Tuesday, 9 August 2016

कारभारीण आहे खंबीर, आमचा मात्र निरोप घ्यावा

शेतकऱ्यांच्या कणखर स्त्रियांची गोष्ट 

माणसाचा पोशिंदा जगला पाहिजे. असे किती वाटत असले तरी देशातील परिस्थिती वाईट झाली आहे. हजारो शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्र राज्यात यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. निसर्गराजा शेतकऱ्यावर नाराज होऊन रुसून पळून गेला की काय असे वाटत राहते. तीन- चार वर्ष सतत दुष्काळ, विहिरी,तलाव,तळी कोरडी पडायला लागली. अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जायचं कुठ ? डोक्यावर कर्जाचा बोजा आणि डोळ्यासमोर पाण्याविना व्याकूळ झालेली जनावर. सगळं वातावरण कसं निराशामय झालाय . यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण त्याची कारभारीण मात्र खंबीरपणे आणि कणखरपणे या परिस्थितीत तग धरून आहे. कदाचित शेतकऱ्यापेक्षा जास्त दुख सोसत ती आज परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. उलट संकटाशी सामना न करता शेतकरी आत्महत्या करणे स्वीकारत आहे. त्याचवेळी ती या समाजातील वाईट नजरापासून ते रोजच्या पोटापाण्याचा समस्या एकटीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा महिलांच्या समस्या आणि त्यांचे सक्षमीकरण यांचा आढावा मांडणारा हा लेख. 
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या आधारे शेतकरी आत्महत्येसाठी मुख्य कारणे म्हणजे दिवाळखोरी, कर्जाचा डोंगर, शेतीशी संबंधित विषय नापिकी, नैसर्गिक आपत्तीने संकट, गरिबी, कौटुंबिक समस्या, आजारपण आदी आहेत. ही कारण सरकार नोंदी  आहेत. या आत्महत्या करणाऱ्यांची संख्या पहिली तर २०१२ व २०१३ मध्ये अनुक्रमे १३७५४ व ११७७२ जणांनी आत्महत्या केल्या. तर २०१४ मध्ये  ५६५० शेतकरी आणि ६७५० शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. २०१५ मध्ये ही संख्या अजून वाढलेली आहे. जेवढ्या आत्महत्या झाल्या त्या सगळ्या पुरुष शेतकऱ्यांनी केली. यात महिलांची संख्या अगदीच नगण्य आहे. पण आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही उलट वाढतोय. पण आत्महत्या केल्यावर सरकार पैसे देतेय म्हणून काहीजण आत्महत्या करत आहेत असे मराठवाड्यात महिलांसाठी काम करण्याऱ्या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्तीने सांगितले. तिने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता पण अजून माहिती घेतल्यावर कळलं की आत्महत्या केल्यावर कर्ज माफ होत आणि उलट पैसेही मिळतात म्हणून आपल्या घरच्याला मिळतील पैसे या उद्देशाने हा आत्महत्या वाढत आहे.  यासंदर्भात एका शेतकऱ्याच्या पत्नीशी संपर्क केला. तिचा नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलल्यावर अनेक गोष्टीचा उलगडा झाला आणि सत्य परिस्थिती बाहेर आली. खरचं काहीजण असे करतात. पण शेतकऱ्यांच्या अडचणी संपत नाही तर वाढतात याची माहिती मिळाली. 

 आत्महत्या केली त्याची बातमी दिसते पण त्यानंतर काय? लेखाची माहिती गोळा करताना मात्र भयानक चित्र समोर आले. शहरातील लोकांना वाटते शेतकऱ्यांना काय पैसे मिळतात पण त्यांना किती पैसे मिळतात? ते मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. ते पैसे मिळवण्याचा प्रवास किती कठीण आहे याची जाणीव झाली. या सगळ्या परिस्थितीला शेतकऱ्याची बायको सामोरे जातेय. बऱ्याच वेळा एकटी असते ती, कशी सामोरे जाते हे तिच तिलाच माहिती. बारा विश्व दारिद्र्य आणि भविष्याची चिंता खायला तीन –चार तोंड या सगळ्यातून जगायची प्रेरणा कुठून आणते हा प्रश्न आहे. पण आई ती आई असते. काही झालं तरीही पोराबाळांना खाऊ पिऊ घालून संसारचा गाडा खंबीरपणे ओढते आहे. यासाठी तिला सलामच करायला हवा. 

मराठवाडातील एकल महिला संघटना ही संस्था अनेक वर्षपासून महिलांच्यासाठी काम करते. विशेषतः विधवा, परीतक्ता, घटस्पोटीत, प्रौढ कुमारिका अशा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते, तसेच त्यांना न्याय आणि समता मिळावी म्हणून कार्य सुरु आहे. संस्थेत काम करणारी लक्ष्मी वाघमारे हिच्या मते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांचे प्रश्न दिवसेदिवस वाढू लागले आहेत. एक तर या महिला आयुष्यभर ‘चुल मुल’ यामधून बाहेर पडलेल्या नसतात आणि घरचे पुरुष पडूही देत नाहीत पण अचानक नवऱ्याने आत्महत्या केली की सगळी लढाई तिला एकटीने लढावी लागते. घरच्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी तिलाच पाहाव्या लागतात. यामुळे  आयुष्याचा जोडीदार सोडून गेला याचं दुख करायला वेळ मिळत नाही. तरीही ती परिस्थितीला वैतागून आत्महत्या करत नाही किंवा धीर सोडत नाही लढत राहते. समाजाच्या वाईट नजराशी, दुष्काळच्या भयाण वास्तवाशी, नातेवाईकांच्या टोमणाशी आणि कधीतरी स्वत:शी स्वत:ची  असलेली लढाई लढत असते. 

अगदी कोवळ्या वयात बोहल्यावर चढलेली ती पोरगी, चांगलं –वाईट कळेपर्यंत दोन पोरांची आई झालेली असते. पुर्वी आजारपण किंवा अन्य कारणांनी विधवा झालेल्या नशिबाला दोष देत पण आता या शेतकऱ्यांच्या विधवांनी कोणाला दोष द्यावा? असा प्रश्न पडतो. आपला नवरा आपल्याला संकटात एकटा सोडून गेला याचा राग येतो त्यांना, मी त्याचा संसार का सांभळू असा प्रश्नही पडत असला तरी त्याचे आई- वडील, बहिण- भाऊ, आजी –आजोबा आणि स्वतःची मुले यांची सगळ्यांची जबाबदारी विलया पेलत असते. सरकारकडून मिळणारी मदत मिळवण्यासाठी तिला घराबाहेर जावं लागत. घराबाहेर न पाडलेल्या स्त्रीला एकटीला कोणी उभं करत नाही. या कामासाठी कोणाची मदत घ्यायची तर त्याला अर्धा हिस्सा द्यावा लागतो. जर दिला नाही तर अर्धा पण हिस्सा मिळत नाही. म्हणून मन मारून अर्धा हिस्सा त्याला देऊन मिळणाऱ्या पैसेची वाट पाहते. येणाऱ्या पैश्यात घरातलेच हिस्सेदार होतात तेव्हा मात्र मन घट्ट करून परिस्थितीला लढा देण्याशिवाय उपाय नसतो. एकदा का पैसे मिळण्याची आशा दिसली की पहिले घरातील नातेवाईक हिस्सेदार म्हणून उभे राहतात त्याच्यावर आमचीही जबाबदारी होती म्हणून हिस्सा मागतात. अशा काही प्रकारामुळे येणारे पैसे रखडतात. हिस्सेकारी वाढले की येणारी रक्कम स्वत:च्या कुटुंबाला उशिरा आणि कमी मिळते तसेच सावकाराच भूत मानगुटीवर बसलेले असते. कधी कधी सावकाराच्या वागण्यावरून हा माणूसच आहे का असा प्रश्न पडतो. पण तिला सावकाराचे कर्जही फेडल्याशिवाय उपाय नसतो. कर्ज फेडण्यासाठी मात्र कोणी हिस्सेकारी नसतो .  कोणी नातेवाईक मदत करत नाही. उलट पैसे मागायला येऊ नये म्हणून अंतर ठेऊन वागतात. 

स्त्री ही जास्त सहनशील असते. असे आपण नेहमी म्हणतो पण संकटाकाळात ती ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळते. यावरून तिच्या सहनशीलता आणि कणखर वृत्तीचे दर्शन होते. असेच काहीसे दृश्य मराठवाड्यात पाहायला मिळते. नवऱ्याने आत्महत्या केल्यावर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो.तरीही मुलांचा विचार करून परिस्थितीशी लढत असते. संस्था सरकारी योजनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते पण अनेक कागदपत्राची पूर्तता नसल्यामुळे तिला फायदा मिळत नाही. तसेच जमीन ,घर पतीच्या नावावर असल्यामुळे तिला ही मालमत्ता स्वत:च्या नावावर करण्यासाठी ती पहिल्यांदा सरकारी लालफितीत अडकते . तिथून बाहेर काढणारे त्याचा चांगला दाम पण घेतात. अशा अनेक पाळतीवर संकटांशी सामना करत ती आपल्या मुलांच्या भविष्यासाठी न थकता, निराश न होता चालत राहते. 
अशाच एका आईची व्यथा बीड मधील आंबेवाड गावातील २५–२६वर्षीय मनीषा तिकडे हिच्या नवऱ्याने आठ महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. तिच्याशी बोलताना जाणवले की तिला नवऱ्याचा राग येत होता, फक्त एक –दीड लाखासाठी त्याने आत्महत्या करावी असा प्रश्नही सारखा सतावत होता. तसेच वाईट पण वाटत होते. कर्ज काही फार जास्त नव्हते पण आता माझ्या पोराबाळांना होणार त्रास त्या कर्जापेक्षा लाखो पट्टीने जास्त आहे, हे जाणवते होते. पोटाची खळगी भरण्यासाठी जीवच रान करावं लागतंय, पण पाऊस-पाणी म्हणून काम नाही, काम नाही म्हणून पैसा नाही म्हणून सगळं कसं दुष्टचक्र बनलाय, अशी एकूण परिस्थिती. ती पुढे बोलताना म्हणाली “तो मला आणि माझ्या पोरांना सोडून गेला पण आमचा विचार केला नाही. आता मी पण तसचं केल तर ? पण पोराकडे बघून जगते. ताई माणस (पुरुष )पुढचामागचा विचार करीत नाहीत. त्यांच्यानंतर हा उघड्यावर पडलेला संसार कसा सांभाळायचा ?असा प्रश्न जगू देत नाही आणि मरू पण देत नाही.” आपल्या जीवनाची चित्रकथा मांडताना तिने सांगितले की शेतात काम करताना नवऱ्याच्या डोळ्यांना काहीतरी लागले होते, त्याची शस्त्रक्रिया करायला ३०-४० हजार खर्च झाले. शेतीसाठी सावकारकडून १ लाख घेतले होते. दुष्काळामुळे पीक नाही आले आणि कर्जाचे व्याज वाढत गेले. त्यामुळे नवरा लय काळजी करायचा. तेव्हा मी त्याला सांगायचे की “कर्ज काय राहत असत व्हाय, आज ना उद्या फिटेल की कशाला काळजी करता” पण त्यांनी एक दिवस न सांगताच आत्महत्या केली मागे फक्त एक पाच वर्षाचा व दुसरा आठ वर्षाचा मुलगा आणि कर्जात अखंड बुडालेला संसार राहिला. दोन दिवस रडायला लोक आली, आज कोणी विचारत पण नाही , सरकारने मदत दिली पण ७५ % रक्कम पाच वर्षासाठी पोस्टात टाकली. हातात उरले तीस हजार  नाम संस्थेने १० – १२ हजार दिले पण एवढेसे पैसे कुठवर पुरणार? आता रोज सकाळी आज काय खायचं यांची चिंता पडते. मजुरीला जाते पण कधी आहे तर कधी नाही असा सगळा प्रकार. चार दिवस लोक आले वाईट वाटत म्हणून पोराकडे पाहून निघून गेले. आज पोरगा दिवसभर रडत बसला तरी कोणी पाहत नाही. पोरांना सगळ कळतंय आपला बाप असत तर ही हाल झाली नसती. त्यांना कोण समजवणार तुमचा बाप संकटाशी न लढता निघून गेला. त्याने धीर सोडला.  पण मी नाही सोडला आणि सोडणार पण नाही. पोरांना शिकून मोठ्ठ करणार. आज पाऊस नाही म्हणून काय झालं अर्ध्या भाकरीवर जीवन काढू, पुढच्या वक्ताला येईल की पाऊस मग करीन पोराची हौस-मौज. 

संस्था अशाच काही महिलांना रोजगार मिळावा म्हणून कार्य करते. यातून काहीजणी मशीन शिकून आणि बचत गटाच्या माध्यमातून जीवन सुधाण्यासाठी पुढे सरसावल्या आहे. आता गरज आहे शेतकऱ्यांनी समजण्याची की संकटाना सामोरे जाण्याची आणि कारभारीण कणखर आणि खंबीर आहे म्हणून तिला एकट सोडून न जाण्याची. सरकारने या विधवा आत्महत्या केल्यावर पैसे देण्यापेक्षा आत्महत्या करू नये म्हणून काम करावे. 

एक विनंती : पाऊसपाणी नाही म्हणून दुष्काळ पडतोय हे मान्य आहे सावकारच, सरकारच कर्ज , पोरीचं लग्न आणि अजून बऱ्याच अडचणी आहे पण याच दु:ख तर घरातील स्त्री- पुरुषांना, नवरा- बायको असो आई –मुलगा या सगळ्यांना सारखं आहे मग आत्महत्या करताना पुरुष का आघाडीवर आहेत ? स्त्री म्हणून तिलाही या सगळ्या गोष्टीचं समान दु:ख आहे. ती परिस्थितीशी लढा देत आहे. ती सहनशील म्हणून तिच्यावर तुमच्या संसारच ओझं टाकून तिला असं अर्धवट वाटेत सोडून जाऊ नका. 


(स्त्रीसक्षमीकरण पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालेला  लेख -एप्रिल २०१६)







Monday, 8 August 2016

सिर्फ नाम ही काफी है- डॉ. कलाम सदैव प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व


 'सिर्फ नामही काफी है' असं म्हणतात. दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याबाबतीत असंच आहे. डॉ. कलामराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याविषयी माझ्या मनात कमालीची उत्सुकता वाढू लागली. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बुक लव्हर ग्रुपचा एक प्रोग्राम होता, त्यावेळी मी त्यांच्या एका पुस्तकाविषयीचे मत मांडले होते. त्यामुळे डॉ. कलाम यांची फक्त राष्ट्रपती अशी  ओळख आहे यापेक्षा त्यांची अधिक ओळख म्हणजे शास्त्रज्ञ आणि लहान मुलांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व अशी झाली. सकाळ वृत्तपत्रानं शालेय मुलांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात माझा भाऊ गोविंदची निवड झाली होती. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कलाम आले होते. लहान मुलांशी मनसोक्त संवाद साधून कोणाच्या डोक्यावर हात, तर कोणाशी हस्तांदोलन करुन आपलंसं केलं. त्यात गोविंदही होता. त्यानं ही आठवण सांगितल्यावर तर मला त्यांना भेटण्याची इच्छा अधिकच बळकट झाली. त्यानंतर वानवडीतील अपंग शाळेच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं समजलं आणि आम्ही  त्यांना पाहायला जायचं ठरलं. पण कसं भेटणार, असा प्रश्न मनात होताच. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी जाताना घराजवळील मुख्य रस्ता पोलिसांनी बंद केला होता. चौकशीअंती राष्ट्रपती या रस्त्यानं वानवडीला जाणार असल्याचं समजलं मी आणि माझा भाऊ राष्ट्रपतींचा ताफा जाण्याची वाट पाहू लागलो.
काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रपतींचा ताफा समोरून जाऊ लागला त्यात  दोन तीन मोठ्या काळ्या गाड्या आल्या , त्याचवेळी आमच्या सोबत प्रतीक्षा करत असलेल्या शाळेतील मुलांनी हात वर करून टाटा करत असल्याचा इशारा केला. नकळत आम्हीही त्यांना साथ दिली. आश्चर्य म्हणजे चक्क एका गाडीतून एका व्यक्तीनं प्रतिसाद दिला. काळ्या काचेतून धूसरशी दिसणारी ती व्यक्ती डॉ. कलाम होती. कलामसाहेबांनी आम्हांला टाटा केल्याचा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. घरी आल्यावर पुन्हा वानवडीला त्यांना भेटायला जायचं ठरलं. त्या कार्यक्रमाचे पास नव्हते तरीही जायचं ठरले. निदान बाहेर उभा राहून भाषण ऐकता येईल म्हणून मी, भाऊ, मावसबहीण असे सगळे सायकलीवर निघालो. वानवडी चार ते पाच किलोमीटर अंतर लांब होती , म्हणून भरभर सायकल चालवत आम्ही वानवडीत पोहचलो पाहतो तर काय सगळीकडे कडक बंदोबस्त होता. काहीतरी कारण सांगून अपंग शाळेजवळ पोहचलो. तरीही 200 मीटर अंतरावर थांबवलं. त्यामुळं आम्ही तिथं पोहचताच 10 मिनिटांनी राष्ट्रपतींचा कार्यक्रम संपला. गाडीत बसण्यासाठी म्हणून जेव्हा ते बाहेर आले तेव्हा सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून किंचितस दर्शन झालं. आम्ही धन्य पावलो. मला दिसले मला दिसले  म्हणत पुन्हा घराकडे गेलो. त्यांना भेटायची अजून इच्छा निर्माण झाली.

पुढे पत्रकारिता शिक्षण घेण्यासाठी लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्य वृतीच्या कार्यक्रमाला डॉ. कलाम येणार असल्याचं कळलं. माझा आनंद द्विगुणित झाला होता. त्यांना समोरासमोर पाहायला मिळणार म्हणून आणि घरचे खूप आनंदी होतो. कार्यक्रमाच्या दिवशी आई आणि मी हॉटेल ब्लू डायमंडला पोहचलो. आयुष्यात पहिल्यांदाच एवढं मोठं हॉटेल पाहून डोळे दिपले. ज्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून होती तो क्षण आला. महामहीम कलामसाहेब याचं आगमन झालं,त्यांना डोळे भरून पाहिलं. शिष्यवृत्ती मिळालेल्या अनेक मुली होत्या. त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते शिष्य्वृतीचं वितरण सुरु होतं. मनात एक भीती होती, माझी भेट होईल ना. तेवढ्यात माझं नाव पुकारलं मी पुढे जाऊन उभी होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर उभी राहण्याची संधी मिळाली होती. शिष्यवृत्ती स्वीकारताना त्यांनी माझी चौकशी केली. पदवीला कोणता विषय होता असे विचारले ?बँकिंग विषय असल्याचं बोलले तेव्हा, 'वेरी गुड, कीप इटअप! या विषयात काम करण्याची गरज आहे, 'असं बोलले.
  त्यांच्या या दोन वाक्यांनी आणि सोबत काढलेल्या फोटोनं माझ्यात एक नवा उत्साह संचारला. त्यांनी दिलेला संदेश कायम लक्षात ठेऊन कामाला लागले, 'देशभक्त होण्यासाठी देशाच्या सीमेवर लढायला जायची गरज नाही; फक्त आपलं काम प्रामाणिक आणि व्यवस्थित करा व आपल्या आजूबाजूच्या लोकांना शिक्षित करा. नाही जमले तर आपल्या आई वडिलांना शिकवा. आणि नेहमी विद्यार्थी म्हणून राहा खूप मोठे व्हाल. 'त्यांच्या या संदेशानं माझ्या जडणघडणीत अनेक सकारात्मक बदल झाले. असा हा अवलिया कायमच माझ्या स्मरणात राहील.
माझ्या आयुष्यात मला जे काम करायचे होते ते करायला मिळाले नाही तेव्हा फार नाराज होते पण  कलामसाहेब यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन मी पुढे वाटचाल सुरु ठेवते. 

स्वप्न खरी होतात याचा प्रत्यय तुम्हाला भेटल्यावर आला. कोटय़ावधी ह्रदयांचे प्रेरणास्थान, राष्ट्राचा खरा रिअल हिरो, प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत, राष्ट्राची खरी शान असणारा, राष्ट्रासाठी जगणारा आणि या राष्ट्राला 2020 व्हिजन देणारा महामानव यापेक्षा  खऱ्या अर्थाने दुरदृष्टी असलेला नेता. अशा नेत्याला आयुष्यात एकदा भेटायचं असं स्वप्न मी ही पाहिलेलं, एक दिवस प्रत्यक्षात उतरलं .विश्वास बसत नव्हता पण त्यांच्या हस्ते माझ्या दुसर्या स्वप्नाची मुुर्हूतमेढ होत होती. राष्ट्रपती या सर्वाच्च पदावर अत्यंत साधी राहणी, कुठलाही मेकअप नसताना चेहऱ्यावरील तेज, प्रेरणादायी बोलणे तुमच्याविषयी लिहीताना शब्द अपुरे पडत आहेत.

तुमची अचानक एक्झिट मनाला चटका लावून गेली. तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशातील प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागणार आहेत.आंबेडकर, टिळक, सावरकर, आगरकर आणि महात्मा गांधी किंवा भगतसिंग यांच्यासारखे अनेक देशासाठी लढणारे आम्ही पाहिले नाही पण देशाला योग्य दिशा देणारे कलामसाहेब पाहिले, यामुळे आमची पिढी खूप भाग्यवान आहे. आजच्या वातावरणावरून पुढच्या काळात तुमच्यासारखे खरे आदर्श व्यक्ती पाहायला मिळतील याबाबत मला शंका वाटते.
तुम्ही आयुष्यभर प्रेरणादायी राहाल यात काही शंका नाही. 

Saturday, 6 August 2016

देवदूताने एकादशीचा जीव वाचवला ......

काल आमच्या इंदीचा वाढदिवस होता. ही इंदी म्हणजे आमच्या गाईचे वासरू इंद्रायणी. हा ब्लॉग लिहिण्याचे कारण की एका वर्षापूर्वी तिच्या जन्मानिमित्त अचानक दोन दोन देवदूताची भेट झाली.त्यांनी आम्हांला जी काही मदत केली त्यामुळे काल आम्ही इंदीचा वाढदिवस साजरा करू शकलो. फार काही विशेष केलं नाही पण यानिमित्त त्या देवदूतांची फार आठवण आली. तिला आणि तिच्या आईला म्हणजे एकादशीला वाचवणारे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका हाकेवर आमच्यासाठी धावत आले. त्याचे पद आणि त्याचे शिक्षण कशाचाही गर्व न करता हे डॉक्टर आपल्या पेशाला प्रामाणिकपणे निभावणारा हे देवदूत म्हणजे डॉ.अनिल आणि त्यांचे मित्र डॉ. तेजुरकर.

अगदी बरोबर एक वर्षापूर्वी २१ ऑगस्टला दुपारी बाराची वेळ असेल, घरातील काम सुरु होते. तेवढ्यात आई अचानक आली आणि म्हणाली “एकादशी प्रसूतीकळा देतेय आज नक्की डिलिवरी होणार.” डॉक्टरला फोन लावला तर ते अलिबागला गेलेले होते. आता काय करायचं ? असा प्रश्न पडला. गाईची डिलिवरी कशी होते ? काय काळजी घ्यायची याची फार माहिती नव्हती. डॉक्टरांनी पुढच्या महिन्यातील तारीख दिली होती म्हणून आम्ही निवांत होतो. पण अशा अडचणीच्या वेळी डॉक्टर गावी गेले तर कोणाला बोलवावं ते कळेना, गावात सगळ्या अशा गोष्टी कशा हाताळायच्या ते माहिती असते. पण शहरात कोणालाच काही माहित नसतं, जवळपास गोठाही नाही, आम्ही सगळेजण टेन्शन मध्ये होतो. या गडबडीत एक सुंदर आणि गोंडस वासरू या जगात येत होत. ते छोटेसे वासरे पाहून आमचा सगळा तणाव पाण्यात साखर विरघळावी तसा निवळला होता पण आनंदावर विरजण पडले आणि गाईचे डिलिवरी होताना तिचे आतडे बाहेर पडले. तिची ही पहिलीच वेळ. कोणी अनुभवी माणूस नाही. आमची नुसती तारांबळ उडाली. बाबाच्या एका मित्राला बोलवायला कोणी तरी गेलं पण त्यांना येण्यासाठी उशीर झाला तोपर्यंत गाय वेदनेने सैरवैर करत होती. बाबा तिचे आतडे हातात घेऊन गाईच्या मागे धावत होते. आतड्याचे वजन ३०-४० किलो असेल किंवा त्यापेक्षा जास्त वजनाचे असेल. वेद्नेपुढे तिला काही कळत नव्हते म्हणून नुसती पळत सुटली होती, बाबा तिच्या मागे पळून पळून दामले होते. डॉक्टरांनी फोनवर जवळ कोणी डॉक्टर असेल तर त्याला बोलवा असे सांगितले पण जनावरांचा डॉक्टर वेळेवर काही केल्या सापडेना. यामुळे आमची फजिती होणार असे लक्षात आले. वारंवार फोन केल्यावर आम्हांला कोणी डॉक्टर भेटले नाही तुम्ही दुसऱ्या डॉक्टरचा नंबर देता का ? असे विचारल्यावर एका डॉक्टरचा नंबर दिला त्या डॉक्टरानी मला जमणार नाही असे सांगितले तर अजून एकजण म्हणाला “आलो तरी अशा वेळी काही करता येत नाही, ते आतडे आत जाईल का प्रयत्न करा ते गेले तर ठीक नाहीतर काही खरे नाही.” मग आमचा धीर सुटत चालला होता, आम्ही प्रयत्न करून ते आतडे गाईच्या शरीरात टाकत होतो पण गाय तिला होत असलेल्या वेदनेमुळे कळा देऊन आत गेलेले आतडे बाहेर टाकत होती. यावेळी मात्र गायची ताकत एखाद्या हत्तीसारखी वाटत होती . या अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे कसे जायचे समजत नव्हते. आज इंदी एका वर्षात तिच्या आईसारखी दिसत आहे पण त्यावेळी मात्र दोघी मायलेकी वाचतात की नाही असे वाटत होते.

 अचानक लक्षात आले की शेजारी रेसकोर्स आहे तिथे घोड्याचे डॉक्टर असतील. मी गाडी काढली शेजारच्या रेसकोर्सला पोहचले तेव्हा कळाले डॉक्टर तर दुसऱ्या रेसकोर्सला असतात तिकडे गेले तर तीन –चारी गेट फिरल्यावरही डॉक्टर काही भेटेना. मग रखवालदाराला परिस्थिती सांगून विनंती केली त्यांनी सांगितले छोटे डॉक्टर काही माहिती नाही पण आत मोठे डॉक्टर बसलेत. मी धावत दवाखान्यात गेले आणि समोर बसलेल्या डॉक्टर त्यांनाच सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी विचारलं “ तुमचा डॉक्टर कुठे ?” ते बाहेरगावी गेले म्हणूनच तुमची मदत हवीय अशी मी विनंती केली. त्यांनी लगेच एकजणाला गाडी काढायला सांगितली “सगळं समान घे बोलले “. माझा तर विश्वास बसेना. मी पुढे पुढे आणि डॉक्टरची गाडी मागे , हे दृश्य पाहून रेसकोर्समधील लोक माझ्याकडे आश्चर्याने बघत होते, त्या दिवशी सुट्टी होती म्हणून माझा अवतार फार बिघडलेला होता म्हणून लोक अधिक बघत ही कोण? रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉक्टर का हिच्याबरोबर जात आहेत. असा प्रश्न त्यांच्या तोंडावर दिसत होता. पण घरी सगळं ठीक असावं अशी प्रार्थना करत होते. इतक्या लांबून डॉक्टर घेऊन जाते पण .... असा मनात उगाच शंका येत होती. अगदी ३-४ मिनिटांच अंतर कोसभर वाटू लागले. मी डॉक्टरांना घेऊन आले आहे हे पाहून आई-बाबांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

डॉक्टरांनी घरी पोहचताच कामाला सुरुवात केली, अंगावर किती महाग कपडे आहेत याची काळजी न करता त्या मातीत आणि चिखलात गाईचे उपचार सुरु केले. पुढील अर्धा- एक तास नुसती पळपळ सुरु होती. गाई पळून पळून दमली होती. ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती आणि अजून वासराला दुध ही पाजले नव्हते. त्याला जवळ घेणे तर लांबच होत. डॉक्टरानी आपले काम सुरु केल्यामुळे आमची नुसती बघ्याची भूमिका उरली होती. ते डॉक्टर घोड्यावर उपचार करत असल्यामुळे गाईची ही परिस्थिती त्यांच्या हाताबाहेरची आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गायीला भुलीचे इंजेक्शन देऊन शांत केले. आणि त्यांचा खास मित्र आणि गाईचा विशेषज्ञ डॉ. तेजूरकर त्यांना फोन केला आणि लवकर ये सांगितले. इकडची सगळी परिस्थिती सांगितली. डॉ. तेजुरकर उरुळीकांचनला होते पण मित्राचा फोन आला म्हणून ते डॉक्टर येण्यासाठी तयार झाले. पोहचण्यासाठी एक तास लागणार होतो. तोपर्यंत गाईने हिंमत सोडू नये असे वाटत होते.

डॉक्टराला सगळी परिस्थितीची माहिती असून ते आम्हांला धीर देत होते. सगळं ठीक होईल. तो एक तास आम्ही युगासारखा काढला. तोपर्यंत वासरू डोळे उघडून आईकडे पाहू लागले. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत होते पण आईचा स्पर्श आणि दुधाशिवाय ते शक्य नव्हत. आमचा जीवही त्यांच्याबरोबर तुटत होता पण काहीच मार्ग नव्हता. डॉक्टरानी शक्कल लढवली की गाईचे झोपलेल्या अवस्थेत दुध काढून पिलाला द्यायचे आणि तसं केलंही त्यामुळे  १०-१५ मिनिटात वासरू उभं राहिलं. त्यावेळी आम्ही आनंद आणि दुख एकत्र अनुभवत होतो.

तेवढ्यात डॉ. सावंत आले, आम्ही त्यांनाही आम्ही फोन केला होता. त्यांनी परिस्थिती पाहून प्रयत्न करू बोलले आणि काम सुरु केले. ते ज्या प्रकारे गायीला इंजेक्शन देते होते ते पाहून डॉ. अनिल आणि सोबत आलेले डॉ. म्हणाले की जनावर असले तरी तय्ना जीव आहे जरा जपून प्रेमाने द्या. असे तर दुसऱ्या देशात केले तर तुमची पदवी काढून घेतील. यामुळे ते दोघे किती संवेदनशील डॉ आहेत याची जाणीव झाली. डॉ. सावंतचा अनुभव परिस्थिती सांभाळायला कमी पडत होता, त्यांना जमणार नाही हे लवकरच लक्षात आले. मग काय करावे सुचत नव्हते,तेवढ्यात एक गाडी वाजली, डॉ. तेजूरकर आले. वाऱ्याच्या वेगाने आले त्यांनी २० -३० मिनिटात जी काही मेहनत घेतली त्यावर आम्ही सगळे आवक झालो. कामाचा वेग, कामाचे ज्ञान आणि मेहनत यांचे एकत्रित मिश्रण म्हणजे डॉ. तेजूरकर. अक्षरशः धावत येऊन अंगावरील शर्ट काढला आणि कामाला लागले मित्राला नीटसे बोललेही नाही. लगेच त्या चिखलात बसून उपचाराला सुरुवात केली. वारा लागल्यामुळे आतडे सुजले होते, डॉक्टर जीवानिशी प्रयत्न करून गायीच्या शरीरात आतडे बसवत होते पण गाईला होणारा त्रास त्यामुळे ती बाहेर काढून टाकत या सगळ्या प्रकारामुळे एकादशीचे मोठ्या प्रमाणत रक्त वाया गेले. त्यामुळे ती फार अशक्त झाली होती. तिने प्रयत्न सोडायच्या आत सगळं ठीक व्हावं म्हणून आम्ही देवाचा धावा करत होतो पण खरतरं दोन दोन डॉक्टररुपी देव आमच्या गाईला वाचवत होते. अखेरीस गायीच्या शरीरात सगळे आतडे बसवून त्याला टाके टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली. याच दरम्यान तिला सलाईन दिले जात होते म्हणून तिला थोडीशी ताकत मिळाली. या ताकतीने तिने टाके तोडू नये असे डॉक्टराना वाटत होते. या सगळ्यात आमची एकादशी अर्धमेली झाली होती. अशक्तपणामुळे जमिनीवर निपचित पडली होती. अर्धा तासांनी तिला शुद्ध आली ती वासराकडे पाहू लागली. वासरू तिच्याकडे जातच तिन्हे पान्हा सोडला आणि आम्ही सुटकेचा श्वास ....


अशा प्रकारे दोन देवदूतांनी आमच्या एकादशीचा आणि इंद्रायणीचा जीव वाचवला. डॉ. अनिल यांनी उपचाराचे आणि आणलेले साहित्य कशाचेही पैसे घेतले नाहीत. फक्त डॉ.तेजुरकारांची फी द्या. अजून काही साहित्य हवे असेल तर सांगा पाठवून देतो असे म्हणाले. या सगळ्या गडबडीत आम्ही रेसकोर्समधून आलेल्या डॉक्टरच नावं विचारयचं राहून गेलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीला विचारले या डॉ.चे नाव काय ? तेव्हा त्याने सांगितले की हे रेसकोर्समधील सर्वात मोठे डॉक्टर आहे त्यांना सगळे नाव डॉ. अनिल म्हणतात.अधिक चौकशी केल्यावर कळाले की रेसकोर्समधील सर्वात वरिष्ठ डॉ. आहेत. एवढे मोठे डॉक्टर ओळख नसतानाही फक्त एका विनंतीवरून आमच्या गायीसाठी आपले काम सोडून आले. याचे आम्हांला फार आश्चर्य वाटत होते. त्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि आपल्या पेशाविषयी असलेला आस्था दिसत होती. 

आम्ही त्यांचे आभार मानत असतात त्यांनी सांगितले धन्यवादची काही गरज नाही हे तर  माझे कर्तव्य आहे. मी डॉक्टर आहे जर एखादे जनावर अडचणीत असेल तर त्याला मदत करणे माझं कामच आहे. मग तो रेसकोर्समधला घोडा असो वा तुमची गाय. डॉ. गेल्यावर आम्ही देवाचे आभार मानू लागलो की वेळेवर जर डॉ आले नसते तर आम्ही एकादशी आणि इंदी गमवून बसलो असतो. डॉक्टराच्या उपकाराने आम्ही भारावून गेलो होतो.


आणि एकादशी आणि इंद्रायणी या मायलेकींचा संगम पाहतच राहिलो.