सर्वसामान्य स्त्री जेव्हा शासकीय अधिकारी होते तेव्हा ती आपल्या कामाला पूर्ण न्याय देत असते. तो न्याय देण्यासाठी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत असते आणि पाहत असते. अशाच एका नवीन गोष्टीच्या शोधत असताना विद्युत वरखेडकर यांना जागृती यात्रेची माहिती मिळाली आणि त्या जागृती यात्रेत सहभागी झाल्या. यात्रेहून आल्यावर त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शेकडो सकारात्मक तरुणाई आणि त्यांचे काम पाहून त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली. यात्रेतून परत आल्यावर त्यांनी घरच्याना आणि मित्रमंडळीना जागृती यात्रेची गोष्ट्र सांगितली. यात्रेविषयी बोलण्यासारखे खूप काही होते,पण काय सांगणार आणि काय नाही असा प्रश्न पडत असे. तेव्हा त्यांनी यात्रेविषयीचे अनुभव एकत्रित मांडण्याचा विचार केला. यात्रेत आलेले अनुभव आणि सकारात्मक तरुणाईकडून घेतलेली प्रेरणा यातून ‘डायरी ऑन व्हील’ या पुस्तकाची निर्मिती झाली.
पुस्तकाच्या लेखिका या शासकीय पदावर मोठ्या अधिकारी आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विद्युत वरखेडकर सर्वांना परिचित आहेत. जागृती यात्रेमुळे त्यांच्यातील लेखिका ही जगासमोर आली. ‘डायरी ऑन व्हील’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार विजय नाईक, जागृती सेवा संस्थापक शशांक मनी त्रिपाठी, माणदेशी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा चेतना गाला सिंह आणि इंडियन रिसर्च अकॅडमीच्या प्रमुख डॉ. शबाना खान आदि मान्यवर उपस्थित होते.
यात्रेमुळे विद्युत वरखेडकर यांना संपूर्ण देशातील आणि परदेशातील विविध तरुणाईशी संवाद साधता आला. त्यांच्या कामाबद्दल माहिती घेता आली. अनेक नवउद्योजक त्यांच्या संकल्पना घेऊन यात्रेत आले होते. उद्योगाचा विकास यावर त्यांचे विचार आणि संकटावर मात करण्यासाठी राबविलेले उपाय अशा अनेक गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्या. यात्रेत प्रत्येक दिवस त्यांना एक वेगळीच उर्जा मिळत राहिली. हीच उर्जा पुस्तक लिहिताना खूप उपयोगी पडली. अशा प्रकारे या पुस्तकाची निर्मिती झाली. या पुस्तकातून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. अशी आशा विद्युत वरखेडकर त्यांना वाटते.
यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आजूबाजूच्या सकारत्मक वातावरणामुळे नवीन जिद्द मिळत असते. शासकीय अधिकारी म्हणून एक गोष्ट फार महत्वाची वाटते की देशातील तरुणाई जर देशाच्या विकासाचा विचार करत असेल तर त्यांना देशातील मुख्य प्रश्नांशी जोडले पाहिजे म्हणजे त्यांच्या विचारातून हे प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल. अशा तरुणाईला आवश्यक मार्गदर्शन आणि त्यांच्या निर्मितीला हातभार लावणे हेच यात्रेचे उद्दिष्टे आहे. असे विद्युत वरखेडकर यांनी सांगितले.
२००८ सालापासून ही यात्रा सुरु झाली आहे. यात्रेच्या दरम्यान सुमारे 8000 किलोमीटरचा प्रवास केला जातो. देश-परदेशांतील सुमारे ४००-५००नवउद्योजक या यात्रेत सहभागी होऊन सामाजिक व व्यावसायिक उद्योजिकता प्रशिक्षण घेत असतात . यात्रेदरम्यान हा युवावर्ग अनेक नामवंत व्यक्तींशी संवाद साधतो. ज्यामध्ये अरविंद आय केअरचे डॉ. अरविंद, ग्राम विकास, संस्थेचे जो माडीयेथ, आणि गुंज संस्थाचे अंशू गुप्ता अशा अनेक दिग्गज व्यक्तीसोबत चर्चा करताना त्यांना देशातील काही जटील समस्यावर सोपी, कायमस्वरूपी उपाययोजना कशी राबविली याचे प्रशिक्षण मिळते. यामधून तरुणांना उद्योगशीलतेला प्रेरणा मिळते. यामध्ये ग्रामीण आणि शहरातील उद्योगशील तरुण सहभागी होतात. उद्योगातून देशासाठी मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांचे मार्गदर्शन घेण्याची, त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी यात्रेच्या माध्यमातून दिली जाते. अशा व्यक्तींकडून युवकांनी प्रेरणा घेऊन स्वत:चा व्यवसाय उभारावा व देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान द्यावे असा या यात्रेचा उद्देश आहे.
जागृती यात्रा दरवर्षी 24 डिसेंबरला मुंबईतून सुरु होते. देशातील विविध 10 रोल मॉडेलला भेट देत 8 जानेवारीला यात्रा परत मुंबईत येते. त्यामध्ये अंदाजे 40% महिला सहभागी होतात तसेच काही दिग्गज व्यक्तीही यात्रेसोबत असतात. या युवकांमधून रोजगार देणारे तयार व्हावे, त्यांनी आपल्या परिसरात काम सुरु करून तिथल्या समस्या सोडवाव्या. आतापर्यंत 3700 युवकांनी या यात्रेचा लाभ घेतला असून पाचशेहून जास्त लोकांनी स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु केला आहे. ते उद्योग कृषी, आरोग्य, उर्जा, पाणी-स्वच्छता, वास्तुनिर्माण, शिक्षण अशा सात क्षेत्रात विस्तारले आहेत.
यात्रेच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक युवकाने डायरी ऑन व्हील’ हे पुस्तक जरूर वाचावे.
No comments:
Post a Comment