना वागणूक मिळत होती त्याची अनुभूती मिळते. काही लोक तर लांबून जा असेच
सांगतात. आपल्याकडे मासिक पाळी आधीच अपवित्र समजली जाते त्यात वापरण्यात येणारी
नॅपकिन ही अपवित्र आणि तो कचरा नेणारे लोक ते तर अधिक अपवित्र समजले जातात.
माणसासारखे माणसाने पण ज्या पद्धतीने वागणूक मिळते ते पाहून अनेक वेळा डोळे भरून
येतात पण पोटाची आग डोळ्यातलं पाणी मिटून घेते. मी पुन्हा कामाला लागते. रोज
सगळ्या जगाची घाण आम्ही साफ करतो तेव्हा खूप वाईट वाटते पण त्यातून
मिळणाऱ्या पैशामुळे माझ्या पोरांची फोटो भरतात . मुले शिकून ती मोठी होतील या
आशेने मी पुन्हा दुसर्या दिवशी कामाला येते. घरची परिस्थिती यामुळे मुलगा पुढे
शिकू शिकला नाही आता मला मदत करतोय यातच समाधान आहे. आपले शहरांमध्ये हजारो
टन कचरा जमा होतो त्याची योग्य विल्हेवाट लावायला आपली यंत्रणा कमी पडत आहे आमची
संस्था आणि आम्ही यासंदर्भात जनजागृती करत आहोत परंतु अधिक मोठ्या प्रमाणात
जनजागृतीची गरज आहे. तेव्हाच कुठे आम्हालाही थोडा सन्मानाने जगता येईल. आम्हाला
मिळणारी हीनतेची वागणूक कमी होईल. अनेक वर्ष मी माझी ओळख लपून काम केले. समाज काय
म्हणेल माझे नातेवाईक, मित्रमंडळी यांना जर कळालं तर मी एवढी शिकूनही असे
काम करते याची भीती होती. एक दिवस ठरवलं पोटासाठी काम करतोय चोरी नाही, काय काम करतोय सांगायला लाज कसली बाळगायची. आणि मी बिनधास्त
काम करू लागले.
संगीताताईचे काम पाहून घोरपडी गावात रणरागिणी संस्थेच्यावतीने महिलादिनानिमित्त
त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी जमलेल्या
महिलांना त्यांच्या कामाची माहिती देत होत्या.त्यावेळी अनेक महिलांनी नाक मुरडले.
पण जेव्हा त्यांनी हे काम करण्यामागील त्यांची कहाणी सांगितली. तेव्हा मात्र अनेकजणींना रडू आवरले
नाही. घोरपडी गावातील त्या छोट्याश्या गल्लीत हा सगळा कार्यक्रम सुरू होता.
कार्यक्रमातील पाहुणे रडतात आणि जमा झालेले प्रेक्षकही रडत आहेत. असे दृश्य
कदाचित पाहायला मिळते. या सगळ्यांना संगीताताईसाठी काहीतरी करायची इच्छा होती.
संगीताताईने आयुष्यात पहिल्यांदा एवढा सन्मान पाहिला होता. कुणीतरी त्यांचा
आदर करत आहे म्हणून त्यांना भरून आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यात कितीतरी वेळ
माझ्यापाशी येऊन धन्यवाद बोलू लागल्या. आजवर मला ज्या समाजाने नाकारलं होतं, त्यांनीच माझा
सत्कार केला यासाठी माझे आभार मानू लागले
होते. माझ्यासाठी त्यांना या समाजाने स्वीकारले हीच मोठी गोष्ट होती.
कालपरवाच त्यांची मी चौकशी केली काम कसे सुरु आहे असे
विचारल्यावर त्या म्हणाल्या दोन महिने झाले घरीच बसू आहे, काम बंद झालं. घरात जाणवणारे
मी आणि माझा मुलगा दोघेही घरी आहोत. पहिल्यापेक्षा जास्त वाईट अवस्था झाली. आमच्या
संस्थेचं कॉन्टॅक्ट रद्द झाले पण दुसरी संस्था मला काम देणार आहे . हा त्यांचा
जीवनाकडे असलेला आशावाद मन जिंकून घेतो .तरीही दुसर काम असेल तर सांगा कारण दोन
महिने झाले एक वेळ जेवण करून दिवस काढत आहोत . मुलाला पण बघा काम तो कमवू लागला
तरी जरा किती बदलेल. हा त्यांचा जीवनाविषयी असलेला आशावाद मन जिंकून घेतो.
अशा कष्टाळू आणि आशावादी महिलांकडे पाहिलं की वाटतं कितीही
संकट आली तरीही त्या उभ्या आहेत नवीन आशेवर आणि जिद्दीवर . नाहीतर आपल्याकडे
छोट्या छोट्या गोष्टी साठी आत्महत्या करणारी माणसे खूप आहेत त्या सगळ्यांनी अशा
संगीताताई कडून जगण्याची उमेद घ्यायला काय हरकत आहे.
(घोरपडीमध्ये रणरागिणी संस्थेने सत्कार करताना...)