Thursday, 6 July 2017

लघुकथा - अपूर्ण राहिलेलं प्रेम....

एक अपूर्ण

टीव्हीवर तो दिसताच घड्याळाचे काटे काही महिने मागे फिरू लागले.अचानक सल टोचावी तसे डोळे घट्ट मिटून टीव्ही बंद केला. समोर पडलेले वर्तमानपत्र चाळताना पुन्हा तेच. जगातील सर्व सुख पायाशी लोळत असतानाही ती दु:खी. त्याच्यासाठी झोपडीतील मीठ-भाकर खायला तयार असलेली, त्यांच्या एका नकारामुळे अचानक आलेल्या श्रीमंताच्या घरीची मागणी तिला काही करता नाकारता आली नाही. ती सूनबाई झाली पण प्रेमळ पती मिळून पत्नी नाही.त्यांच्या आठवणीने डोळ्यात आलेले अश्रू अनेक काळाने ओघळले असते पण " काय करता राणीसरकार" असा श्रीमंताचा आवाज आला आणि डोळ्यांतील असावं डोळ्यातच राहिली.....

कातरवेळ

अनेक प्रयत्न करूनही नको असलेला तरीही हवाहवासा वाटणारा चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. डोक्यातील विचारचक्र सुरु होते. एकमेकांशिवाय न जगण्याच्या आणाभाका हवेत विरून गेल्या होत्या. राहिल्या त्या फक्त आठवणी चांगल्या व वाईटची सरमिसळ असलेल्या. तो आयुष्यातून तर गेला मनांतून काही जाईना. एक दिवस अचानक पुढे दिसला, कातरवेळी नजरानजर झाली पण नाही पण. अचानक जुन्या दुःखाची खपली ओरबडून काढावी तसं काहीसं झालं तिला, एक वर्षानंतर त्याच्या चेहऱ्यावर यश तेज दिसत होत. तिला ते ओजरत्या नजरेत दिसले. त्याला मात्र फक्त तिच्या गळ्यातले भाळेमोठे मंगळसूत्रच दिसलं. एकही शब्द न बोलता पुढचा प्रवास सुरु झाला. त्यांच्यासोबतच्या आठवणीने अल्पसा आनंद मिळाला परंतु त्याचवेळी घरी असलेल्या श्रीमंताची आठवणही झाली. गैरसमजाने फार मोठी चूक झाली होती दोन जीवाचे मार्ग वेगळे झाले तरीही दुःखाच्या एकच धाग्याने बांधले गेले होते.

एकांत
‘तुझं हास्य आहे मधाळ
करून गेले मला घायाळ
तुला पाहताच हरते भान
मग राहत नाही मी माझी
असते फक्त मी तुझी’
जुन्या सामानात चुरगळलेल्या कागदावरचे शब्द वाचताना डोळे जड झाले होते. या अलिशान बंगल्यात आल्यापासून तिचे समान अडगळीत पडले होते. तिचा आवडता एकांत वेळ तिला मिळत असूनही नको होतो. माहेरी असताना ती एकांत मिळायची वाट पाहत असे. कारण तेव्हा तर तो तिला भेटायचा तिथे नसतानाही फोनवर, मेसेजवर. सगळे मेसेज वाचून वाचून अगदी पाठ झाले होते. आता तोच एकांत असह्य्य करत होतो. इथे मात्र श्रीमंतांना सावकारीतून वेळ मिळत नाही आणि घरात काम नाही.  हाताखाली चार नोकरचाकर. टीव्ही तिला आजकाल आवडत नाही. सगळ्या प्रेमकथेने भरलेल्या मालिका तिला आता रुचत नाही. जे सुटले त्यासाठी रडता येत नाही, आहे त्याचा उत्सव करता येत नाही. अशा कोंडीत सापडलेली ती असावं थांबवू शकत नाही मग दिवसभर ते डोळ्यात जमा होतात आणि डोळ्यातच विसावतात. कारण आता ते राणीसाहेबांच्या डोळ्याला शोभत नाहीत. ती मात्र पुन्हापुन्हा आता तिची भूमिका बदलीय हे विसरून जाते. अशाच विचारांच्या जाळ्यात अडकलेली असताना श्रीमंत तिथे आले हे तिला कळाले नाही. हातातला कागद घेऊन स्मित हास्य करून “छान लिहिलेस, माझ्यावर एवढं प्रेम करतेस ? मी मात्र तुला वेळ देत नाही,मी पुरता अडकलोय बघ कामात. असं म्हणत खोलीत निघून गेले, आणि त्यानंतर बंगल्यात निनावी शांतता पसरते....




सच्चा कलाकार
तिच्या गळ्यातले मंगळसूत्र डोळ्यासमोरून जात नव्हते. इच्छा असतानाही तिला न बोलताच तो पुढे निघून गेला तो फक्त शरीराने पण मनाने तर तिथेच मुक्काम ठाकला होता. ओळखीचा चेहरा असूनही मात्र धुसरसा दिसत होतो, दिसत होते ते फक्त आणि फक्त मंगळसूत्र. विरहाने पूर्णपणे तुटलेला तरीही त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. कारण तो कलाकार होता. वेगवेगळ्या भूमिका करताना आपली खरी भूमिका विसरून गेला होता. तिच्या रूपाने किंचितसा भूतकाळ समोर आला, पण भावनांना आवर कशी घालायची ते त्याच्याकडून शिकावं. खरतरं हाच त्याचा स्वभाव आहे, याच स्वभावामुळे त्याने तिला नकार दिला तेव्हा तो शांत होता. तिच्या रडण्याचा आवाजाने याला पाझर फुटला नाही. तसचं त्याच्या तुटलेल्या हृदयाचा आवाज तर बाहेर येणेच शक्य नव्हते. कदाचित आवाज येऊ न देणे त्याला चांगल जमत. तिच्या अलिशान घराचे आणि चारचाकीचे स्वप्न, पूर्ण होत असेल तर आपण का तिला मोडक्या झोपडीत न्यावे म्हणून त्याने तिला नकार दिला पण तिने हे स्वप्न त्याच्यासोबत पहिले होते. हे तो विसरला होतो. त्या अलिशान स्वप्नात तो नसेल तर ते स्वप्न कसले ? तो तर वनवास. शहरात येऊन काहीच महिने झाले असतील तेव्हा कॉलेजात ती भेटली. त्याच्या कलेवर प्रेम करणारी. त्याच्यातील सच्च्या कलाकाराला दाद देणारी, शहर आपलसं करायला शिकवणारी, त्याच्या सतत मागेपुढे करणारी, काय हवं नको पाहणारी. काही दिवसांत त्याच्यासाठी सरस्व झाली होती.पण हे त्याने कधीच सांगितले नाही. त्याचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसायचं म्हणून तिनेही कधी विचारलं नाही. ही मैत्री कधी तोडणार नाही ना असं जेव्हा ती विचारत असे तेव्हा तो म्हणत " कधीच नाही."
आज मात्र ती फार दूर गेलीय अगदी स्पष्टपणे सांगायचं तर दूर केलीय. तिच्या आनंदासाठी आणि उज्जवल भविष्यासाठी. " एक कलाकार नेहमी फाटक्या झोळीचा,अट्टल सट्टेबाज असतो. लागली तर चांदी नाहीतर मंदी" हा त्याचा आवडला डायलॉग .
आज यशाची पायरी चढताना तिची वारंवार आठवण येतेय, ती सोबत असती तर?.....