Friday, 29 July 2016

सुपरवुमन रोहिणी कावडे मांगलेकर : नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा !

नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा : रोहिणी कवाडे मांगलेकर

लहानपणापासून चार भावंडामध्ये रोहिणीला अभ्यासात मध्यम गती होती. तरीही वडिलांना मात्र रोहिणी सर्वांपेक्षा वेगळी आहे असे वाटत होते. दहावीनंतर कॉमर्स घ्यायला निघालेल्या रोहिणीनी वडिलांच्या सांगण्यावरून मॉकनिकल इंजिनिअरच्या डिप्लोमाला ऑडमिशन घेतले. खूप अभ्यास करून उत्तम मार्कांनी डिप्लोमा पूर्ण केला. कॉलेज झाल्यानंतर निलेश मांगलेकर यांच्याशी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या. तिथे एका कंपनीत नोकरी करीत असताना मार्केटिंग काम जवळून पाहत आले. पुढे काही दिवसांनी पतीची बदली दिल्लीला झाली तेव्हा त्यांच्याच कंपनीत रोहिणी मार्केटिंगमध्ये रुजू झाल्या. तिथे सॉंफ्टवेअर मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत असताना त्यांना विक्रीचा चांगला अनुभव मिळाला. काही काळ काम केल्यावर पती-पत्नीला मातृभूमीची त्यांना  आठवण येत होती तसेच दोघेही कामात फार समाधानी नव्हते. तेव्हा मात्र स्वत:चे काहीतरी करू असा विचार करून नोकरी सोडून कोल्हापूरला आले.
पुण्यात अनेक आय टी कंपन्या आहेत म्हणून त्यांनी कोल्हापूरला काम सुरु केले. स्वत: पती –पत्नी आणि एक नोकर तसेच काही तुटपुंजी गुंतवणूक यावर काम सुरु करण्यात आले. आज त्यांच्याकडे चाळीस कर्मचारी असून पुणे , कोल्हापूरला असे दोन ऑफिस आहेत. तसेच अन्य काही जिल्ह्यात जसे सांगली , सातारा त्यांची कामे सुरु आहेत. सुरुवातीच्या काळात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे आणि प्रोजेक्टसाठी सहकार्य करणे. तसेच सामन्य लोकांना आयटी सर्व्हिस देणे सुरु केले. त्यांनी आय टीच्या विविध क्षेत्रात काम सुरु होते. त्याचवेळी लक्षत आले की कोल्हापूरला रिवर्स इंजिनिअरिंग मध्ये सर्व्हिस देणारी कंपनी नाही .तेव्हा कोल्हापूरमध्ये अशा प्रकारची सर्व्हिस देणारी त्यांनी पहिली कंपनी सुरु केली. त्यासाठी त्यांनी मशिनरी घेतली. फक्त तीन लाख गुंतवणूक केलेल्या त्या कंपनीचा आज दोन कोटी टनओवर झाला आहे.
रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये चांगला जम बसल्यावर त्यांनी बाकीच्या सर्व्हिसकामे आणि मुलांचे प्रशिक्षणवर्ग बंद केले. कारण प्रशिक्षणवर्ग संध्याकाळी असायचे त्यामुळे रात्री उशीरपर्यंत काम करावे लागत असे. पुन्हा सकाळी ऑफिस आणि संध्याकाळी प्रशिक्षणवर्ग यामुळे कामाचा प्रचंड ताण जाणवत असल्यामुळे प्रशिक्षणवर्ग बंद करून पूर्ण वेळ रिवर्स इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये लक्ष द्यायचे ठरवले. कोल्हापूरला काही कंपन्या बाहेरून सर्व्हिस घेत असत . अनुभवी लोक नसल्यामुळे अनेक सर्व्हिसेस आउटसोर्स करत होते तेव्हा रोहिणीताईच्या कंपनीने त्या कंपनीला आत्मविश्वास दिला की आउटसोर्स करण्यापेक्षा आम्ही तुमची कामे करून देतो. उत्पादन आणि इंजिनिअरिंग संदर्भातील अन्य कामे रोहिणीताईच्या कंपनीने करायला घेतली. यामुळे त्यांच्या कामाने वेळ घेतला. आणि कामे मोठ्या प्रमाणात सुरु झाले .
त्यांना नेहमी वाटायचे की आयटी क्षेत्र खूप वाव आहे, पण काही करायला संधी मिळत नव्हती. दोन वर्षापूर्वीपासून देशात आयटी क्षेत्राला चांगले दिवस आले तेव्हापासून त्यांनीही मात्र या क्षेत्रात उतरायचे ठरवले. आतापर्यंत जे काम करत होत्या त्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्यांनी पुण्यातील एका संस्थेशी भागीदारी करून ‘श्रीनेम टेक्नोलॉजी’ नावाने कंपनी सुरु केली त्याअंतर्गत सर्वसामान्य लोकांना आयटीशी निगडीत समस्यावर उपाय उपलब्ध करून द्यायचे. त्यासाठी   मोबाइल ऑप्लिकेशन बनवणे, सेल्स, ट्रेनिंग, आणि गरजेनुसार त्यांना सुविधा पुरविणे अशा रीतीने कंपनीचे काम सुरु आहे.

रोहिणीताईला स्वत:ला सेल्समध्ये जास्त रस आहे म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग केले तरीही त्यात काही रमल्या नाही. एक बिजनेसमॉन म्हणून त्या स्वत:ला जास्त सक्षम मानतात. त्यानुसार कामही करतात. म्हणूनच पाच वर्षात त्यांनी एवढी प्रगती केली आहे. आर्थिक समस्यावर मात करून त्यांनी आज स्वता:ला सिद्ध केले आहे. एक शांत व लाजाळू मुलगी ते आज एक बिजनेसवूमन असा प्रवास करताना त्यांच्यात अनेक बदल झाले. त्यामुळे त्यांची सामाजिक आणि आर्थिक उंची वाढली म्हणूनच त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत.  


Tuesday, 19 July 2016

कलेला वाहून घेतलेल्या कन्याकुमारी भोईटेची उंच उभारी !

स्वप्न पहा पण त्यावर विश्वास ठेऊन, त्याला कृतीची जोड दिली तर तेच कार्य जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. त्यावर निष्ठा ठेऊन आणि वेळ दिला की ते स्वप्न प्रत्यक्षात उतरते. या उक्तीप्रमाणे कन्याकुमारी भोईटे आयुष्य घडत गेले.
सोलापुरातील एका सुशिक्षित कुटुंबात कन्याकुमारीचा जन्म झाला. अगदी मुक्त वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासून त्यांची कलेकडे ओढ होती. त्यामुळे कागदी फुले, पॉट पेंटींग, आणि विविध प्रकारचे कलाकुसरीच्या वस्तू बनवत असे. वाढत्या वयानुसार कलेची कल्पकता वाढत गेली. यामुळे त्यांना अशा विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा छंद जडला. त्यामुळे त्या आपली कला जोपासण्यासाठी बाजारातून विविध वस्तू खरेदी करत असत. सतत नवीन काहीतरी बनवायचं आहे यासाठी प्रयत्नशील असत. या सगळ्यामध्ये त्यांनी नियमित अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केले नाही. कॉलेजमध्ये असताना त्यांनी पुष्पगुच्छ करण्याची कला शिकल्या. यामधून त्यांना एक वेगळी दृष्टि मिळाली. निसर्गातील विविध वस्तू वापरून त्या कलाकुसरीच्या वस्तू बनवू लागल्या. अगदी सुकलेली पाने-फुले जे मिळेल त्यामध्ये आपली कला शोधत असे. अनेक प्रदर्शनात त्यांनी आपली कला सादर केली. त्यामुळे त्यांना अनेक बक्षीस मिळाली. त्यांच्या कलेचे घरातल्यांपासून शिक्षकांपर्यंत सगळ्यांना कौतुक होते. आपली कला जोपसताना त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी पूर्ण केली.

शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सोलापूरमधील एका महाविद्यालयात मायक्रोबायोलोजीच्या प्राध्यापक म्हणून कामाला सुरुवात केली. या पदावर त्यांनी आठ वर्ष काम केले. या दरम्यान त्यांनी पी.एच.डी.ला करायला सुरुवात केली. त्याच काळात त्याचे लग्न शिवराज भोईटेशी झाले. पती गोव्याला राहत असल्यामुळे त्या गोव्याला राहायला गेल्या. तिकडे एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करत असताना संसार आणि काम यामुळे त्यांना पी.एच.डी.चे लिखाण करायला वेळ मिळत नसे म्हणून त्यांनी काम सोडून पी.एच.डी.साठी पूर्ण वेळ द्यायचा असे ठरवले त्यानुसार त्यांनी पी.एच.डी पूर्ण केली. घरी बसून काही काम करता येईल अशा संधी त्या शोधू लागल्या.
एक दिवस त्यांच्या मैत्रिणीने त्यांना एक भेटवस्तू म्हणून क्लीलिंगचा सेट दिला. त्याच्याविषयीची उत्सुकता वाढल्यामुळे त्यांनी इंटरनेटवर क्लीलिंग कलेची माहिती मिळवली. त्यापासून विविध वस्तू बनवायची पद्धत त्या इंटरनेटवर शिकल्या. घरी विविध आकाराच्या वस्तू जसे फुले, आकर्षक डिझाईन बनवू लागल्या. त्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून आणले आणि आणखीन काही वस्तू बनवल्या. इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन पद्धती शिकून त्यांना या कलेची गोडी निर्माण झाली. यामधून त्यांनी एक अत्यंत देखणी बाहुली बनवली. ती बाहुली नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीला खूप आवडली. तेव्हाच त्यांना या अशी एक अजून बाहुली बनून दे अशी मागणी आली.
आपली कला जगापुढे सादर करायची संधी शोधत असताना आय. टी कंपनीत या वस्तू विक्रीस ठेवू असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार पती व भाऊ यांच्यासमोर मांडला. दोघांचा होकार आल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली पण त्यांच्याकडे फक्त पंधरा दिवस शिल्लक होते. तरीही त्यांनी विविध वस्तू बनवल्या जसे थ्रीडी दिवे, मेणबत्ती, बनवल्या. या वस्तू विक्री करताना व्यावसायिक रीतीने त्याची पाकिंग करून त्यांचे कंपनीत प्रदर्शन ठेवले. कंपनीत भरपूर प्रतिसाद मिळाला. या कलेविषयीची आवड निर्माण झाल्यामुळे त्या आपल्या कामात नवनवीन संशोधन करून विविध वस्तू बनवू लागल्या. अशा प्रकारे एका कलेच्या माध्यमातून कन्याकुमारीचे आयुष्य बदलायला सुरुवात झाले. यामधून त्यांनी QuillEssence: सर्जनशीलता Curls "ची सुरुवात केली. नातेवाईक, आजूबाजूचे लोक त्यांच्या कामाचे कौतुक करत असे. तसेच त्यांचे पती त्यांच्या कलेचे कौतुक करताना आणखीन कसे चांगले करता येईल यासाठी प्रोत्साहन देत.
गोव्यात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु असताना कन्याकुमारी यांनी मेणबत्तीपासून संता पर्यंत अनेक वस्तू बनवून विक्रीसाठी ठेवल्या. याला लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कन्याकुमारी यांनी बनवलेल्या वस्तू पणजीत जीसीसीसीच्या महिला विभागाच्या वतीने आयोजित अस्तुरी या प्रदर्शन ठेवल्या होत्या. प्रदर्शनात त्यांच्या कामाचे खूप लोकांनी कौतुक केले.त्यांचे हे पहिले व्यावसायिक प्रदर्शन होते. प्रदर्शनामुळे त्यांच्या प्रोडक्टला एक मोठे व्यासपीठ मिळाले. तसेच मागणीत वाढ झाली, लोकांच्या आवडीनुसार भेटवस्तू बनवून देऊ लागल्या. या प्रदर्शनामुळे त्यांना नवीन प्रेरणा मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रोज नवनवीन वस्तू बनवून पाहत असे. कॉडेल होल्डर, फोटो फ्रेम, वॉल फ्रेम, वॉल आणि डोर हॉगिंग, दागिने, डॉल, कॉपरेट गिफ्ट आणि आणखी खूप काही. त्यांच्या कामाचे सगळेजण कौतुक करत असतात. त्यांना या कामातून शांतता आणि तणावमुक्त राहण्यास मदत मिळते म्हणून हे काम, काम राहिले नाही तर एक छंद बनला आहे.

त्यांनी बनवलेल्या वस्तू देश -विदेशात पोहचल्या आहेत. दुबई, श्रीलंका, जर्मनी अशी मोठी यादी आहे. या कामामुळे त्यांची समाजात एक ओळख निर्माण झाली आहे. त्यांना जे हवे ते करायला मिळते म्हणून त्या खूप आनंदी आहेत. कुटुंबातील सहकार्यामुळे त्या आज स्वता: ची ओळख निर्माण करू शकल्या. पतीच्या पाठिंब्यामुळे त्या आज स्वता: चा व्यवसाय सुरु करू शकल्या. हा व्यवसाय पती- पत्नीच्या भागीदारीत सुरु केला असून त्यासाठी पती नेहमी मदत करतात.
नुकतीच त्यांना पी'एचडी पदवी मिळाली असून शैक्षणिक व्यवसायासोबत आपली जोपसणार आहेत तसेच कलेच्या आणि व्यवसाय म्हणून त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. 

त्याचबरोबर कामाचा वाढता व्याप पाहून टीमचा विस्तार करणार आहेत. काही लोक त्यांच्या ही कला शिकण्यासाठी येत आहेत तर यासंदर्भातील नियमित कार्यशाळाही सुरु करणार आहेत. भविष्यात ई कॉमर्स कंपनी सुरु करण्याचा विचार आहे.

Friday, 15 July 2016

मॅनेजमेन्ट गुरु : शिलाईकाम करणाऱ्या सुनंदा ताई ,प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व


चित्रपटात अनेक वेळा पाहिलं की हिरोची आई शिलाईमशीनवर कपडे शिवते आणि हिरोला शिकवते आणि त्यांचे पालनपोषण करते. तिने एका मशीनवर काम सुरु केलेले असते आणि चित्रपटाच्या अखेरीस ती एका मोठ्या दुकानाची मालकीण झालेली असते. हिरो आता गरीब, दुबळा राहिलेला नसून शिकून श्रीमंत झालेला असतो. पूर्वी असे दृश्य अनेक भारतीय चित्रपटात दिसत असे. पण असे वास्तवात कुठे असे घडते असे आपल्याला वाटते. पण एका माऊलीने  शिलाईमशिनच्या सहाय्याने आपले घर –संसार सांभाळून दोन्ही पाल्यांना आपल्या पायावर उभे केले. आज दोघांची आपआपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे.

ही माऊली म्हणजे सुनंदा दत्तात्रय राक्षे. बालपणापासून काहीतरी नवीन शिकायची हौस. त्यांचे बालपण हे बारामतीत होळकर सादोबाची वाडीत गेले. घरी वडिलोपार्जित कपडे शिवायचा व्यवसाय होता त्यामुळे त्या घरात आईला हातावर शिवताना पाहत असत. शेजारी एक बंगाली बाई होती, ती मशीनवर कपडे शिवत असे, आपल्यालाही असे कपडे शिवता यावे म्हणून त्या बंगाली बाईकडे जाऊन मशीनकाम शिकत असत. हळूहळू शिक्षण पूर्ण करताना शिलाई मशीनवर कपडे शिवण्याची कला जोपासली. दहावीला असताना लग्न ठरले शिक्षण पूर्ण करायची जिद्द असल्यामुळे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पेपर दिला. कोणतेही काम घेतले की पूर्ण करायचे ही सवय अगदी लहानपणापासून जपली आहे. हेच त्याच्या यशाचे गमक आहे. त्यामुळेच आज यशस्वी व्यावसायिक आहेत.


लग्नानंतर घोरपडी राहायला आल्यावर काही तरी करावं सारख वाटत असे, शांत बसायची सवय नव्हती म्हणून त्यांनी शिवणकाम शिकायला सुरुवात केली. दोन महिने क्लास केला. पहिला दसरा म्हणून सासूबाईने कानातले घ्यायचे ठरवले होते, तेव्हा राक्षे ताई म्हणाल्या की मला त्यापेक्षा कपडे शिवायची मशीन घ्या. सप्टेंबर १९८३ घरात पहिली मशीन आली. घरचे कपडे शिवायला सुरु केले मग मैत्रिणी आणि शेजारील स्त्रियाच्या ब्लाउज शिवून दिले. कामाच्या बाबतीत गुणवत्ता आणि दर्जा चांगला असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोक कपडे शिवायला येऊ लागले. कधी जाहिरात किंवा बॉनर लावायची गरज पडली नाही. त्यामुळे शाळेच्या गणवेश ऑडर मिळायला लागल्या. लग्नसराई,दिवाळी, ईद, नाताळ अशा मोठ्या सणावाराला भरपूर काम मिळू लागले. अगदी मायतीचा ब्लाउजचे काम आले तरी नाकारले नाही. कारण काम काम असते म्हणून सगळ्या प्रकारचे काम स्वीकारले.

कामाचा वाढता व्याप पाहून राक्षे ताईच्या पतीने सांगितले की तू दुकान सुरु कर, आम्ही सहकार्य करू कामात असे सांगितले. सासूबाईनी पदर खोसून तयार झाल्या. राक्षेताई दिवसभर दुकानात काम करत असल्यामुळे घरातील सगळे कामे सासूबाई स्वत करत. कधी स्वयंपाक करावा म्हणून अपेक्षाही केली नाही. १९८९ ला घरालागत असलेल्या खोलीत दुकान सुरु केले. एका मशिनच्या माध्यमातून सुरु झालेले काम हळूहळू वाढत गेले तशा मशीनही वाढत गेल्या. पन्नास हजार रुपये भांडवलाची गुंतवणूक करून मोठ्या थाटाने दुकान सुरु केले. त्यामुळे कामाचा व्याप वाढला तशी कमाईही सुरु झाली. कामामध्ये राक्षेताईचे पती त्यांना मदत करत असत. दिवसभर एका खासगी कंपनीत काम करून आल्यावर संध्याकाळी ते पत्नीच्या कामात सहकार्य करत. अगदी कपड्यांना काचा करण्यापासून ते सर्व काम करत. काही समस्या असेल तर भक्कम पाठिंबा देत असत.

सगळे छान सुरु असताना एक दिवस त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला,त्यांच्या पतीने निधन झाले. त्यांचा आधार गेला पण सासूबाईनी धीर दिला. त्यामुळे काही दिवसांतच त्या पुन्हा कामाला लागल्या. त्यावेळी त्यांची चिमुकली मीनल त्यांच्या कामात मदत करू लागली. सासूबाईनी संसाराचा सगळा कारभार हातात घेतला आणि फक्त कामावर लक्ष दे म्हणाल्या. त्यांच्या या पाठिंब्यामुळे घरातील उत्पन्न सुरु राहिले. त्या नेहमी म्हणायच्या की “कमाईतील दोन पैसे नेहमी अडीअडचणीला बाजूला ठेवावे” त्यांच्या या सल्ल्यामुळे मला बचतीची सवय लागली आणि त्यामुळे या अडचणीच्या काळात आणि  व्यवसाय वाढीला खूप मदत झाली. म्हणून कधीही पैश्याच्या अडचणीमुळे कामात खंड पडला नाही. उलट यामुळे बचतीची सवय लागली. असे राक्षेताई सांगतात.
आजपर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण त्यांनी कधी मागे पाहिले नाही. त्यांनी स्वत:चा संसार सांभाळताना अनेक महिलांना रोजगार दिला. त्यांना शिलाईमशीन शिकवली , काहींनी यांच्याकडे राहून आपल्या संसाराला हातभार लावला तर काहींनी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. त्यांच्या शिष्यापैकी अनेकजणी यशस्वी व्यवसायिक आहेत. काहीतर स्वता:चे दुकान टाकले आहे. आतापर्यंत १०५६ मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

काळानुसार शिलाईकाम हे फक्त कपडे शिवणे राहिले नसून एक फॅशन इंडस्ट्री तयार झाली आहे. त्या अनेकजणींचे फॅशनबेल  ड्रेस शिवतात आणि लोकांना नव्या फॅशनबाबत सांगतात पण त्या स्वतः मात्र फार साध्या पद्धतीने राहणे पसंत करतात.

आता रेडीमेड कपड्याचा काळ आहे. या बदलत्या काळानुसार त्यांनी स्वता:च्या कामात बदल करून घेतले त्यामुळे दुकान कधी तोट्यात गेले नाही. साधा लहान मुलींचा फ्रॉक ते शांतीचा ड्रेस असो वा मैने प्यार किया मधला माधुरीचा ड्रेस त्यांनी टीव्हीवर पाहून शिवून दिला. आता नेटवर शोधून नवीन फॅशनचा ड्रेस शिवतात. रेडीमेड कपड्याचा त्यांच्या व्यवसायावर कधीही परिणाम झाला नाही त्यांनी काळानुसार बदल केले म्हणून आज रेडीमेड ड्रेसचे फिटिंगचे काम त्यांच्याकडे येतात. कुंची ते अनारकली सगळ्या प्रकारचे कपडे शिवतात. ग्राहकांशी कसे वागावे हे त्यांच्याकडून शिकावे म्हणूनच त्यांच्याकडे तीन पिढीतील लोक येतात. आजी ते नाती पर्यंत असे अनेक ग्राहक त्यांच्याकडे येतात. धावपटू नंदा जगताप ते सिंधुताई सपकाळ अशी मोठी यादी आहे.  दुकान आर्मी एरियात असल्यामुळे देशाच्या कोपऱ्यातील स्त्रिया यांच्याकडे येतात त्यांच्या आवडी आणि संस्कृतीनुसार त्यांचे कपडे या शिवून देतात. त्यांनी मला येत नाही म्हणून कधी ग्राहकाला परत पाठवले नाही. नवनवीन गोष्टी शिकून त्या स्वत: ला यशवीरित्या सिद्ध केले आहे. म्हणूनच दिल्लीला बदली होऊन गेलेल्या लोकांना तर कुरियरने कपडे दिल्लीला पाठवतात.

 
लोणारी समाजातील गरजू मुलींना शिक्षणासाठी त्यांनी  सासूच्या  नावे शिष्यवृत्ती  सुरू केली आहे.  तसेच समाजातील अनेक गुणवंतांचा सत्कार केला जातो. अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.  त्यांनी आयुष्यात अनेक संकटावर मात  करून स्वतः ला सिद्ध केले आहे. असे सगळ्यांनी करावे म्हणून त्या  इतरांना  समुपदेशन करतात. कुटुंबातील असो वा  समाजातील आणि ओळखीचे त्यांना समुपदेशन करतात. त्यांना संकटाशी कसे लढायचे हे शिकवतात. त्यामुळे समुपदेशक म्हणूनही  आजकाल ओळखल्या जात आहेत. यामुळेच कुटुंबातील सगळ्या बहीण-भाऊ  त्यांना आदर्श मानतात. 

या कामामुळे त्यांना सकाळ आणि मिटकॉन द्वारे देण्यात येणाऱ्या उद्योजिनी पुरस्कारसाठी तीन वेळा नामांकन मिळाले आहे. तसेच त्यांच्या समाजाच्या वतीने यशस्वी महिला म्हणून पुरस्कार मिळाला आहे. खरतर सुनंदा ताईचे पुरस्कारापेक्षा काम खूप मोठे आहे.


त्यांच्याशी बोलताना जाणवले की सुनंदाताई म्हणजे जबाबदारीची जाणीव, प्रमाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर व तंतोतंत पालन करणाऱ्या आहेत. याचमुळे त्यांच्याकडे आलेले ग्राहक कधीही नाराज होत नाही.
त्या शेवटी म्हणतात की माझ्या आवडीने मला म्हणजे शिलाईकामाने मला जगण्याची हिंमत, संसार सांभाळण्याची ताकत आणि समाजात पैसा, सन्मान दिला.
सुनंदा ताई खऱ्या अर्थाने मॅनेजमेन्ट गुरु आहेत. टाईम मॅनेजमेन्ट, फायनान्स मॅनेजमेन्ट हे त्यांच्याकडून शिकायला मिळते तर ग्राहकसंबध कसे जपावे हे कुठल्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये शिकायला मिळणार नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे मिळते. कमिटमेंटच यापेक्षा चांगल उदाहरण शोधून सापडणार नाही. 

Friday, 8 July 2016

कोल्हापूरची तेजस्विनी युवकांसाठी आदर्श उदाहरण



बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे तेजस्विनीचे आहे. पाच वर्षाची असल्यापासून ती भरतनाट्यम शिकत आहे. ७ वी ला असताना तिने भरतनाट्यमची सर्वात अवघड आयागितरम परीक्षा दिली. तेव्हा ती गुजरातला राहत होती. दहावीनंतर कोल्हापूरला आल्यावर तिने स्वत: क्लास घ्यायचे ठरवले, शेजारील दोन- तीन मुलीला घेऊन क्लास सुरु केला. आज तिच्याकडे नियमित येणाऱ्या ४५-५० मुली आहेत. इंजिनिअरींगचे शिक्षण चालू असताना या क्लासच्या माध्यमातून ती घरी दहा- बारा हजार देते. यामुळे ती शिक्षण पूर्ण व्हायच्या आधी ती स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी आहे.
गुरु संयोगिता पाटीलच्या मार्गदर्शनामुळे ती आज भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. या क्षेत्रातील अनेक टप्पे पार करायला काहीना आयुष्य जाते, तेव्हा तेजस्विनीने अगदी लहानवयात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. ती इथे थांबली नाही तर पुढे जाऊन स्वत:चा आणखीन एक क्लास सुरु केला असून मुलींना भारतीय पारंपारिक नृत्य शिकवत आहे. गुरूच्या द्वारे आयोजित एका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ती आणि तिच्या शिष्य सहभागी झालाय होत्या. ज्यामध्ये पहिल्यांदा २००० मुलीनी एकत्र येऊन भरतनाट्यम सादर केले. कोल्हापूरच्या शाहू स्टेडियममध्ये हा रंगारंग कार्यक्रम पार पडला.

तेजस्विनी फक्त भरतनाट्यममध्येच नाही तर अभ्यासातही फार हुशार आहे. तसेच ती रेडीओ मिरचीच्या रेडीओ जॉकी स्पर्धेत टॉप टेन मध्ये नंबर पटकावला होता. टोमॅटो एम एम मध्ये तिने काही काळ काम केले आहे. तिच्या कॉलेजने तिला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. तिच्या यशाची वाटचाल पाहून तिला के . आय . टी प्राईड पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
तिला भरतनाट्यमसोबत सामाजिक कार्यात खूप रस आहे म्हणून कॉलेजच्या मानस कमिटीची सक्रीय सभासद आहे , यामध्ये नवीन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया पासून अभ्यासातील अडचणीपर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाते. वैयक्तिक असो अन्य काही समस्या असेल तर या कमिटीच्या सहकार्य केले जाते. या सगळ्यात तेजस्विनीचा नेहमी पुढाकार असतो.
विश्वजित काशीद यांनी एका  सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तेजस्विनीला आपली कला सादर करायची संधी दिली आहे, ज्यामध्ये १० जुलैला अफगाणी विद्यार्थी यांना आपली भारतीय कला, संस्कृतीची ओळख आणि त्याची शिकवण दिली जाणर आहे. पारंपारिक नृत्य प्रकार ते भरतनाट्यम असे सगळे प्रकार शिकवले जाणार आहेत याची सगळी जबाबदारी तेजस्विनीवर आहे.
युनोस्कोच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठात एका कार्यक्रमात तिला सहभाग घेण्याची संधी मिळाली तेव्हा तिने पाकिस्तानमधील युवक त्यांच्या समस्या आणि उपाय यावर प्रोजेक्ट सादर केला होता. जगभरातील युवकवर्ग आणि भारत- पाक युवकांचे संबध सुधारण्यासाठी हा प्रकल्प युनोस्कोच्यावतीने आयोजित केला जातो.
भविष्यात तिच्या ग्रुपच्या मदतीने पन्हाळा गडावर वृक्षारोपण करण्यात येणार असून ते व्यवस्थित संशोधन करून केले जाणार असून स्वच्छता मोहीम सुरु केली जाणर आहे. तिचे योग्य नियोजन आता सुरु आहे . लवकरच हा प्रकल्प पन्हाळगड वरील पर्यटकांना दिसणार आहे.
अशी बहुगुणी तेजस्विनी युवक वर्गासाठी एक आदर्श विद्यार्थीसह शिक्षकही आहे.








Monday, 4 July 2016

गृहिणी ते उद्योजिका असा मृणाल चव्हाणचा प्रवास सुरु

सवड ही कधी आवड होईल काही कळत नाही. अशाच सवडीने तिला काहीतरी करायला प्रेरणा मिळाली. मोकळा वेळ आणि आवड यातून मृणाल चव्हाण यांच्या मृ स्कूल ऑफ आर्टची पायाभरणी सुरु झाली आणि आज ते कोल्हापूरच्या आर. के नगरमधील नामांकित आर्ट स्कूल बनले आहे.

 

मृणाल यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड त्यामुळे कॉलेजमध्ये कमर्शियल आर्ट घेऊन शिक्षण पूर्ण केले. कोलापुरच्या कला निकेतन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात दोन वर्ष काम केले. पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूरला परत आल्यावर आजूबाजूच्या मुलांना चित्रकला शिकवायला सुरुवात केली. एका विद्यार्थीपासून सुरु झालेला प्रवास मोठा होत गेला. हळूहळू विद्यार्थी वाढू लागले. काही दिवस त्या दुसऱ्यांना शिकवत होत्या पण स्वतः काहीतरी शिकावे म्हणून भरतनाट्यम शिकण्याची इच्छा घरी बोलवून दाखवली , घरच्यांची परवानगी घेऊन कोल्हापूरला जायला तयार झाल्या पण इतर काही विद्यार्थीनी असेच  नृत्य प्रकार शिकू इच्छित होत्या, मग आपण सात-आठ किलोमीटर लांब जाण्यापेक्षा शिक्षकाला इथे बोलवूया यासाठी इतर विद्यार्थिनी तयार झाल्या अश्या प्रकारे मृ स्कूल ऑफ आर्टची सुरुवात झाली.
घराच्या बाजूला मोकळ्या जागेत क्लास सुरु झाला. मग हळूहळू विद्यार्थी वाढू लागले. नृत्यसाठी आजूबाजूच्या अनेक मुली येऊ लागल्या. मुलांना काहीतरी शिकावे म्हणून इच्छा होती त्यानुसार तबला शिकवण्यासाठी शिक्षक बोलवले. त्यानंतर गिटार शिकवण्यासाठी काहीजण उत्सुक होते म्हणून गिटारचा क्लास सुरु झाला. परिसरातील महिलांना दुपारी वेळ असतो म्हणून गायन शिकवे असे वाटत होते म्हणून गायनचा वेगळा विभाग सुरु करण्यात आला. सात –आठ विद्यार्थी असलेला क्लास आता त्यामध्ये ७०- ८० विद्यार्थी झाले. यामुळे गावातच विविध कला शिकवण्याचे केंद्रच आर. के नगरमध्ये सुरु झाले. क्लासचा दर्जा टिकवण्यासाठी विशारद कलाकाराची नेमणूक शिक्षक म्हणून केली.
लग्नानंतरही वडिलांनी दिलेल्या जागेत क्लास सुरूच होता.पत्नीची आवड पाहून पतीने प्रोत्साहन दिले तू फक्त क्लास घेऊ नको त्याचे स्कूल म्हणून सुरु कर म्हणजे याचा मोठ्या प्रमाणत विस्तार करता येईल, असे सांगितले . त्यासाठी सासऱ्यानी सुनबाईला एक फ्लट भेट म्हणून दिला. मग काय घराजवळच मृ स्कूल ऑफ आर्टची स्थापना झाली. पती आणि सासरच्या मंडळींनी पाठिंबा दिला म्हणून एक गृहिणी आज उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे.
या स्कूलमुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक महिलांना शनिवार आणि रविवारी वेळ मिळेल तेव्हा दोन तास आपली आवडती कला शिकायला मिळत आहे. यामुळे सगळ्या महिलांना रोजच्या रुटीनमधून थोडासा चेंज मिळतो आणि एखादी कलाही जोपासायला मिळत आहे, म्हणून सगळ्याजणी आनंदी आहेत. याच श्रेय जाते ते मृणाल चव्हाण यांना.