Thursday, 22 October 2015

माझिया सख्या ......



मैत्री म्हणजे आपल्या जीवनातील सुंदर गोष्टी असते. त्यात रुसवे-फुगवे, भांडण-प्रेम आणि अजून बरेचं काही असते. माझ्या नशिबाने मला सगळे मित्र-मैत्रिणी चांगले मिळाले. त्यामुळे जीवनाचा आनंद लुटता येतो. नेहमी सुख –दु:खात या सगळ्यांनी साथ दिली. त्यातही विशेष करून माझ्या सगळ्या मैत्रिणीनी. अगदी शाळेपासून आज पर्यंत अनेक मैत्रिणी माझ्या आयुष्यात आल्या. त्यांच्यासोबत मी  घडले, कधी पडले तर कधी रडले ही.....
आज अश्याच काही मैत्रिणीच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करणार आहे. लहानपणापासून घराच्या आजूबाजूला फार शेजारी नसल्यामुळे शाळेतील मैत्रिणी याच माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. आजही आमची मैत्री टिकून आहे. फक्त सगळ्याजणी आपआपल्या आयुष्यात व्यस्त आहेत . त्यामुळे पूर्वीसारखे बोलणे किंवा भेट होत नाही. पण अजून सणासुदीला मेसेजवरून संवादाची देवाणघेवाण सुरु असते. अधूनमधून लग्नकार्यात भेट होत राहते. पण कधी कधी जुने दिवस आठवून मित्र-मैत्रिणीची आठवण येते. असो तर आज या मैत्रिणींच्या समवेत घालवलेले काही क्षण  त्या दिवसांचा आनंद पुनश्च घेणार आहे.
सुरुवात घरापासून माझी बहिण पदमा ही माझी पहिली मैत्रीण. आम्हांला शेजारी हा प्रकार फार रुचला नाही म्हणून लहानपणी माझे बहिण- भाऊ हे माझे विश्व होते. माझ्या सगळ्या कामात मदत करायला बहिण असायची म्हणून आमचं बहिणी बहिणी नातं तर होतच  पण त्यात मैत्रिणी म्हणूनही आमचं छान जमायचं. शाळेतल्या गप्पा- गोष्टी करायचो. लहानपणीचे खेळ आम्ही एकत्र खेळायचो. वेगवेगळी खेळणी हवे यासाठी कधी भांडण केलं नाही. काही चूक केली तर आई-बाबाचा मार खाऊ नये म्हणून एकमेकींची बाजू व्यवस्थित सांभाळून घेत असू. शाळेत – कॉलेजात गेल्यावर आम्हांला तिथल्या मैत्रिणी मिळाल्या तरीही आमची मैत्री टिकून राहली. माझे काम तिचं कॉलेज, अभ्यास या सगळ्यामुळे आमच्या मैत्रीत थोडं अंतर आलं. पण तरीही घरी आल्यावर आमच्या गप्पा सुरु असायच्या. मला आठवते आमच्यात कधी कधी भांडण, रुसवे, फुगवे व्हायचे तेव्हा मी मात्र एक गाणं आठवत असे ‘फुलों का तारों का कहना है, लाख हजारो में मेरी बहना हैं.’सारी उमर हमे संग रहना हैं. आजही आमचे भांडण झाले की हेच वाटते. आम्ही अनेक आनंदाचे क्षण आणि दुःखाचे प्रसंग एकत्र अनुभवले आहेत. तेव्हा माझी पहिली मैत्रीण अशीच आयुष्यभर टिकून राहावी असे मला  वाटते.

आता शाळेतील मैत्रिणीनी विषयी काही गोष्टी. घोरपडीच्या शाळेत आमचा वर्ग सर्वात हुशार होता. आम्ही अ तुकडीचे विद्यार्थी होतो. म्हणून कधी वर्गात जास्त दंगा –मस्ती व्हायची नाही. पण तरीही आम्ही शिक्षक नसताना खूप दंगा करायचो . तेव्हाच एका बाकावर बसणाऱ्या गौरी आणि अमृता यांच्याशी छान  माझी मैत्री  झाली. आम्ही एकत्र खूप मस्ती करायचो. आमची मैत्री शाळा, कॉलेज असा प्रवास करत आजही सुरु आहे. आम्ही एकच क्लास लावला होता म्हणून जवळपास दिवसभर एकत्र असायचो.. क्लास मध्ये गप्पा, क्लास सुटल्यावर गप्पा आणि घरी जातानाही गप्पा अश्या न संपणाऱ्या गप्पा चालायच्या. एकदा आमचा हा प्रकार पाहून क्लासचे सर म्हणाले होते तुम्ही कशाला घरी जाता इथेच एक घर बांधून देतो मग बसा एकत्र गप्पा मारत. त्यावर आम्ही हसलो आणि सर जाण्याची वाट पहिली, पुन्हा आमचं सुरु अशी आमची मैत्री. आम्ही एकत्र अभ्यास करायचो तेव्हा प्रिया आणि गौरी मला आकाउंट शिकवत असत.  दिवसभर ग्रंथालयात बसून आम्ही अभ्यास करायचो आणि मग एकमेकींबरोबर जास्त वेळ मिळावा म्हणून ५ किलोमीटर वाडिया ते घर असे अंतर चालत जायचो. ते अंतर आता किलोमीटर मध्ये सांगताना फार मोठे वाटते पण तेव्हा गप्पा मारत असताना घर कधी यायचं कळतही नसे. मधल्या काळात सगळ्यांचे करियर यामुळे आमच्या मैत्रीत थोडा दुरावा आला पण जेव्हा अमृताच लग्न झालं तेव्हा मात्र आपली मैत्रीण आता दुसऱ्या कोणाची तरी झाली याची थोडीशी जाणीव झाली. पण आजही आमची मैत्री अशीच अखंडपणे व्हाटस ऑपच्या माध्यमातून सुरु आहे.

या काळात मला आणखीन एक मैत्रीण भेटली सोनाली माने. कॉलेज संपल्यावर खरतर आमची मैत्री छान खुलली. एका घटनेमुळे आमची मैत्री आणखीन पक्की झाली. तिच्या सारखी कष्टाळू आणि मेहनती मुलगी मी पहिली नाही. कॉलेजमध्ये असताना खूप कष्ट करायची आजही आपला संसार आणि मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिची धडपड सुरूच असते. तिने मला नेहमी सुख -दु:खात मला साथ दिली आणि कायम सोबत राहिली. तिच्यामुळे मला मन मोकळे करायला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. अडचणीच्या वेळी  मला न विसरता तिची आठवण येते. मग तीही धावत येऊन मला मदत करते. आयुष्याशी सुरु असलेला संघर्ष हाच आमच्या मैत्रीचा नाजूक धागा आता मजबूत झाला आहे आणि त्याने आमची  मैत्री घट्ट टिकवून ठेवली आहे.

 एमसीजे करताना पूजा आणि रश्मी, कीर्ती, माधवी, नायना, अनुया अश्या मैत्रिणी मिळाल्या. अनेक कार्यक्रम आणि अभ्यास करत असताना आमची मैत्री आकार घेत गेली.पण कॉलेज लाईफ संपताना सगळ्या आपआपल्या कामासाठी त्या दिशेने निघून गेले. त्यामुळे  आमच्या मैत्रीत अंतर पडत राहिले  पण तरीही आम्ही अनेक आनंदाचे क्षण एकत्र जगलो. मी आणि पूजा फक्त पुण्यात शिल्लक राहिलो, बाकी सगळ्या पुण्याच्या बाहेर गेल्या. तेव्हा माझी आणि पूजाची मैत्री फुलली. एकमेकींच्या सगळ्या सुख- दुखाच्या क्षणाचे आम्ही दोघी साक्षीदार आहोत. करियर असो वा घरगुती सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही एकत्र सोडवली आहेत. आणि आजही सोडवतो. समाजातील कोणत्या गोष्टीवर गप्पा करायच्या असो वा पुण्यात कुठे खरेदी करायची असो आमची जोडी दिसणारच. तुळशी बाग तर अगदी आवडीचे, काही खरेदी करण्यासाठी असो वा मनसोक्त फिरण्यासाठी महिन्यातून दोन –तीन वेळा तुळशी बागेत आमची चक्कर होत असे. आता ते कामामुळे शक्य नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण अजूनही अधून-मधून आम्ही भेटतो, शक्यतो ती  भेट तुळशी बागेत असते.

जागृती यात्रेत अजून अशीच एक जिवाभावाची आणि अत्यंत प्रेमळ मैत्रीण भेटली. ती म्हणजे अनिता कुलकर्णी. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही तिला कसब्यातील सगळ्यात प्रसिद्ध आणि मोठे व्यक्तिमत्त्व म्हणतो. पण ती खरचं ती मनाने मोठी आहे. सगळ्या ग्रुपची ताई आहे. अजून एक मोठी ताई आहे ती म्हणजे सुवर्णाताई. या सगळ्या मैत्रिणीमुळे जागृती यात्रेत आमचा चांगला ग्रुप तयार झाला आहे. त्यामुळे आम्ही गुंज सारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले. सगळ्याच्या अडीअडचणीला सहकार्य करायचे असे धोरण न करताही आमचा ठराव झाला आहे. अनिता अशी व्यक्ती तिने मला शस्त्रक्रियेच्या वेळी मला आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी अनेकांकडे माझी बाजू मांडली. त्यामुळे कित्येक लोकांनी अनिताच्या बोलण्यामुळे मला मदत केली. खरच सगळ्यांना मैत्रीण अशी मिळावी म्हणजे आपलं आयुष्य सुकर व्हायला वेळ लागत नाही.

त्याचबरोबर डॉ श्रद्धा हीसुद्धा अशीच सगळ्यांना सहकार्य करणारी माझी मैत्रीण. तिची माझी तशी मैत्री नवीन पण आमचं नातं छान जुळले आहे . ती पण लीला पूनावाला फाऊनडेशनची आहे , अशी ओळख झाल्यावर अजून एक आणखीन नात जोडल  गेले . काहीही वैद्यकीय अडचण असेल केव्हाही फोन करा किंवा मेसेज करा ती समाधानकारक उत्तर देणार आणि आपली समस्या सोडवणार. वेगवेगळ्या क्षेत्रातील मैत्रिणी असल्यामुळे असा फायदा होतो. याची जाणीव मला अत्यंत गरज होती तेव्हा झाली. श्रद्धा माझ्या अडचणीला धावून आली आणि त्याचा मोबदला म्हणून तिने फक्त धन्यवाद  घेतले . अशी मैत्रीण शोधून पण सापडणार नाही.
 या सगळ्याबरोबर आणखीन काहीजणी माझ्या मैत्रिणी आहेत. पण त्यांच्याशी मला मिळालेला वेळ यांच्यापेक्षा तुलनेने कमी होता. पण जो वेळ मिळाला त्यामुळे आयुष्यात कधी मैत्रीची कमतरता भासली नाही. त्यामध्ये रेखा ही मैत्रीण आहे पण मानलेल्या भावाची बायको असल्यामुळे तिच्याशी लाडकी वाहिनी म्हणून अस जास्त नातं आहे. ती नेहमी मोठ्या हक्काने माझ्या चांगल्यासाठी काही गोष्टी सांगत असते. तर स्वाती, रमापाली या शाळेपासून वाडिया कॉलेजपर्यंत वर्गमैत्रिणी होत्या. मी जेव्हा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम आयोजित करायचे तेव्हा या दोघी आणि इतर काहीजणी माझ्या हक्काच्या प्रेक्षक म्हणून उपस्थित असायच्या.यामुळे निदान माझा कार्यक्रम पडायचा नाही.
 मनीषा, इंदूप्रिया, तन्वी, अनघा ,मोहिनी, आश्लेषा, अंजली या सगळ्या मैत्रिणी आणि लीला पूनावाला फाऊनडेशन मधील विद्या, हर्षदा, स्नेहल, ज्योती, रुपाली तसेच माझ्या सोबत लंडनला आलेल्या सगळ्याजणी, काही निर्माणी मैत्रिणी अशी अजून खूप मोठी यादी आहे. या सगळ्यांकडून मी बरेच काही शिकवले आहे.
अश्या सगळ्या जिवाभावाच्या मैत्रीमुळे  आपले आयुष्य  सर्वगुण संपन्न होते...... हे मात्र खर आहे.!















Wednesday, 21 October 2015

समाजसेवेचे व्रत आमचे ...लढू आम्ही अखंडपणे....

पौर्णिमेचा चंद्र जसा एक एक दिवस खुलत राहतो. तसं माणसाचं आयुष्य आहे. रोज काहीतरी आपण शिकत असतो किंवा अनुभवत असतो. एखाद्या वेळी ठेच लागते. तर कधी एक पाऊल पुढे टाकत खड्डा चुकवत. या मार्गात आपल्याला काही हात देऊन सहकार्य करणारे भेटतात. तर काहींच्याकडून  आपण प्रेरणा घेऊन मार्गस्त होत राहतो. अश्या स्त्रिया माझ्या आयुष्यात अनेक आहेत. त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा मिळत राहिली. जेव्हा तुम्ही सर्वसामान्य घरातून बाहेरच जग पाहण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा यशस्वी लोकांच्या कष्टांची कथा माहिती असावी लागते . ज्यांनी समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला तसेच आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढा दिला तर दुसऱ्याला न्याय मिळावा म्हणून कार्य केले अश्या माणसांची माहिती मिळवावी लागते. तेव्हा कुठे तुम्हांला संघर्ष करायला बळ मिळते. अश्या काही लढाऊ स्त्रियांचा आज थोडक्यात आढावा .ज्या स्त्रियांना मी कधी भेटले नाही.पण त्यांच्या कार्यांनी मला प्रेरणा मिळाली.त्या सगळ्या आदर्श स्त्रिया तुमच्याही आदर्श आहेत. त्यांची कीर्ती जगजाहीर आहे. त्यांचे मोठेपण सर्वांना मान्य आहे.
प्रथम वंदन तूज गणराया असे म्हणत कोणत्याही कार्याची सुरुवात करतो. ज्या स्त्रीने शिक्षणाचा पहिल्यांदा श्री गणेशा केला अश्या स्त्रीचा उल्लेख सुरुवातीला करणार आहे. त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांनी देश स्वतंत्र होण्याआधी महिलांना स्वतंत्र होण्याचा शिक्षणाद्वारे मार्ग दिला होतो. पूर्वीच्या काळी मुलींच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असा कोणताच हक्क तिला नव्हता. तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय पुरुषप्रधान वर्ग करत असे.सावित्री बाईनी त्या काळात स्वत: शिक्षण घेतले. आणि मुलींची शाळा सुरु करण्यात मोठा हातभार लावला. मुलींना शिक्षण देण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या, लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले, शिव्या दिल्या तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. त्या काळातील लोकांनी सगळ्या प्रकारे त्रास देऊन पहिला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.
मला असे वाटते की आज आपण सगळ्या स्त्री शिक्षण घेत आहोत, त्यामागे सावित्रीबाईचे कष्ट आणि त्याग आहे. पण आपण त्यांना विसरलो आहोत असे वाटते किंवा त्यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळत नाही. नव्या पिढीच्या मुलींना तर त्यांचे नावही नीट माहित नाही. मला आठवते जेव्हा पुणे विद्यापीठाचे नामविस्तार करण्यात आले तेव्हा सावित्रीबाईचे नाव का ? असा माझ्या सुशिक्षित मैत्रीणीला प्रश्न पडला होता. का नको असे विचारले तर त्यांचे कार्य चांगले आहे पण पुणे विद्यापीठच चांगल होत. पुणे विद्यापीठ म्हणताना कसा पुणेकर असल्याचा माज वाटतो. असे एकीने सुनावले होते. पण त्यावेळी आणि आजही माझे उत्तर हे आहे की ज्या स्त्रीने मुलींच्या शिक्षणासाठी एवढा त्रास सहन केला तिला आपण काय दिल? उपकार म्हणून फक्त एका विद्यापीठाला नाव दिल तर फार मोठ कार्य नाही . पण निदान सुरुवात तरी झाली याच समाधान आहे.
सावित्रीबाईचा सगळा इतिहास जगजाहीर आहे पण पुन्हा आजच्या पिढीला समजून सांगावा लागेल, ज्यामुळे त्यांच्या कार्यांची जाणीव तरी आमच्या पिढीला आणि भविष्यातीलही पिढीला राहील. माझ्यासाठी सावित्रीबाईचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. त्यांच्याविषयी भावना एका ब्लॉगमध्ये तर कधीच मांडता येणार नाही. तरीही अगदी थोडासा आढावा घेतला कारण प्रेरणादायी स्त्रियांमध्ये सर्वांत महत्त्वाचे नाव आहे .

दुसरे नाव आहे साधना ताई आमटे याचं, त्यांना बाबा आमटे यांची पत्नी म्हणून सगळे ओळखतात पण सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य फार मोठे आहे.  त्यांचा समाज कल्याणासाठीचा त्याग याविषयी ऐकले आणि त्यांचे पुस्तक समिधा वाचायला घेतले. तेव्हा वाचताना त्यांच्या जीवनकथेचा अनुभव घेतला आला. त्यांचे कष्ट आणि कुष्टरोगी यांची केलेली सेवा व आनंदवनाचे बदलते स्वरूप आणि बरेच काही. पुन्हा एखादी  स्त्री असा त्याग करणार नाही असे वाटत असतानाच माझी ही धारणा त्यांच्याच सुनाकडून मोडली गेली. मंदा ताई आमटे यांनी आपल्या सासूबाईचा वारसा उत्तम पद्धतीने पुढे नेला. सासू सुनेची चढाओढ अनेक घरात पाहायला मिळते, मला वाटते या दोघीतही चढाओढ आहे पण समाज कल्याणासाठी, समाज सेवेसाठी आणि दुसऱ्यांच्यासाठी त्याग करण्याची. आज अश्या अनेक स्त्रियांची गरज आहे. आजही दानिन्यासाठी आणि मानपान याहून लग्न मोडतात तेव्हा या स्त्रियांचा आदर्श घ्यावा.

मेघा पाटकर अजून असेच एक नावं .त्या पंचतारांकित समाजसेवक नाहीत अगदी साधी साडी नेसलेल्या पण अत्यंत धाडसी समाजसेविका आहेत . नर्मदा बचाव आंदोलन याच्या बातम्या पाहून त्यांची चाहती झाले. आपण पण समाजसेवा क्षेत्रांत काम केले तर असेच चिकाटीने करायचे असे ठरवले होते. एक वेळ गुजरातला जाऊन त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं असे ठरवल होत. पण परवानगी नाही मिळाली, मग बसले गप्प. सामाजिक इंटरशिप करताना गुजरातला जायची संधी होती पण तीही कारणास्तव ती चुकली. पण मेघाताई यांच्या कार्यापासून नेहमी प्रेरणा मिळत राहिली. एवढे मोठे आंदोलन सुरु करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्या नेहमी गरीब आणि गरजू लोकांसोबत काम करतात. मग शहरातील झोपडपट्टीतील लोक असो वा लावासातील शेतकरी यांना न्याय देण्यासाठी तयार असतात. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे त्या सगळ्यांसाठी नेहमी प्रेरणादायी आहेत. म्हणूनच  माझ्याही.
या सगळ्या स्त्रियांना भेटण्याचा कधी योग आला नाही पण त्यांचे कार्य बरेच काही शिकवून गेले. अश्या अजून काही स्त्रिया आहेत त्यांचा उल्लेख पुन्हा कधीतरी ....
उद्या दसऱ्याचा सण आनंदाचा आणि उत्साहाचा .... म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आणि उत्साह देणाऱ्या सगळ्या मैत्रिणीच्या आठवणीना उजाळा द्यायचा विचार आहे ... मग भेटू उद्या...







Tuesday, 20 October 2015

मला भेटलेल्या रणरागिणी......



 आयुष्यात आपल्याला रोज अनेक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून  किंवा अनुभव देऊन जातात. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून तसेच परिस्थितीमधून बरेच काही शिकतो त्यामुळे आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. आज अश्या स्त्रियांचा उल्लेख मी करणार आहे की त्यांनी मला बरेच काही दिलं ते शब्दात सांगता किंवा व्यक्त करता येणार नाही . त्यांना भेटल्यावर दरवेळेस  मला काहीतरी शिकायला मिळालं आहे. ते त्या स्त्रीच्या स्वभावानुसार असेल किंवा तिच्या व्यक्तिमत्वानुसार असेल किंवा मिळालेल्या वेळेनुसार असेल पण मी कधी रिकाम्या हाती परतले असे . कधी असं झालं नाही खरच!
पहिल्यांदा ज्यांनी मला सामाजिक क्षेत्राशी निगडीत राहण्याची दिशा दाखवली. अश्या लता जाधव मॅडम यांच्याविषयी. कारण मी चौथीत तुम्ही कोण होणार असा निबंध लिहायला सांगितल्यावर मी समाजसेवक होणार असा लिहीला होता. पण तो कोणत्या आधारावर किंवा कुठून माहिती मिळाली होती आठवत नाही. त्यावेळी माझ्या वर्गशिक्षिका म्हणाल्या  होत्या हा निबंध लिहायला सोपा आहे पण तसं व्हायला फार अवघड आहे. का अवघड आहे हे खूळ बरेचं दिवस डोक्यात होते. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना लता जाधव मॅडमनी मला एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला पाठवले. मानवाधिकार यासंदर्भात कार्यक्रम होता, त्यावेळी असे समजले संस्थेने एका सामाजिक इंटरशिपचे आयोजन केले आहे. मी त्यासंदर्भात जाधव मॅडमला विचारले, त्यांनी लगेच अर्ज भर सांगितले. त्यामुळे तुला वेगळा अनुभव मिळेल. आणि नवीन जग पाहायला मिळेल. त्यानुसार अर्ज भरून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगलीला गेले, तिथे धान्य बँक या विषयावर काम करणाऱ्या संस्थेत एक महिना राहून खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . सगळ्यात महत्वाचे माझ्या नशिबाने निपाणीतील बिडी कामगाराचे जग पाहायला मिळाले, मी अकरावी असताना यावर एक धडा मराठीच्या पुस्तकात होता. जे विश्व प्रत्यक्षात पाहण्याचा वेगळाच अनुभव होता. हे सगळ जाधव मॅडममुळे शक्य झाले होते. पुढे अनेक वेळा त्यांनी काही सामाजिक कार्यक्रम असेल तर मला त्याची माहिती दिली त्यामुळे पुण्यातील सामाजिक संस्थांची मला माहिती मिळाली, तर काही संस्थासोबत काम करायची संधी मिळाली. लोकशाही उत्सव यामुळे सगळ्या प्रकारच्या संस्थाचे काम जवळून पाहता आले. यासाठी जाधव मॅडमनी मला प्रोत्साहन दिले. माझी मराठी भाषेची आणि लिखाणाची आवड त्यांच्यामुळे वाढीस लागली. कॉलेजमध्ये बुक लव्हर्स या कार्यक्रमात नवनवीन पुस्तकांवर चर्चा व्हायची , तेव्हा त्यात मी सहभागी व्हावं असा त्यांचा आग्रह असायचा. आमची फक्त अभ्यासू विषयावर नाही तर करियरच्या बाबतीत अनेक वेळा चर्चा व्हायची. त्यांचे नेहमी योग्य मार्गदर्शन मिळायचे. त्या स्वत: उत्तम लेखिका आहेत म्हणून  करीयरमधील अडचणी आणि संकट यावर नेहमी मार्गदर्शन करत. पत्रकारिता करियर निवडल्यावर यामध्ये स्थिर व्हायला लागणारा काळ यासंदर्भात अनेक वेळा त्यांनी मला मार्गदर्शन केले. आजही त्या माझी अगदी आपुलकीने चौकशी करतात, काम कसे सुरु आहे याची विचारपूस करतात. माझे नशीब चांगले आहे म्हणून अश्या शिक्षिका मिळाल्या. त्यांनी मला जीवन जगण्याची कला शिकवली...
दुसरी स्त्री म्हणजे जागृती यात्रेच्या संस्थापक सदस्य रेवती मॅडम, त्यांची माझी पहिल्यांदा भेट  जागृती यात्रे दरम्यान झाली. जागृती यात्रेच्या मुख्य सदस्य यापैकी एकजण मराठी आहे असे समजल्यावर खूप समाधान वाटले. तसेच आनंद ही झाला. यात्रेत त्यांची ओळख झाली. त्या लंडनला राहतात पण मराठी छान बोलतात हे फार वेगळं वाटत होत. हळूहळू यात्रेत त्यांची ओळख वाढली. गृहिणी किंवा सर्वसामान्य महिलांच्या रोजगाराविषयी त्यांचे विचार माझ्या विचारांशी जुळत असल्याने एकदा उडीसाला जात असताना खूप वेळ यावर चर्चा करत होतो. प्रत्येकवेळी यात्रेत गेल्यावर आपलं कोणीतरी आहे. याची जाणीव व्हायची. आता यात्रेचा व्याप खूप वाढला आहे, नाहीतर पूर्वी अनेक वेळा रेवती मॅडम यांना विविध गप्पा मारायला वेळ मिळत असे. एकदा लिखाणाची व वाचनाची आवड या विषयवार गप्पा सुरु असताना माझ्या आवडत्या लेखिका मीना प्रभू या रेवती मॅडमच्या सासूबाई आहेत हे समजले. मला त्यांची पुस्तके फार आवडतात पण माझ्याकडे  त्यांचे एखादे पुस्तक नाही असे सांगितल्यावर मी पाठवते तुला असं म्हणाल्या . खरचं काही महिन्यांनी माझ्यासाठी लंडनहून मीना प्रभुंच एक पुस्तक घरी आलं. असं काही घडल्यावर खूप छान वाटत. समोरची व्यक्ती वेळातवेळ काढून आपल्यासाठी काहीतरी करते त्यावेळेस खूप समाधान वाटते.
आम्ही लंडनला गेल्यावर रेवती मॅडमला फोन केला. त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा  त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून मला आणि माझी मैत्रीण रितासाठी वेळ काढला. आम्हांला भारतीय हॉटेलमध्ये घेऊन गेल्या. तिथे पंधरा दिवसानंतर भारतीय नाश्ता केला. तेव्हा खूप आनंद झाला. कारण पंधरा दिवस आम्ही भारतीय जेवणाला मुकलो होतो. त्यापेक्षा एवढी मोठी व्यक्ती आपल्यासाठी वेळ काढते याचं नवलही वाटत होत. त्यांचा तिथे निरोप घेताना जसं कोणीतरी आपल्या  माणसाला निरोप देत आहोत अशी भावना तयार  झाली. कारण दुसऱ्या देशात असताना आपल्या ओळखीचे किंवा आपल्या भाषेत बोलत असेल तरी आपुलकीची भावना तयार होते.  रेवती मॅडम तर ओळखीच्याच होत्या. नेहमी मदत करणाऱ्या रेवती मॅडमनी मला नेहमी खूप काही दिल आहे, मग ते  भावाच्या शस्त्रक्रियेच्यावेळेलाही. त्यांच्याकडून नेहमी खूप शिकायला मिळाते की तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपलेपणा आणि माणुसकी सोडायची नसते.
आणखीन एक शिक्षिका उषा  माळी मॅडम . त्यांचे व्यक्तिमत्त्व मला नेहमी प्रेरणादायी वाटते . या म्हणजे आदर्श शिक्षिका काय असते याचे उत्तम उदाहरण आहेत त्या . त्यांनी मला कधी शिकवले नाही, त्या आमच्या शाळेत आल्या तेव्हा मी कॉलेजला शिकायला गेले होते. पण त्यांची पर्यावरण आणि सामाजिक कार्य या विषयातील आवड यामुळे आमची ओळख झाली. त्या आमच्या एम्प्रेस गार्डन मित्र परिवारमधील सक्रीय सदस्य आहेत. त्या विद्यार्थ्यांची फक्त शिक्षक नव्हे तर आईसारखी काळजी घेतात. आजही गरीब विद्यार्थांना जमेल तसे सहकार्य करतात. विशेष करून गरीब मुलामुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. मानसिक असो आर्थिक किंवा घरगुती समस्या यामध्ये आपल्या परीने त्या नेहमी सहकार्य करतात. एकदा एका मुलीला पालक शाळा लांब आहे म्हणून शाळेत जाऊ देत नव्हते. तेव्हा त्यांनी आमच्या सगळ्यांकडे तिला सायकल देण्यासाठी चौकशी केली. तसेच मुले शैक्षणिक ज्ञानाबरोबर इतर सर्व विषयात पारंगत व्हावी म्हणून मुलांना विविध कार्यक्रमाला घेऊन जातात. जर रात्री उशीर झाला अनेक वेळा मुलांना बसस्टॉप वर आणि मुलींना तर घरी सुद्धा सोडतात. म्हणूनच मला यांच्याकडून आपण काम करताना १०० % प्रयत्न कसे करायचे हे शिकायला मिळाले.
अजून एक स्त्री आहे तिला सगळे आम्ही निर्माणी अम्मा म्हणतो, म्हणजे डॉ.राणी बंग.गडचिरोलीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आणि जेष्ठ समाजसेविका. २००६ मध्ये त्यांना भेटायची संधी मिळाली. युवक –युवतींच्या समस्या यावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मला निर्माण शिबिराची माहिती मिळाली. त्यांना मी या शिबिराला यायचं असे बोलले . त्यांनी लगेच  गडचिरोलीला ये असे सांगितले  शिबिराची अधिक माहिती घेण्यासाठी एका कार्यकर्तीची भेट घे म्हणाल्या. अश्या रीतीने पुण्यातील ग्रुपसोबत मी गडचिरोलीला पोहचले. आम्ही पोहचल्यावर सगळेजण धावत जाऊन अम्माला भेटले मी मात्र नवीन असल्यामुळे लांब उभे राहून पाहत होते. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. तिथे काही दिवस राहून त्यांच्या कार्याची माहिती मिळाली. तेव्हा कळाले की त्यांनी कसे उमेदीच्या काळात जंगलात राहून आदिवासी लोकांसाठी आरोग्याच्या सुविधा पुरविल्या,नक्षलवाद्यांना न  घाबरता आपले कार्य सुरु ठेवले. त्यांच्या कार्यांविषयी मी काय सांगणार सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्या  योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वांसाठी आदर्श व्यक्ती आहेत. म्हणून माझ्यासाठी  त्या आदर्श स्त्री आहेत.

शेवटी पण अगदी महत्वाची व्यक्ती म्हणजे रुपाली कलाटे मॅडम. त्यांची माझी  खूप कमी वेळा भेट झाली  पण त्यांचे व्यवहारिक ज्ञान आणि कष्ट करायची पद्धत यामुळे मी त्यांची चाहती झाले. त्या फार प्रसिद्ध व्यक्ती नाहीत पण त्याची  चलाख बुद्धी कित्येकांना भुरळ पडते. पहिल्यांदा नंदू सराची पत्नी म्हणून ओळख झाली पण त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे एक वेगळे स्थान मनात निर्माण झाले आहे. त्या तितक्याच प्रेमळ आहेत. पण त्यांचा चांगल्याला चांगल्या आणि वाईटाला वाईट असा बिनधास्त स्वभाव आपल्याला बरेसं काही शिकवून जातो.
या सगळ्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. मला जमेल तसं मी त्यांच्याकडून बरेचं काही शिकले आणि अजूनही शिकते व त्याचा आपल्या दररोजच्या जगण्यात उपयोग करते.अजून काय सांगणार !जर काही त्यांच्याकडून घेता आले नसेल तर असं म्हणेल मज पामराला माफी असावी ....




















Monday, 19 October 2015

थेंबे थेंबे तळे साचे, शिकवून गेल्या सावित्रीच्या लेकी




नवरात्री विशेष ब्लॉग लिहिताना काही स्त्रींची मनात यादी केली होती .त्यावेळी कल्पना नव्हती की ती यादी जेव्हा शब्दरूप घेऊ लागेल तेव्हा एवढी मोठी होईल, नवरात्रीचे चार दिवस राहिले आहे. आता मला कळेना की या सगळ्या स्त्रियांची महती नऊ दिवसात कशी मांडायची. कारण काही प्रत्यक्षात भेटलेल्या आणि अप्रत्यक्षरित्या भेटलेल्या व प्रेरणा देणाऱ्या अश्या अनेक स्त्रिया आहेत, जर त्या सगळ्यांचा उल्लेख केला नाही तर ही लेखमालिका अपूर्ण राहील. म्हणून या पुढे एका दिवशी एकापेक्षा जास्त स्त्रियांची महती लिहिणार आहे. सुरुवात ही बचत गटाच्या महिलापासून, कारण त्या सगळ्याजणी खूप अत्यंत बिकट परिस्थितीवर मात आयुष्याला नवीन वळण देत आहेत. कुठल्याही मोठ्या बिजनेस किंवा मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकल्या नाहीत . तरीही आपला छोटासा बिजनेस उत्तम प्रकारे चालवत आहेत.

एमसीजे(पत्रकारिता) करत असताना माझ्यासोबत शिकत असलेल्या एकाने वृत्तपत्रात पार्ट टाईम काम करणार असे विचारले होते, मग काय लगेच होणार दिला कारण पत्रकार म्हणून काम करायला मिळणार होते, तेच तर मला पाहिजे होते, कोर्स पूर्ण होण्याआधी काम करायला मिळते यासारखी आनंदाची गोष्ट नव्हती. दै.संध्या नावाच्या वृत्तपत्रात कामाला सुरुवात केली तेव्हा पत्रकार संघातील पत्रकार परिषद जायचे व  त्याची बातमी करायची असे काम माझ्या वाट्याला आले. त्यात चांगले वाईट अनुभव येत राहिले. पण मी ज्या उद्देशाने पत्रकारितेत आले ते काम म्हणजे समाज कल्याणाच्या बातम्या देण्याची इच्छा होती, पण तसे काही करता येत नव्हते. सामाजिक विषयातील माझी आवड पाहून दै.संध्याचे निवासी संपादक शिंदे सर यांनी मला पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बचत गटाच्या चळवळीवर लेख लिहायला सांगितला. मी कामाला लागले तेव्हा कोणाची ओळख नव्हती म्हणून पहिला लेख कसाबसा लिहून दिला . सरांना लिखाणापेक्षा माझी काम करायची तळमळ त्या लेखातून दिसली असेल त्यांनी मला दुसरा लेख महिला बचत गटाअंतर्गत व्यवसाय कसा करतात किंवा सक्सेस स्टोरी या विषयावर  करायला सांगितले. इथून माझी खरी  सुरुवात झाली. रोज एका बचत गटाच्या कामाचा आढावा घेणारा लेख लिहू लागले. जवळपास सहा महिने ही लेखमालिका जोरदारपणे सुरु होती. एवढं काय तर काही महिन्यात  पत्रकारितेतील काही लोक बचत गटाचे वृत्तपत्र म्हणून दै. संध्याला ओळखू लागले होते. दै.संध्या लहान वृत्तपत्र म्हणजे त्याचा खप खूप कमी होता म्हणून माझे लेख मर्यादित लोकांपर्यंत पोहचत होते. पत्रकारितेतील कोणी मला याबद्दल शाबासकी दिली नाही किंवा लेखमालिका चांगली सुरु आहे असे बोलले पण नाही . बचत गटातील अनेक अशिक्षित महिला लेख दुसऱ्याकडून वाचून घेत आणि कौतुक करीत तसेच अनेक वेळा आभार मानत असत. मला ही अश्या प्रकारचे काम करायचे होते म्हणून मी पत्रकारितेतील मुख्य प्रवाहाकडे दुर्लक्ष केले. भविष्यात आपल्याला तेच करायचे आहे म्हणून निश्चत होते. आज त्याच थोडं दुख होत कारण पांढरपेशातील वृत्तपत्रांना लोकांचे दुख विकण्याची सवय झाली ते पण आपल्या फायद्यासाठी, जर तोटा झाला तर तेही नको असते. मग तिथे एखाद्या फुटकळ नटीला कशी सर्दी झाली , कुठ्याल्या दवाखान्यात गेली याचा सविस्तर आढावा चालतो.
बचत गटातील महिलांकडून मला खूप शिकता आले. या सहा महिन्यात माझा एखादया बिजनेस स्कूलचा छोटासा कोर्स झाला असे समजा. या सहा महिन्यात रोज एका बचत गटाची सक्सेस स्टोरी लेखाच्या माध्यमातून मांडत असे. त्यासाठी बचत गटाचा महासमूह सावित्री या संस्थेत जात असे कारण तिथे अनेक महिला बचत गटा संदर्भातील योजना जाणून घेण्यासाठी येत असत. त्या महिला बचत गटाविषयी माहिती मिळवून दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या महिलाला भेट द्यायला जात असे. त्यांचे काम आणि प्रगती पाहून कधी कधी थक्क व्हायची.  कसं केले असेल याचं उत्तर शोधताना माझ्या लेखासाठी माहिती मिळवत असे. बचत गट मेळावापासून भीमथडी यात्रा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे बचत गट प्रदर्शन यांना भेटी देऊन एक एक स्टोरी मिळवत असे. यामुळे सगळ्या स्तरातील बचत गटाचे काम पाहता आले. बचत चळवळीतील अनेक चढ –उतार आणि हेवे-दावे आणि राजकारणी लोकांचा हस्तक्षेप आणि यशस्वी गटाला आम्ही कशी मदत केली म्हणून राजकीय लोकांचे श्रेय मिळवण्यासाठीचे भांडणही पाहायला आणि अनुभवायला मिळाले. या बचत गटाच्या कार्याला चळवळीचे स्वरूप पुणे महानगरपालिका मधील सहाय्यक आयुक्त उमराणीकर यांनी दिले होते . सर्वसामान्य महिलाही बचत गटातील समस्या घेऊन त्यांच्याकडे जात असे. त्यांनी गरीब वस्तीतील अनेक सुशिक्षित मुलींना या बचत गट समूहाची जबाबदारी दिली होती त्यामुळे त्यांना चांगला रोजगार मिळत होता तर वस्तीतील शिक्षित गृहिणीना आपल्या वस्तीतील बचत गटाच्या संदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करणाऱ्या म्हणजे बचत-गट व मनपा मधील या महिला दुवा असत. ही आजही पद्धत सुरु आहे. मला या लेख मालिकेसाठी सर्वसामान्य बचत गटातील महिला असेल किंवा आयुक्तापर्यंत सगळ्यांनी खूप मदत केली. प्रत्येकाकडून मला शिकायला मिळाले. एक दिवस या महिलांना नेहमी मदत करणारे आयुक्त यांना अचानक देवआज्ञा झाली तेव्हा सगळ्यांना आपला आधार गेला असे वाटत होते. कारण आयुक्तांची दुसऱ्या विभागात बदली होत असताना बचत गटाचे अधिकारी तेच राहावे म्हणून मोर्चा पण केला होता. तेव्हा या महिलांचे रुद्ररूप ही पाहायला मिळाले होते.
सहा महिन्यात दीडशे लेख लिहिले असतील, त्या प्रत्येक गटाची वेगळी कहाणी आहे. प्रत्येक गटाकडून काही तरीही शिकायला मिळाले, सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे त्या महिलांची जगण्याची जिद्द आणि संकटाना झुंज देण्याची पद्धत. अनेकजणी झोपडपट्टी राहत असून उत्तम बिजनेस वूमन म्हणून काम करत आहेत . हे त्यांच्या कामाने सिध्द केले होते. तर काही त्या दिशेने प्रवास सुरु होता. संसार, मुलांचे संगोपन, सासू- सासरेचे काम तर काही दारुडा नवऱ्याचा मार खात संसाराचा गाडा खंबीरपणे ओढत होत्या. सुरुवातीला त्या पण सर्वसामान्य स्त्रीसारख्या लाजऱ्या, घाबरत घराबाहेर पडल्या. नंतर बचत गटाच्या कामामुळे त्यांच्या आर्थिक, वैचारिक, सामाजिक परीस्थितीत बदल घडत गेले . राजकीय व्यक्तींना तोड देतील असे भाषण करू लागल्या. यासाठी त्या सगळ्या महिलांनी खूप परिश्रम घेतले होते. त्यांची कहाणी शब्दात मांडताना मला फार छान वाटायचे एक वेगळा आनंद मिळायचा. तो लेख पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद खुलायचा तो मला मिळणाऱ्या पैश्यापेक्षा हजार पट्टीने मोठा होता. पण वृत्तपत्र मालकांला या लेखमालिकेत व्यवसाय दिसला नाही. म्हणून मालिका बंद करा असा आदेश आला. माझे लेखमालिकेचे काम थांबून मला इतर काम दिले. मी पुन्हा नव्याने सुरुवात म्हणून कामाला लागले. पण आजही मला त्या महिलांची जिद्द आणि चिकाटी आठवते. त्यात खास उल्लेख करावा लागेल अश्या अनेक आहेत, पण काहींचा धावता आढावा लिहावा लागेल नाहीतर आजचा लेख खूप मोठा होईल.
ज्यांनी कधी बचत गटाच्या मेळाव्याला भेट दिली असेल त्यांना जळगावचे मांडे बनवणाऱ्या महिलांचा बचत गट तर आठवत असेल त्या दोघी जावा इतर महिलांच्या मदतीने पुरणाचे मांडे बनवत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी असे. अगदी पाचशे रुपये भांडवलावर काम सुरु केले होते. आज लाखों रुपयांची उलाढाल करतात. त्या मी लेख लिहिण्याआधीच पुण्यात प्रसिद्ध होत्या पण मी भेटायला गेले तेव्हा मात्र अगदी सामान्य महिलांसारखे वागत होत्या. मला स्वत: चहापाणी करणे यातून त्यांचा मोठेपणा अनुभवता आला. येरवड्या जेल मधील कैदी महिलांचा बचत गट याची स्टोरी करताना अनेक अडचणीला तोंड देऊन परवानगी मिळाली ती एका बचत गट कार्यकर्तीमुळे तेव्हा कैदी म्हणून त्यांचे प्रश्न आणि जेलमुळे बचत गटावरील मर्यादा अश्या गोष्टी जाणून घेता आल्या. तसेच बुधवार पेठेतील महिला यांचा एक गट आणि तृतीयपंथी यांच्या गटाची स्टोरी तर पहिल्यांदा मी ब्रेक केली होती. दगडू शेठ गणपतीजवळ त्यांच्यासाठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे तिच्या मदतीने आणि आशा या बचत गट सामुहिका हिने मला त्यांची ओळख करून दिली.तेव्हा त्यांचे विश्व आणि त्यांच्या समस्या याचीच चर्चा जास्त झाली. बचत गटाच्या माहितीचा अभाव तरीही सामाजिक संस्थेच्या मदतीने तीन वर्ष बचत गट सुरु होता. तृतीयपंथी म्हटलं तरी भीतीचे वातावरण निर्माण होते पण त्या गटाचा अध्यक्ष अगदी सर्वसामान्य व्यक्तीसारखा होता. बचत गटाच्या सुविधेची माहिती फार नव्हती , पण आमच्यासाठी सरकार काही करत नाही असा सुरु ऐकायला मिळाला. बाकीच्या सारखे बचत गटाच्या माध्यमातून काही व्यवसाय करता येत नाही याची खंत तो करत होता.
असे अनेक अनुभव आहेत, अनेक बचत गट आहेत त्यांना या लेखात न्याय देता आला नाही. पण मला या बचत गटामुळे मला करीयरच्या सुरुवातीला खूप शिकायला मिळाले. माझ्या कामाची दिशा यामुळे स्पष्ट झाली होती. तसेच बचत गटाच्या अभ्यासाचा उपयोग करून कॉलेजचा प्रबंध तयार केला होता. बचत गटामुळे महिलांचे संवाद कौशल्य कसे वाढले व त्याचा समाजावर सकारात्मक झालेला परिणाम या विषयावर शोधनिबंध सादर केला. आणि बचत गट या विषयावरील लिखाणाला स्वल्पविराम मिळाला. भविष्यात पुन्हा या विषयात काही तरी करता येईल याची खात्री आहे.

Sunday, 18 October 2015

आजी तुला शतशःनमन



नातवंड म्हणजे आजी -आजोबांच्यासाठी दुधावरील साय असते. घरात आई-बाबापेक्षा कोणी जर जास्त लाड करत असेल तर ते म्हणजे आपले आजी- आजोबा. आजकाल एकत्र कुटुंब पद्धत जरा कमी होत आहे , त्यामुळे मुलांना आजी -आजोबांचे प्रेम, लाड  आणि शिकवण मिळत नाही . त्यामुळे शहरातील मुले एकटी पडतात त्यामुळे नवीन समस्या वाढू लागल्या आहेत. पण आमचे नशीब चांगले की होते म्हणून मला दोन्ही कडील आजी-आजोबा यांच्यासोबत राहता आले. त्यांच्याकडून आमचे लाड पुरवून घेतले.
आज मी इथे उल्लेख करणार आहे, तो माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीचे, म्हणजे माझ्या आईची आई. आम्ही तिला बाई म्हणायचो गावात सगळे तिला मथुराबाई म्हणत. तिचं नाव मथुरा होत पण तिच्या जावा-भावाजायांमध्ये  ती सगळ्यात मोठी सून होती म्हणून सगळे दीर, नंदा आणि जावा पण आदराने बाई म्हणत असे. ती सगळ्यात मोठी सून असल्याने माझी आई हिची पाहिलं अपत्य म्हणून ती सगळ्या बहिण -भावात मोठी आणि माझ्या आईचं मी पाहिलं मुल म्हणून मला सगळ्या नातवंडामध्ये मोठं असल्याचा मान मिळला. माझे लाड मला कळायच्या आधीपासून सुरु होते , याची माहिती आईकडून कळाली. पूर्वी मुली झाल्यावर फार आनंद होत नसे कारण सगळ्यांना वंशाचा दिवा हवा असतो, तसे पाहता आजही काही अपवाद सोडून आनंद होतो असं नाही , कारण एकविसाव्या शतकातही मुलींची  जन्म घेण्याआधीच हत्या होत आहे. पण मी नशीबवान आहे माझ्या वाट्याला असे नाही आले नाही. मुलगी असून माझे खूप लाड झाले. आजच्या मुलांसारखे लाड नाही जी वस्तू मागितली ती पालक आणून देतात मग ती कितीही महाग का असे ना. असे माझ्या तरी बालपणी नव्हत, फक्त प्रेम आणि त्याची किंमत पैश्यात कधीच करता येणार नाही असे लाड आमचे झाले.
मी दोन-तीन वर्षाची  असतानाच आई –बाबा पुण्यात कामासाठी आले. पुण्यात तुटपुंज्या पगारात संसार कसा चालवायचा तसेच आई-बाबा कामाला गेल्यावर माझी काळजी कोण करणार म्हणून मला गावाकडे बाबांच्या घरीच ठेवले होते. इकडे सगळ्या चुलत्या आणि आजी होती पण त्यांचे काम आणि सुगीची शेतातील कामे यामुळे माझ्या लाडक्या आजीने मला तिच्या घरी नेले. तिथे दोन मामा मावश्या यामुळे माझ्यावर लक्ष ठेवायला होते. तरीही माझी आजी माझा फार लाड करायची. नेहमी तिच्यासोबत ठेवत असे. मी अचानक आजारी पडल्यावर मरणाच्या दारातून मला परत आणले. तेव्हा मोठे दवाखाने नव्हते पण तिने माझी खूप  काळजी  घेतली. पुढच्या वर्षी मी आईसोबत पुण्याला आले.तेव्हा मी आजीची सारखी आठवण काढत रडायचे. असे आई सांगते.

दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागण्याची  वाट पाहत असून कारण मामाच्या गावाला जायला आम्हांला फार आवडायचे. आजी दरवर्षी शेतातील बोर गोळा करून ठेवायची, सुकलेली बोर खाण्याची मज्जा काही वेगळी आहे. आम्ही गेल्यावर त्याच बोरकूट बनवायची. आमच्यासाठी हुरडा , धिरडे , थालपीठ आणि असे कितीतरी पदार्थ बनवत असे . मला तर आता काही पदार्थांची नाव आठवत नाही असे सगळे आमच्यासाठी बनवायची. तिच्या हाताला फार चव होती म्हणून तिच्या हातच्या  फोडणीचे वरण  अजून आमच्यापैकी कोणलाही येत नाही. बाबा आजही म्हणतात फोडणीचे वरण करावे तर सासुबाईनी . आम्ही सगळ्याजणी स्वयंपाक करायला लागलो पण तिच्यासारखे चविष्ट आम्हांला बनवता येत नाही. तिच्या हातचे लोणचे तर त्याची चव अजून जिभेवर आहे,नाव काढले तरी पाणी येत तोंडाला असे बनवत आहे. म्हणून तर आमच्या मामाच्या गावामध्ये कित्येक लोक तिच्या हातून लोणचे बनवून घेत असे. सगळ समान त्याचं पण फक्त ते एकत्र करण्यासाठी आजीला बोलवत असे. तिच्या हाताने बनवलेला लोणच काही खराब होत आहे, अशी श्रद्धाच होती लोकांची तसेच ताक करायला पण तिलाच मागणी होती , म्हणून आजीच्या घरी कधी दही, ताकाची कमी नसायची, घरी गाय किंवा म्हशी नव्हत्या पण आजी ताक बनवायला गेल्यामुळे लोक मोठ भांडे भरून दही-ताक देत असे.दिवाळी किंवा उन्हाळ्यात सगळ्या मावश्यांची मुले पण मामाच्या गावाला येत असे. तेव्हा धमाल सुरु असायची आमची, लहान असल्यामुळे सकाळी आजीच्या हाताच्या चुलीवरील गरमागरम भाकरी आणि पिठलं त्यासोबत मिरची चटणी हा मेनूच अत्यानंद देत असे. मग तो माळवदावर (टेरेस) बसून खात निसर्गाच्या सानिध्यात त्याची चव घेत असो. सोबतीला झाडावरील पक्षी आणि वानर पण असत . लांबवर हिरवीगार शेत दिसतं. नंतर आजीसोबत शेतात जाऊन नुसता धिंगाणा घालायचो कारण आई तिकडे नसायची, शेतातील आंबे , कैरी , बोर , सीताफळ असे अजून काही याची मौज लुटायचो.कधी कधी वाटत पुन्हा ते दिवस यावे.
दिवाळीच्या सणाला आम्हाला एक एक रुपयाची सुगंधी साबण मिळायची , तेव्हा ती फार मोठी गोष्ट असायची कारण सगळ्यांना आपली आपली साबण म्हणून आनंदी असायचो आम्ही.  दिवाळीतील आजीने बनवलेले पदार्थ यांना जी  चव असायची ती आजच्या मोठ्या मिठाई दुकानातल्या पदार्थांनाही नसते. तुम्हांला खोट वाटेल पण हेच सत्य आहे.  
सगळी नातवंड आली तरी आजीचं माझ्यावर जास्त प्रेम असायचं का ते माहित नाही, पण वेळोवेळी ते जाणवायचं, माझ्या आवडीचे पदार्थ जास्त बनवले जात असे, आजीने बनवलेली भजी आणि त्याची काळ्या वाटणाची भाजी मस्त मज्जा असायची. कोणी रागवले तरी ती माझी बाजू घ्यायची. अनेक वेळा असं व्हायचं. पुण्यात आमच्या घरी आल्यावर आई कधी रागवली तरी ती माझी बाजू घ्यायची. किती अभ्यास करावा लागतो म्हणून चिंता करायची. तर कधी किती लांब शाळेत जावं लागत याची काळजी करायची. माझे केस मोठे व्हावे म्हणून किती देवाला नवस बोलली असेल माहित नाही . पुण्याला  आली किंवा आम्ही गावाला गेलो की मला नेहमी एका देवाचा अंगारा लावत असे.
अश्या अनेक आठवणी आहेत, पण त्यांना सगळ्यांना मांडता येईल असे नाही . त्या सगळ्याना शब्दरूप देता येईल अस पण नाही. कधी कधी असे वाटते की आपले लाड करणारे कोणी तेव्हा मात्र आजीच्या आठवणीने डोळे भरून येतात  आणि तू परत ये असं म्हणावं वाटत. येणे शक्य नाही तरीही.
१० -१२ वर्ष झाले असतील आजी जाऊन पण तिच्या आठवणी माझ्या मनातून कधीच गेल्या नाहीत.एके दिवशी अचानक आजी गेल्याचा फोन आला तेव्हा आई- बाबा गावाला गेले, कॉलेज असल्यामुळे जाता आले तसेच आई- बाबा गावाला जाणार म्हणून माझ्यावर घराची जबाबदारी होती . त्या वेळी विश्वास बसत नव्हता की आपल्यावर जीवापाड प्रेम एकुलती एक आजी या जगात नाही .अंत्यविधी समोर पहिली नाही म्हणून ती याच जगात आहे असे वाटायचे, पण जेव्हा आई गावाकडून आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागली तेव्हा मात्र माझा बांध फुटला मीही खूप रडले पण पुढ्या क्षणाला सावध होऊन आईला रडू नको म्हणून बोलले. कारण आईची अवस्था रडून फार वाईट झाली होती. माझे अश्रू माझ्याचं डोळ्यात राहिले. पुढे अनेक दिवस हे असे चालले मी मात्र माझे दुख दाखवू शकले नाही आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती साठी रडू पण शकले नाही. आज मात्र तिच्या आठवणींनी पुन्हा डोळ्यात पाणी आले. म्हणून आज म्हणावं वाटत तू परत येशील का ? तुझ्या सारख प्रेम आणि लाड करणारी कोणी नाही ग ........

.






















Saturday, 17 October 2015

नको तिला आभाराचेही दोन बोल



गुंज नावाची सामाजिक संस्था ऑकटोबर महिन्यातील पहिला आठवडा जॉय ऑफ गिविंग म्हणजे दान उत्सव म्हणून साजरा करते. ज्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या वस्तू लोकांना दान करू शकता. अनेक लोक यामध्ये सहभागी होऊन दान करतात. अशीच दानशूर स्त्री माझ्या आयुष्यात अगदी काही महिन्यापूर्वी आली. जर कोणी पुरुष असेल त्याला दानशूर कर्ण म्हणतात. पण जर कोणी स्त्री असेल तिला काय म्हणावं ?माझ्यापुरतं बोलायचं झालं तर तिला शर्मा अॅटी म्हणावं, कारण मी तरी माझ्या आयुष्यात एवढी दानशूर व्यक्ती प्रत्यक्षात पाहिलेली नाही. मोठ्या देवस्थानाला मोठ्या स्वरुपात दान केले जाते यासंदर्भात फक्त ऐकले आहे. तसेच याविषयी काही बातम्या पहिल्या आहेत . पण तेही देवाने त्यांचा नवस किंवा इच्छा पूर्ण केल्यावर ते दान दिले जाते . पण कोणतीही अपेक्षा न ठेवता तसेच आपण कोणी मोठे श्रीमंत आहोत म्हणून नाहीतर फक्त गरजू व्यक्ती आहे म्हणून शर्मा अॅटीनी मदत केलेली मी अनुभवली आहे. म्हणून नवरात्री विशेष ब्लॉग या मालिकेत त्यांचा खास उल्लेख करावा लागेल. 

एका महिन्यापूर्वी भावाला नियमित तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. शर्मा अॅटी त्यांच्या तपासणीसाठी येणार आहेत. याची कल्पना त्यांची मुलगी राधिका हिने दिली होती,म्हणून दवाखान्यात पोहचल्यावर त्यांना फोन केला. त्या आम्हांला भेटायला आल्या, साधारण विचारपूस झाल्यावर कळाले की डॉक्टरला  भेटण्यासाठी जो नंबर लावायचा असतो, त्यांचा साहवा नंबर मिळाला आहे . आणि आम्ही उशिरा पोहचल्यामुळे आम्हांला विसावा मिळाला आहे. तुमचा नंबर येईपर्यंत तर तुम्हांला फार उशीर होईल घरी जायला असं त्या म्हणाल्या आणि त्यांनी लगेच आपल्या स्वभावानुसार स्वत:चा नंबर आम्हांला दिला आणि आमचा नंबर त्यांनी घेतला. कारण त्यांना माहिती होत. टान्सप्लांटच्या पेशंटनी दवाखान्यात जास्त वेळ थांबू नये. संसर्गाची भीती असते. त्यांचा नंबर दिल्यामुळे आम्हांला डॉक्टरांना लवकर भेटता आले आणि घरी निघालो तेव्हा त्या मोठ्या रांगेत स्वत:चा नंबर येण्याची वाट पाहत होत्या. साधारण दोन तास त्यांना थांबावे लागणार होते. आम्ही पुन्हा त्यांना भेटलो,  धन्यवाद दिले. पण त्या धन्यवाद बोलू नको असं बोलल्या. माझ्या मुलांसारखे आहात असं धन्यवाद बोलायचं नसतं. आणि आता पटकन घरी जा. दवाखान्यात थांबू नका असे सांगितले. तरीही आम्ही धन्यवाद बोलून त्यांचा निरोप घेतला, दोन तास आधी नंबर लावून तो नंबर आपल्याला दिला खरचं किती मोठं मन आहे याचा विचार करत आम्ही घरी पोहचलो . घरी आल्यावर आई- बाबांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा याआधीही त्यांनी आम्हांला कशी मदत केली याची आठवण झाली. खरतर आम्ही विसरलो नाही आणि कधीच विसरणार नाही. असे उपकार त्यांनी आमच्यावर केले आहेत. वरील मदतीविषयीचा किस्सा हा तर ट्रेलर आहे अब तो पुरी फिल्म बाकी है. असं म्हणावं लागेल .

साधारण शस्त्रक्रियेच्या पंधरा दिवस आधी आमची ओळख झाली असेल . तशी माझा भाऊ गोविंद त्यांना एक-दीड महिना आधी ओळख होता. ही ओळख होण्यामागे कारण असे घडले  की गोविंद एके  दिवशी एकटाच दवाखान्यात गेला होता. मला अचानक काम होत म्हणून जाऊ शकले नव्हते. हा एकटा पाहून त्या दोघी मायलेकीने चौकशी केली तर राधिका आणि गोविंदला एकच आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते . आता शस्त्रक्रिया हाच उपाय दोघांनाही डॉक्टरांनी दिला आहे ,असे समजले. त्यादिवशी डॉक्टरांनी गोविंदला शस्त्रक्रियेची ठरलेली तारीख थोडी पुढे घ्यायची का विचारले कारण एक अचानक पेशंट आले आहे, तिची शस्त्रक्रिया लवकर होणे गरजेची आहे. गोविंदने होकार दिला कारण आमची पैश्यांची जमवाजमव सुरु होती. एका आठवड्याने काय फरक पडतो म्हणून आम्ही निश्चित होऊन पुढील कामाला लागलो. नंतर काही दिवसांनी कळले की ती पेशंट राधिका आहे. राधिकाच्या घरच्यांना आतापर्यंत समजले होते की ज्याच्यामुळे आपल्याला वेळेपेक्षा आधीची तारीख मिळाली तो गोविंद आहे. राधिकाच्या शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी आमची भेट झाली. आणि चांगली ओळखही झाली.

आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो, त्यामुळे तिची भेट घेण्याची इच्छा असून आम्हांला भेट काय साधी दवाखान्यात असून चौकशी पण करता आली नाही. जेव्हा आई आणि भाऊ दवाखान्यात आॅडमिट झाले, त्यादिवशी मला राधिकाची आई अचानक भेटली. राधिकाची चौकशी तर तिची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे कळले, आम्ही पण आज अॅडमिशन घेतले असे बोलले आणि काहीतरी कामासाठी जायचे म्हणून निरोप घेतला.

रात्री नऊ वाजता राधिकाची आई आणि तिचा भाऊ गोविंदचा खाट नंबर शोधत आले. काही काळजी करू नका,आम्ही या प्रक्रियेतून गेलो आहोत, तुम्हांला कसली मदत लागली तर सांगा असे अगदी आपुलकीने सांगत होते . त्यांच्या बोलल्याने आम्हांला थोडा धीर आला. राधिकाचा भाऊ तर अगदी मोठ्या भावाप्रमाणे गोविंदला सगळ्या गोष्टी समजून सांगत होता. मीही समजवू  शकले नसते तेवढं तो गोविंदला समजवून सांगत होता , तर राधिकाची आई माझ्या आईला याच गोष्टी समजून सांगत होती. आम्हांला याच नवल वाटत होत त्याचंही पेशंट आहे पण ते दुसऱ्यांना कसा धीर देत आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर मनाचं बरसं ओझे कमी झाले होते. या सगळ्या कठीण काळात त्यांनी आम्हांला वारंवार भेट देऊन मानसिक आधार दिला. 

शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा आई आणि भाऊ दोघांना भेट घेऊन सगळं छान झालं आहे, याची खात्री दिली.  पुढील काही दिवस मी दवाखान्यात असल्यामुळे त्यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली , पेशंटची कशी काळजी घ्यायची , त्यांना खायला काय द्यायचं आणि अश्या अनेक गोष्टी मला समजावून सांगत होत्या. मी डॉक्टरांना प्रश्न विचारले नसतील, तेवढे त्यांना विचारत असे, त्या अगदी प्रेमळ भाषेत मला समजून सांगायच्या. आमची पैश्यांची जुळवाजुळव झाली होती पण तरी काही सरकारी फंड मंजूर झाला असताना पण चेक आला नव्हता म्हणून मी मुंबईला चेक आणायला गेले त्यादिवशी दिवसभर त्यांनी माझी वाट पहिली . रात्री दवाखान्यात मुक्कामाला आल्यावर मला भेटल्या.  तेव्हा त्यांना मी आमची सगळी रामकहाणी सांगितली.

दुसऱ्यादिवशी राधिकाला दवाखान्यातून सुट्टी मिळणार असे कळले, मी त्या सगळ्यांना भेटायला त्यांच्या रुममध्ये गेले, खूप छान वाटत होते की राधिकाला  पुन्हा आयुष्य मिळाले होते व नवीन सुरुवात झाली. आपण नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहू असे बोलून मी त्यांचा निरोप घेतला. पण थोड्या वेळानी मला राधिकाच्या आईचा फोन आला, मला वाटले निरोप घेण्यासाठी फोन केला असेल . पण त्यांनी मला दवाखान्याच्या गेटवर बोलवले होते , का ते कळले नाही, मी धावत गेले , तर शर्मा अॅटीनी माझ्या हातात एक पाकीट दिलं आणि आता उघडू नको, यावर काहीही प्रतिक्रिया न देता सरळ दवाखान्यात जा बोलल्या. या पुढे कधी याविषयी बोलायचं नाही असंही म्हणाल्या. आणि गेटच्या बाहेर चालू लागल्या. आतापर्यंत माझ्या लक्षात आले होते पाकिटात पैसे आहेत, मी धन्यवाद बोलणार पण त्यांनी मला गप्प बस बोलल्या, मी तिथेच एक मिनिट स्तब्ध उभी राहिले , त्यांची पाठमोरी आकृती  हळूहळू दिसेनासी झाली की, मी आत जाऊन पाकीट उघडताच माझ्या डोळ्यात पाणी आले. आईने विचारल्यावर तिला हा प्रकार सांगितला तर आईचे डोळे टचकन पाणावले, देव अश्या रुपात येऊन जातो असं म्हणाली . त्यांनी खूप मोठी रक्कम असलेलं पाकीट दिलं होत पण आमच्या सगळ्यावर मोठं उपकारच ओझं दिलं होत, ज्याविषयी मी आभार भी मानू शकले नाही किंवा धन्यवाद बोलू शकले नाही. बाबांना हा प्रकार सांगितल्यावर पाकीट का घेतलं म्हणून रागावले , पाकीट परत करायची मला संधी काय,मला धन्यवाद पण  बोलू दिले असे सांगितल्यावर तेव्हा बाबा पण भावूक झाले होते, स्वत: त्याच संकटातून जात असताना लोकांना सहकार्य कसे करू शकतात असा प्रश्न पडला होता .

त्यादिवशीपासून मला खंत होती त्यांचे आभार कसे मानू हा प्रश्न सतत मला पडलेला असायचा. या ब्लॉगमुळे निदान मन तरी मोकळे करता आले, याचे समाधान वाटते. पण हा ब्लॉग त्यांच्यापर्यंत गेला तरीही माझ्यावर नाराज होतील, काय गरज होती या सगळ्याची असं बोलतील.

पण तुम्हीच सांगा कसे आभार मानणार अश्या दानशूर स्त्रीचे ?




















  

Friday, 16 October 2015

माय जगो आणि मावशी पण जगो



नवरात्री विशेष ब्लॉग लिहायचा विचार केला तेव्हा माझ्या आजूबाजूच्या अनेक स्त्रियांच्या योगदानाचा आढावा मनात सुरु झाला. तेव्हा घरातील स्त्रियांविषयी विचार करताना पाहिलं नावं आई आणि दुसरं नावं मावशी आलं. कारण आई सोडून जर कोणी आपुलकीच्या नात्याने प्रेम करणारी स्त्री असेल तर ती म्हणजे मावशी. म्हणून आजचा ब्लॉग सगळ्या मावशीना समर्पित ... आई आपल्यावर मुलांवर प्रेम करते, रागवते, वेळ पडली तर मारते. पण मावशी मात्र आपल्यावर फक्त प्रेम करते. ती आईसारखं हक्काने मारत किंवा रागवत नाही. जर मावशी आईपेक्षा लहान असेल तर मग आपण तिचे लाडके असतो, बऱ्याच अंशी असे दृश्य आपल्या घरात असते. माझ्या घरात असेच काहीसं वातावरण आहे. मला तीन मावशी आहेत. लहानपणापासून आम्ही पुण्याला राहायचो म्हणून आम्ही फार लाडके भाचे मंडळी आहोत. पुण्याहून उन्हाळ्याच्या सुट्टी गावी गेलो की सगळ्याजणी तिघं भावंडांचा खूप लाड करायच्या. शेतातील ऊस, बोरं, सीताफळ, पपई, कलिंगड असे अनेक पदार्थ आमच्या समोर हजर असत. गावाकडील काही विशेष पदार्थ आणि गुळाचे लाडू तर आम्ही पोहचण्याआधी तयार असतं. मग काय नुसती धमाल असायची. कुसुम मावशीच्या घरी म्हशीच्या कावडीतून पाणी येत असे. त्याच फार आश्चर्य वाटायचे, म्हशीचे पोट फाडल्यावर पाणी कसे येते. हे पाहण्यासाठी एकदा आम्ही नदीवर गेलो तेव्हा तिच्या पोटात पाणी भरण्याची प्रक्रिया सुरु होती. ही काय भानगड आहे हे मावशीने समजून सांगितले पण त्या गोष्टी समजून घेण्याच वय नव्हत. त्यामुळे माझी भावंड घरी आल्यावर म्हशीच्या पोटातून पाणी कसं येत बोलले की आवाज करून दाखवायचे, त्यामुळे अनेक वर्ष हा आमचा मनोरंजनाचा विषय होता. अश्या प्रकाराने आमची गावाकडची ट्रीप या सगळ्या मावशीमुळे फार धमाल फुल असायची.
काही वर्षांनी कामानिमित्त दोन मावशी आपल्या कुटुंबासह पुण्याला आल्या. यामुळे आमचं गावाला जाणे जरा कमी झाले अजून एक मावशी गावाला असल्यामुळे गावाला जातो पण फक्त काही मोठं कार्य असेल तरच.
पुण्याला आलेल्या मावशीमध्ये नीला मावशी हिचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि खूप सहकार्य करणारा असा आहे. मग तो कोणी का असे ना ,रस्त्यावर भिकारी असेल त्याला जास्त नाही पण एक तरी रुपया देणारच. कामाच्या बाबतीत अत्यंत उत्साही, कंटाळा कसा येत नाही असा प्रश्न पडतो मला. तिच्या या गुणाचा उपयोग आमच्या अत्यंत कठीण काळात खूप झाला. मागील ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे भावाला आईने किडनी दिली.त्यामुळे दोघांना तीन महिने पूर्ण आराम करायला सांगितले होते. घरात दोन पेशंट असल्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि घरातील काम करणे याचा माझ्यावर खूप भार पडत असे. पण तो काही जड झाला नाही. कारण माझे बाबा आणि मावशी मला नेहमी कामात सहकार्य करत. मावशी तर कोथरूडला राहते. तरी ती रोज स्वता:च्या घरचे काम उरकून ,कामाला जाऊन दुपारी आमच्या घरी येत असे. अनेक वेळा बस स्टाँप ते आमचे घर तीन किलोमीटरचे अंतर पायी आली. तिच्याफोन नाही म्हणून ती बसमधून येत आहे. असा मेसेज जर काकांनी दिला तर आम्ही आणायला जायचो . पण जर काका विसरले किंवा मावशी कामावरून घरी न जाता आली तर तिच्याची संपर्काच साधन नसायचे. भर उन्हात ती चालत आली तरी आल्यावर लगेच कामाला लागत असे. घरातील सगळी कामे ती आली की एका दीड तासात पूर्ण होत असे, ती एखाद्या दिवशी नाही आली तर माझा सगळा दिवस कामात जायचा. न येण्यामागे कारण तिचे आजारपण असे. 
आई आणि भाऊ दवाखान्यात असताना दहा-पंधरा दिवस तिने संपूर्ण घर सांभाळले, आईची मावशी मदतीला आली होती पण गावाकडून आल्यामुळे तिला शहरी खानपान आणि विशेष करून पेशंटच्या खानपाना बाबतीत माहिती नव्हती. तेव्हा मावशीची खूप धावपळ व्हायची. स्वता:च्या घरचे काम करून आमच्या घर सांभाळत असे. या दरम्यान मी आँन डूटी २४ तास दवाखान्यात असे. आई व  भावाची केअर टेकर म्हणून दिवसभर आणि रात्री असा २४ तास मुक्कम दवाखान्यात असे. त्यामुळे मला घरात लक्ष देता येत नसे. तेव्हा मी निर्धास्तपणे मावशीच्या जीवावर घर सोडून जात असे. ती सगळं काम करून दवाखान्यात येत असे पण तिला पेशंट पाहून रडायला येत म्हणून पहिले काही दिवस तर आम्ही तिला पेशंटला भेटू दिलं नाही. तरीही तिचा रोज दवाखान्यात यायचा आग्रह असे.
पेशंट घरी आल्यवरही तिने आईची खूप सेवा केली अगदी मी किंवा माझी बहिण करू शकलो नाही तेवढी. रात्री एक –दोन वाजता उठून आईला काय हवं नको ते पाहत असे. आमच्यापेक्षा जास्त रात्र जागून आईची काळजी घेतली आहे. एवढं करून पहाटे ती कोथरूडला जात असे , दुपारपर्यंत काम करून पुन्हा आमच्या घरचा रस्ता धरत असे. असाच दिनक्रम दोन-तीन महिने सुरु होता. या काळात ती फक्त घरात सहकार्य करत नव्हती तर या सगळ्या दवाखान्याच्या धावपळीमुळे माझी नोकरी सुटली म्हणून मलाही मोठ्या विश्वासाने म्हणायची काम करणाऱ्याला नोकरी तर काय रोज मिळते. तुला पण मिळेल लवकर. तिला काय माहिती मीडियात काम करणे त्यापेक्षा नोकरी टिकवणे किती अवघड आहे. तिच्या या अशा बोलण्यामुळे मला धीर वाटत असे. शस्त्रक्रियेमुळे आईची तब्येत थोडी कमी जास्त होत असे, तेव्हा आईपासून आम्हा सर्वांना ती धीर द्यायची. आजच्या काळात कोण इतरांसाठी करत. जरी बहिण असली तरीही माझ्या मावशीसारखं कोणीच सहकार्य करू शकत नाही . दुसऱ्यांची मदत करायला त्यासाठी मोठ मन असावं लागत. नाहीतर आज रस्त्यावर कोणाचा अपघात झाला तरी लोक पहिला फोटो काढून व्हाटसआपला पाठवायची घाई करतात. पण माझी मावशी तिथे असेल तर त्या व्यक्तीला मदत करताना त्याची जखम पाहून रडायला लागेल आणि मग जमेल तशी मदत करेल.
म्हणून तर आजचा ब्लॉग हा अश्या व्यक्तीसाठी तिने कधी समाजसेवेची पदवी काय शाळेतही गेली नाही पण तिला शक्य असेल तशी मदत करते. ती इतरांना खूप मदत करते पण त्याचा लेखाजोघा पुन्हा कधीतरी .
दुसरी मावशी अशीच प्रेरणादायी. मला तिच्यामुळे संकटाना सोबत घेऊन आयुष्यात पुढे कसे जायचे शिकायला मिळते. काही वैयक्तिक संकटामुळे ती स्वत इतकी सक्षम झाली, की आता कुठल्याही प्रश्नाचे जशास तसे देते. हा गुण घेण्याचा प्रयत्न करत असते. अश्या गुणसंपन्न मावशी मिळाल्याने आम्हाला नेहमी घरातच प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व मिळाले.
म्हणून तर आई आणि मावशी दोघी आयुष्यात खूप गरजेच्या आहेत, तेव्हा माय जगो आणि मावशी पण जगोच अशी म्हण प्रचलित व्हावी असे वाटते.

उद्याचा ब्लॉग एका अशा स्त्रीविषयी तिची आणि माझी ओळख अगदी काही महिन्यांची पण गट्टी जमली जन्माची. 

Thursday, 15 October 2015

पुढे चाले वारसा सावित्री फुलेंच्या कार्याचा …।




आपल्या सगळ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप महत्वाचे आहे. शिक्षक असे मार्गदर्शक आहेत की, जे आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवन जगण्याची कला शिकवतात. लहानपणी आई-बाबा पेक्षा शिक्षक अधिक वेळ आपल्यासोबत असतात. दिवसभर आई-बाबा कामाला तर घरी आल्यावर आपलं खेळणं-क्लास यामुळे पालकांसोबत तसा कमी वेळ मिळतो. जास्त वेळ असल्यामुळे शिक्षक आपल्यावर अधिक चांगले संस्कार करतात. तसे मलाही शाळेत चांगले संस्कार करणारे शिक्षक भेटले. कॉलेजमध्ये शिकत असताना शिक्षकांशी नातं जुळत नाही असं ऐकले होते. पण माझी कॉलेजच्या शिक्षकांशी चांगली गट्टी जमली. म्हणून तर आजही अनेक संपर्कात आहेत. यामुळेच मी इतरवेळी नाही निदान गुरुपोर्णिमेला तरी मेसेज करायला विसरत नाही. अश्याच एका ध्येयवेड्या शिक्षिका वृषाली रणधीर मॅडमशी माझी मैत्री झाली. मैत्री या अर्थाने त्या शिक्षक या नात्यापेक्षा मैत्रिण म्हणून आमच्याशी वागत असत. आम्ही सगळ्या चांगलं –वाईट गोष्टी शेअर करायचो तसं आजही करतो. फक्त प्रमाण कमी झालं. पूर्वी मित्र-मैत्रिणीचे भांडण सांगायचो आता आयुष्याशी सुरु असलेले भांडण सांगतो. मी अकरावीपासून कॉलेजच्या साहित्य परिषद ग्रुप मध्ये काम करत असायचे. त्या सिनिअर कॉलेजला शिकवत होत्या. माझी कविता का लेख नक्की आठवत नाही यावरून विषय निघाला आणि माझी त्यांची ओळख झाली. पुढे कॉलेजच्या अनेक कार्यक्रमात आमची भेट होत राहिली.

एके दिवशी त्या एका उपक्रमावर काम करत असल्याचे कळले. शिका आणि कमवा या योजने अंतर्गत काम करण्यासाठी कोणीतरी शोधात होत्या. मला याबाबत चौकशी केली असता मी होणार दिला. कॉलेज करून तिथंच दोन तास काम करायचे आणि त्याचे पैसे पण मिळणार यामुळे कॉलेजच्या खर्चाचा भार जरा कमी होईल म्हणून मी खुश होते. आई-बाबांना याची कल्पना दिली आणि त्यांची परवानगी मिळाली. काही दिवसात काम सुरु झाले. पहिल्यांदा आपण जिथे शिकतो तिथ काम कसे करणार याची लाज वाटत होती. पण हेच काम माझी ओळख होईल याची कल्पना नव्हती. उपक्रम असा होता की सहकारी तत्वावर दुकान सुरु करायचं आणि तो बिझनेस म्हणून मोठा स्वरुपात व प्रत्यक्षात उतरायचा . ज्यामुळे कॉलेजमधील मुलांना सहकारी संस्थेचा प्रत्यक्षात अभ्यास करता येईल आणि कामाचा अनुभव घेता येईल. एकूणच काही दिवसात आमचं काम जोरदारपणे सुरु झालं. कॉलेजच्या मुलांकडून न्यूनतम रक्कम घेऊन भांडवल उभ केलं. आणि मुलांना प्रक्टिकल बुक बाहेरून घेण्याऐवजी आमच्याकडून विकत घ्या असे सांगितले. अश्या पद्धतीने मॅडमचे विचार प्रत्यक्षात रूप घेऊ लागले. या सगळ्यात मी अगदीच नवीन आयुष्यातील पहिला जॉब होता. त्यामुळे बिझनेस कसा सुरु करायचा याचे प्रशिक्षण मिळाले. शेअर आणि dividant, शेअर होल्डर, सहकारी संस्थाचे काम कसे चालते याचे ज्ञान मिळाले. हे विषय अभ्यासक्रमात होते पण हे सगळे विषय या कामामुळे आधीच अभ्यासून झाले व प्रत्यक्ष उपयोगही केला. हळूहळू कामाची व्याप्ती वाढत गेली. माझ्यात पहिल्यापेक्षा बरेच बदल घडत गेले. जी मुलगी कॉलेजच्या पहिल्यादिवशी घाबरत आत येत होती, (टीव्हीत पाहिलं होत पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांची रागिंग होते) ती आज सगळ्या कॉलेजमध्ये मनमोकळेपणे वावरत होती .अनोळखी मुलांना बोलणे पाप असते असे समजणारी सगळ्यांशी गप्पा मारत होती.
लहानपणी टी.व्ही वरील मालिकेत शेअर वर चर्चा व्हायची तेव्हा काय भानगड आहे असे वाटायचे, मोठं झाल्यावर आपण शेअर घेऊ म्हणजे श्रीमंत होता येईल असे वाटत होते. या कामामुळे त्या शेअरचा उलगडा त्याची व्याख्या पुस्तकात शिकण्याआधी झाला होता आणि  सगळं खरं-खोट उघड झालं. आता कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी ओळख झाली होती. सहकरी संस्थेत आलेल्या सर्वांशी गप्पा व्हायच्या. यामुळे संवादकौशल्य वाढ आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकास होत होता. या बदलास कारण की रणधीर मॅडम. त्यांनी मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळले. सगळ्या गोष्टी शिकवल्या. कधी कोणाशी कसे बोलायचे शिकवले. एक घटना आठवते, कॉलेजमधील कर्मचारी व आमच्यामध्ये काहीतरी कामावरून वाद झाला मी मॅडमला बोलले आपले बरोबर आहे, जाऊन चांगले सुनवू का ? पण त्यांनी सांगितले ते पदस्थ अधिकारी आहेत, तू विद्यार्थी जर आता बोलली तर तुझे नुकसान होईल. काम जाईल त्याचा पुढच्या शिक्षणावर परिणाम होईल. अश्यांना त्यांच्याच भाषेत पण वेळ पाहून उत्तर द्यायचे अशी मोलाची शिकवण दिली.
संस्थेचे सगळे व्यवहार बँकेच्या माध्यमातून होत असत. बँकिंग या विषयाचे मुलभूत ज्ञान पण प्रत्यक्षात अनुभवयास मिळाले. आज लहान मुलांचे खाते असा प्रकार सुरु आहे, त्यावेळी असं नव्हतं म्हणून माझ्यासाठी बँक व्यवहार करणे सुरुवातीला अवघड गेलं पण नंतर शिकले. हे याचं श्रेय ही मॅडमला जात. फक्त व्यवहारिक ज्ञान दिले असे नाही सामाजिक विचारसरणी वाढवण्यात मदत केली.  आमच्या सामाजिक विषयावर छान चर्चा रंगायच्या. या चर्चातून विचारांची देवाणघेवाण करायचो. हुंड्यापासून ते आजची तरुणाई असे अनेक विषय असायचे. खेड्यातील मुलींना शिक्षणासाठी आजही घ्यावे लागणारे कष्ट असो किंवा शिक्षणाची संधी असताना तिचा गैरफायदा घेणाऱ्या मुलं-मुली, समाजातील असमानता या सगळ्या विषयवर सखोल चर्चा होत असे. त्या स्वत :सावित्री फुले यांच्या जीवनकथा यावर एकपात्री छान करायच्या. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून शेवटी रडवत असत. असा अभिनय करत असत. त्यामुळे मुलींसाठी त्या फक्त आदर्श शिक्षक नाही तर आदर्श व्यक्ती आहेत.त्यांनी पीएचडीसाठी बचत गट हा विषय घेतला होता, तेव्हा त्या महिलांचे अनुभव आम्हांला सांगत. त्यांना या विषयावर जास्त अभ्यास करता यावा म्हणून त्यांनी काही बचत गट सुरु केले होते. प्रत्यक्ष माहितीच्या आधारे आम्हांलाही हा उपक्रम समजून घेता आला. म्हणून आमचा कॉलेजमधील मुलींचा बचत गटही तयार केला होता. तो पुणे विद्यापीठातील विद्यार्थिनीचा पहिला बचत गट होता. मुलींनी नेहमी प्रगती करावी त्यासाठी कष्ट घ्यावे लागले तरीही चालेल. पण तुम्ही जगाचा अनुभव घ्या असं नेहमी सांगत जर गरज लागली तर मला सांगा मदत करेल, मी नेहमी तयार आहे. असे बोलत असत. यानुसार टाटा जागृती यात्रेचा फार्म भरण्यासाठी त्यांची मदत मागितली , त्यांनी लगेच होकार दिला पण संध्याकाळी वेळ आहे माझ्या घरी येणार का? असं विचारलं, येताना सगळं मराठीत लिहून आण. त्याचं पीएचडी काम अंतिम टप्प्यावर आले होते, याची कल्पना होती. तरीही मदत करायला तयार झाल्या. त्याचदिवशी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान फार्म भरला. त्या धानोरीला राहत होत्या. मी हडपसरवरून म्हणजे २०-२५ किलोमीटर प्रवास करून रात्रीच्या वेळी एकटीच गेले होते. घरी येताना एका फार्मसाठी एवढे कष्ट कोणी सांगितले असे वाटले होते पण माझी यात्रेसाठी म्हणजे १८ दिवस संपूर्ण देश फिरण्यासाठी निवड झाली तेव्हा त्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता.
एन.एस.एस. कॅम्पमध्ये तर आम्ही फार धमाल करायचो. सगळ्यासोबत गाणी गात असत, मनमोकळ्या गप्पा करताना मॅडम सहभागी व्हायच्या. त्या कॉलेजनी दत्तक घेतलेल्या गावात दरवर्षी १५ ऑगस्टला मुलांना घेऊन जात. त्यांनी तिथे छोटीशी शाळाही सुरु केली होती. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून तर तरुणांना प्रशिक्षणमधून रोजगारचे पर्याय उपलब्ध करून दिले. अश्या नेहमी दुसऱ्यासाठी धडपडणाऱ्या मॅडम यांनी घरातील नातेवाईक यांच्यासाठीही खूप केलं. आमचा कॉलेजचा सगळा ग्रुप हा एक कुटुंब होता तर मॅडम या कुटुंबप्रमुख होत्या. आजही त्या तश्याच आहेत. कठीण काळात कोणाला मदत लागली तर जमेल तशी मदत करणाऱ्या आणि मानसिक आधार देणाऱ्या, वडिलकीच्या नात्याने रागवणाऱ्या पण नाजूक प्रश्नांना तितक्याच प्रेमळ भाषेत सोडवणाऱ्या. सगळ्यांची प्रगती कशी होईल असा विचार करणाऱ्या आमच्या लाडक्या मैडम रणधीर मैडम......
....

उद्याचा ब्लॉग अशा एका स्त्रीविषयी जी संपूर्ण अशिक्षित असूनही लोकांना सहकार्य कसे करते...... मग नक्की भेट द्या ब्लॉगला.






















Tuesday, 13 October 2015

यशोधा मैय्या..... हजारो मुलींची एकचं आई



 यशोधा मैय्या..... हजारो मुलींची एकचं आई

जन्म देते ती आई आणि आपल्याला घडवते ती यशोधा माता पण सगळ्यांना अशी संधी मिळते असे नाही, मला आणि लीला पूनावाला फाउंडेशनमधील सगळ्या मुलींना ही संधी मिळाली. आम्हा सगळ्या मुलींना जन्मदाते आई –वडिल आणि घडवणारे आई –वडील असे दोन्ही लाभले आहेत. त्यामुळे अहो थोर भाग्य आमचे. पदवीचे शिक्षण सुरु असताना सामाजिक क्षेत्रात काम करायची इच्छा निर्माण झाली. कॉलेजने दिलेल्या एका संधीमुळे सामाजिक इंटरशिप करताना लक्षात आले, की समाजात चांगले आणि समाज कल्याणाचे काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. जर प्रसिद्धी मिळाली तर समाजातील जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल, यासाठी आपण काहीतरी करावे म्हणून अनेक पर्याय शोधात असताना पत्रकारिता हा उत्तम मार्ग आहे असे लक्षात आले. आपण पत्रकार म्हणून करियर करायचे ठरले, त्यावेळी माझ्याकडे कसली माहिती नव्हती, कॉलेज कुठे ? फी किती असेल आणि बरेच प्रश्न होते तरीही कॉलेज संपल्यावर प्रवेश मिळवण्यासाठी शोधाशोध सुरु केली. रानडे इन्स्टिट्यूट सर्वोत्तम पर्याय आहे असे समजले. परंतु जाचक अटी आणि प्रवेशपरीक्षा यासंदर्भातील अपुरी माहिती यामुळे मला रानडेत प्रवेश मिळाला नाही. माझ्या करीयरच्या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल त्याला सुरुवातीलाच ठेस लागली होती, मग खाजगी कॉलेजची चौकशी केली तर फी भरमसाट होती. घरच्या परिस्थितीमुळे काय करावे असा प्रश्न पडला असताना लीला पूनावाला फाउंडेशनची सकाळमध्ये जाहिरात पहिली. जाहिरातीनुसार गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मी ताबडतोब फोन केला आणि दुसऱ्या दिवशी जाऊन फार्म भरला, तिथले वातावरण पाहून माझ्या स्वप्नांना दिलासा मिळाला. खाजगी कॉलेजचा शोध सुरु असताना एम.एम.सी. कॉलेजमध्ये प्रवेश नक्की झाला. परंतु मोठ्या फीचा आकडा पाहून आणि आतापर्यंत जवळपासच्या कोणी असे काम करत नाही ,नोकरी मिळेल का अश्या प्रश्नांनी घरातून मला विरोध होऊ लागला. पण मी काम करून कॉलेज करते आणि फीतील काही रक्कम स्वत: जमा या विश्वासावर मला कॉलेजला प्रवेश घ्यायची परवानगी मिळाली. तोपर्यंत लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. एके दिवशी फोन आला की मला शिष्यवृत्ती मिळाली आहे. वेगळ्या करीयरची संधी मिळणार म्हणून मी खूप आनंदी होते. शिष्यवृत्तीसाठी मुलाखतीचा फेरी असते, त्यावेळी फिरोज पूनावाला आणि लीला पूनावाला यांची भेट झाली. त्यांना सगळ्या मॉम- डॉड म्हणतात. मला विश्वास वाटायला लागला की आता आपले भविष्य सुरक्षित झाले. माझ्या हसमुख चेहऱ्याची पहिल्यांदा डॉडने स्तुती केली. घरातील माणसापेक्षा कोणीतरी आपुलकीने बोलणारे भेटले अशी जाणीव झाली.
शिष्यवृत्ती वितरण समारंभ आयोजित केला होता त्यात प्रमुख पाहुणे म्हणून मा. राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम येणार असल्याचे कळले , माझा तर आनंद गगनात मावत नव्हता. मला शिष्यवृत्ती मिळाल्याने पत्रकारितेतील करियरला पंख मिळाले होते त्याचबरोबर माझ्या आदर्श व्यक्तीकडून ती मिळणर आणि त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळणार याची कल्पनाच फार छान वाटत होती. भव्य –दिव्य समारंभामध्ये शिष्यवृत्तीचे वितरण झाले. राष्ट्रपतीला भेटायची व बोलायची संधी मिळाली. 

 माझी पत्रकारिता शिक्षणाची गाडी सुरळीत झाली. दोन वर्षाचा अभ्यासक्रम होता, अभ्यासासोबत मी फाउंडेशनच्या विविध उपक्रमात सहभागी होऊ लागले. फाउंडेशन मुलींसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करीत असे, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल आणि स्पर्धेच्या जगात टिकून राहता येईल व आपली ओळख बनवता येईल. इंग्लिश स्पोकन क्लास असेल किंवा कॉर्परेट जगातील वागण्या-बोलण्याची पद्धत अश्या छोट्या-छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या प्रकल्पाला भेट देऊन त्याची प्रत्यक्षात माहिती घेता येईल. मला या कार्यक्रमाचा चांगला फायदा झाला. कार्यक्रम मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केले जात असत. त्यामुळे खेडेगावातील मुलीलाही भव्य –दिव्य हॉटेलची ओळख होत असे. तिथलं खाद्यपदार्थ सगळ्यांनी खावे असा मॉमचा आग्रह असे. तुम्हा मुलींना भविष्यात हे अनुभवायला मिळणार आहे, पण त्याची सवय करा अश्या बोलत असत. त्याचं सगळ्या मुलींवर सारख प्रेम करत. मग ती कुठली असो व कोणीही. ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रमाणे कार्य सुरु आहे. हळूहळू त्यांच्या कार्याची महानता लक्षात येऊ लागली. त्यांनी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी किती कष्ट घेतले, तरीही जिद्द सोडली नाही. निवृत्ती घेतल्यावर निवांत न बसता गरजू मुलींच्या शिक्षणासाठी फाउंडेशन सुरुवात केली. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आजही त्या खूप कष्ट घेत आहेत. त्यांची वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक, शाररीक क्षमता पाहता आम्हा मुलींना फार अप्रूप वाटत. तसेच दोघा नवरा- बायकोच प्रेम पाहून आमच्या सगळ्यासाठी ते आदर्श जोडप आहे. म्हणूनच आमच्यासाठी मॉम एक खुले विद्यापीठ आहे . तुम्हाला किती शिकता किंवा घेता येईल ते तुम्ही घ्या. जर कोणी नाराज असेल किंवा निराश असेल तर मॉम ओळखतात आणि त्याचावर मलमपट्टी नक्की करतात. अशा खूप गोष्टी आहेत पण सगळ्याच मांडता येतील असं नाही.
एक त्यांचा गुण मला सांगाव लागेल काल सांगितले तसे सकाळमध्ये निवड झाल्यामुळे खूप निराश होते. फाउंडेशनच्या ऑफिसला सकाळ प्रकरणाची कल्पना दिली होती , निवड झाली नाही म्हणून सांगितल्यावर निराश होऊ असा संदेश आला, मला सकाळमध्ये काम करायचे होते म्हणून मी त्यांना विचारले की तुमच्या मदतीने काही करता येईल का? मला उत्तर नाही मिळाले, नाराज झाले पण त्यांनी जो संदेश दिला तो खूप मौल्यवान होता , आज ही माझ्या चांगला लक्षात आहे, त्यानुसार काम करते. त्या म्हणाल्या मी आता तुला आज नोकरीसाठी मदत केली तर त्याची किंमत राहणार नाही , तसेच आयुष्यभर तुला वाटत राहील की वाशिल्यावर नोकरी मिळाली, स्वता:च्या गुणवत्तेवर नोकरी मिळव, आज सकाळने नकार दिला पुन्हा संधी मिळेल तेव्हा स्वता:ला सिद्ध कर. तेव्हा हे पचवणे थोडं अवघड गेल. पण नंतर वेगळ्या प्रकारची संधी मिळाली. तेव्हा मॉमचे बोल आठवले. तेव्हापासून मात्र सकाळने मला बोलवले नाही ती वेगळी गोष्ट.
मी फाउंडेशनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होत असे. तेव्हा पी.ए. (शांतीदूत)या उपक्रमाची माहिती मिळाली. यामध्ये मुलींना इंग्लडमधील आशा सेंटर मध्ये प्रशिक्षणासाठी जात असत. आपल्याला ही संधी मिळावी अशी इच्छा होती. दोन-तीन बॅच गेल्या होत्या. मी संधीची वाट पाहत होते. तेव्हा मॉमने  एकदा विचारले तू का नाही पी. ए साठी अर्ज करत? मग काय एका मैत्रिणीच्या मदतीने अर्ज केला.  माझे साहेबांच्या देशात जाण्याचे स्वप्न फळास लागले. पासपोर्ट आणि बाकी सोपस्कार उरकून एक दिवस आम्ही चौदा मुली व मॉम-डॉडनी आकाशात झेप घेतली. सकाळी उतरलो तेव्हा डोळे भरून आम्ही तिथलं जग पाहत होतो. आम्ही सगळ्याजणी पहिल्यांदा विमानात बसलो होता, ते फक्त फाउंडेशनच्या खऱ्या अर्थाने मॉम-डॉडच्या कृपेमुळे . त्यांनी आम्हाला वेळो-वेळी तिथली शिस्त समजावून सांगितली. लोकांचे राहणीमान –खानपान अश्या बऱ्याच गोष्टींची माहिती दिली. विविध ठिकाणी फिरायला गेलो. (याची सविस्तर माहिती पुढच्या वेळी ) यामुळे माझे ऑक्सफर्ड युनिवर्सिटी पहायचे स्वप्न पूर्ण झाले. आतापर्यंत फक्त तिथले वर्णन चित्रपटात किंवा कोणाकडून ऐकले होते. त्या सगळ्या गोष्टी पाहायला व अनुभवायला मिळत होत्या. मनोमन सगळ्याजणी दोघांचे आभार मानत होतो. पण प्रत्यक्षात कसं बोलणार असा प्रश्न होता.
एका संध्याकाळी आम्ही सगळेजण एका चायनीज हॉटेलमध्ये गेलो, लंडनमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आम्ही वेगळे पदार्थ खावे असा मॉम आग्रह करत होत्या. या हे खाद्यपदार्थ दुसरीकडे मिळणे कठीण असत तेव्हा नक्की चव पहा असं अगदी आपुलकीने सांगत होत्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा एका नवीन हॉटेलमध्ये गेलो. तेव्हा मोकळा वेळ होता म्हणून आम्ही तिथेच आमची गाण्यांची महफिल भरवली होती, तिथल्या इंग्लिश बाबूंना ते जरा विचित्र वाटत होत पण आम्ही अगदी मराठी- हिंदी गाणे छान रंगात येऊन गात होतो, आमची महफिल अगदी नाजूक वळणावर येऊन थांबली, ते गाणं होत “ ये तो सच है की भगवान है, मगर फिर भी अंजान है, धरती पे रूप  मां-बाप का उस विधाता की पहचान है....... हे गाणं गात असताना आम्ही सगळ्याजणी खूप भावूक झालो. आमच्या या आई-बाबांना जाऊन बिलगलो. त्यावेळी आई-बाबांच्या डोळे पाणावले होते, आणि आमचं गाणं आश्रूमय झालं होत. त्या इंग्लिश बाबूंना अगदी आनंदाने गाणाऱ्या रडायला का लागल्या हे समजत नव्हतं, पण आम्ही  गाणं पुर्ण म्हणेपर्यंत आश्रुची लाट वाहू लागली होती.
या पुढे काय लिहू या आईविषयी तिने खूप काही दिलाय, खूप शिकवलं आणि आजही ही प्रक्रिया सुरु आहे. धन्यवाद बोलल्याने काही होणार नाही, तिची परतफेड भविष्यात तिच्याच कामातून प्रेरणा घेऊन काहीतरी करायचा प्रयत्न असेल.
उद्या अजून एका स्त्रीविषयी जिच्यामुळे जीवनाला कलाटणी मिळाली, पण थोडी विश्रांती.... उद्याची वाट पहावी लागेल यासाठी.......